कुठे आहेस तू जयचंद? (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

(एक पत्रव्यवहार....)

प्रती,
मा. वनमंत्री, (संपूर्ण अधिभार),
महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय : जयचंद वाघ बेपत्ता होण्याबाबत.

(एक पत्रव्यवहार....)

प्रती,
मा. वनमंत्री, (संपूर्ण अधिभार),
महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय : जयचंद वाघ बेपत्ता होण्याबाबत.

कळविण्यास अत्यंत खेद होतो, की उमरेडच्या जंगलाची शान असलेला जयचंद वाघ गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून गायब आहे. जयचंद वाघ हा जय वाघ ह्यांचा पुत्र असून, जय वाघ गेल्या तीनेक वर्षांपासूनच गायब आहेत. श्री. जय वाघ एव्हाना मयत झाले असावेत, असा वहीम आहे. एकंदरित त्यांच्या फ्यामिलीतच गायब होण्याची टेंडन्सी असल्याचे निरीक्षणांती दिसून आले आहे. तडीपारीचा आदेश बजावलेला नसताना व वनखात्याची परवानगी नसताना हद्द सोडून पळाल्याबद्दल आपल्यावर कारवाई का करू नये? अशी "कारणे-दाखवा' नोटिस आरोपी जयचंद ह्याच्यावर तीन वेळा बजावण्यात आली होती.

आरोपी जयचंद ह्याने गेल्या दोन-तीन वर्षांत (पक्षी : बाप बेपत्ता झाल्यावर) ह्या परिसरातील अधिवासात आपले राज्य इतके प्रभावीपणाने प्रस्थापित केले, की ह्या काळात त्याच्यापासून विविध मादी वाघांना वीसपर्यंत बच्चे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इतक्‍या मुलांचा बाप झाल्यावर अचानक एकदोनदा तो कालव्यात पडल्याचे प्रसंग घडले. तसेच तो परिक्षेत्र सोडून हिंडू लागला. चाळिशीत आल्यावर (काही) पुरुषांचे होते, तसे त्याचे झाले असावे, असे मत वन्यजीवतज्ज्ञ श्री. डॉ. काळवीट ह्यांनी व्यक्‍त केले असून, त्यांचा अहवाल सोबत जोडला आहे. (खुलासा : चाळिशीनंतर असे होते, असे त्यांनी डोळ्यांत पाणी आणून सांगितले.) जयचंद वाघाच्या कॉलरीचे सिग्नल बंद झाले असून, गेल्या महिन्यात तो उजनीच्या उजव्या कालव्यात पडून भिजला होता. (वाघ आणि कॉलर दोन्हीही.) त्यानंतर तो कोणालाही दिसलेला नाही. त्याच्या तपासासाठी मार्गदर्शन करावे ही विनंती. कळावे. आपला आज्ञाधारक. धनुर्धर हरणे (वन्य परिक्षेत्र अधीक्षक, टायगर प्रोजेक्‍ट.)
***
प्रति, मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य,
विषय : वाघाचा शोध आणि बंदोबस्ताविषयी.
गेल्या काही दिवसांपासून (आमच्या) चंद्रपूर इलाख्यातील, तसेच उमरेड परिसरातील वाघांची संख्या अचानक रोडावली असून, येथील वाघ स्थलांतर करण्याच्या खटाटोपात असल्याचे आढळून आले आहे. जयचंद नावाचा एक वाघ नुकताच गायब झाल्याचा वन अधिकाऱ्यांचा रिपोर्ट सोबत जोडत आहे. ह्या वाघाला परत कसे आणावे? ही वनखात्यासमोरील समस्या आहे. वनमंत्री म्हणून मी असे सुचवू इच्छितो, की ह्या इलाख्यात आणखी वाघिणी सोडल्या तर शेजारील मध्य प्रदेशातील काही वाघ इथे येऊ शकतील ! तसेच ह्या भागात मुबलक झाडोरा, पाणी व फोटोग्राफी, मॉडेलिंगसारख्या अन्य सुविधा वन्यजीवांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तथापि, चांगला वन्यजीव फोटोग्राफर येथे फिरकत नाही. मुंबईतील बांदऱ्याला राहणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वन्यजीव फोटोग्राफरला निमंत्रण देऊन बोलावले तर वाघदेखील फोटो काढून घेण्याच्या मिषाने स्थलांतर न करता महाराष्ट्रात राहतील !! सदर फोटोग्राफरला सरकारतर्फे विनंती करण्यात यावी ही विनंती. कळावे. आपला. वनमंत्री. सु मुनगुंटीवार.
ता. क. : जयचंद ह्यास वीस बच्चे झाले आहेत. वीस ! अशा वर्तनामुळेच वाघ कालव्याबिलव्यात पडतात !! असो.
* * *
प्रिय वनमंत्री, अहो, हे काय चालले आहे? वाघाचे अधूनमधून गायब होणे हा फक्‍त वनखात्याचा प्रश्‍न नसून एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा सवाल आहे. वाघाला त्याच्याच अधिवासात कायम ठेवणे, बेपत्ता होऊ न देणे, ही वनमंत्री म्हणून आपलीच कामे आहेत. ती करावीत, ही विनंती नसून आदेश आहे. कळावे. नाना फडणवीस.
ता. क. : बांदऱ्याच्या फोटोग्राफरला सांगा की नाणार प्रोजेक्‍ट चंद्रपुरात टायगर प्रोजेक्‍टमध्ये शिफ्ट करत आहो ! प्रोजेक्‍ट म्हटले की विरोध करायला तरी ते तिथे येतील !! कळावे. नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article