पानटपरी : एक चिंतन! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 1 मे 2018

आमची उभी हयात पानटपरीवर गेली, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करू. किंवा आमची हयात पानटपरीवर उभी गेली असेही म्हणता येईल. आम्हाला भेटावयाचे असेल, तर विशिष्ट पानटपरीपाशीच अपाइण्टमेंट घ्यावी लागते, ह्यात सारे काही आले! वाढुळ वयात आमच्या तीर्थरूपांनी कैकदा आम्हास पानटपरीपासून तहत घरापर्यंत मारत मारत नेल्याच्या घटना घडल्या आहेत. युवावस्थेत तर आम्ही पानटपरीपाशी उभे राहून साऱ्या बुर्झ्वा जगतावर पिंका टाकणे किंवा जगरहाटीला जुंपलेल्या आसपासच्या किडामुंगी मनुष्यांवर धूर सोडणे, हेच खरे तारुण्य असे मानत असू.

आमची उभी हयात पानटपरीवर गेली, हे आम्ही येथे नम्रपणे नमूद करू. किंवा आमची हयात पानटपरीवर उभी गेली असेही म्हणता येईल. आम्हाला भेटावयाचे असेल, तर विशिष्ट पानटपरीपाशीच अपाइण्टमेंट घ्यावी लागते, ह्यात सारे काही आले! वाढुळ वयात आमच्या तीर्थरूपांनी कैकदा आम्हास पानटपरीपासून तहत घरापर्यंत मारत मारत नेल्याच्या घटना घडल्या आहेत. युवावस्थेत तर आम्ही पानटपरीपाशी उभे राहून साऱ्या बुर्झ्वा जगतावर पिंका टाकणे किंवा जगरहाटीला जुंपलेल्या आसपासच्या किडामुंगी मनुष्यांवर धूर सोडणे, हेच खरे तारुण्य असे मानत असू. पानवाल्या पुरभय्याच्या (ओलसर) फळकुटाला न टेकता ‘‘छोटा पक्‍का बनायस पान, एकशेवीस तीनशे, नवयतन, बायीक सुपायी, चूना जियादा, इयायची-यवंग, कचया मत डायना’ हे पानाचे करेक्‍ट प्रिस्क्रिप्शन आहे. (मुखात पानरस ऑलरेडी असताना दुसऱ्या पानाची ऑर्डर देतेवेळी ‘र’ आणि ‘ल’ दोन्ही लोप पावतात, हा व्याकरणाचा नियम चाणाक्षांच्या नजरेतून सुटता कामा नये! असो!!) आमच्या पानवाल्यास ते पुरते तोंडपाठ असूनही सध्या मात्र आम्ही बिथरलेल्या मनःस्थितीत आहो. कां की आम्ही काही सहस्त्र रुपयांची उधारी थकवल्याचे किर्कोळ कारण पुढे करून सदर पानवाल्याने आम्हांस भविष्यातील पानरतीबास मनाई केली असून ह्या अन्यायाला तोंड फोडण्यासाठी पान कुठले खावे, हे आम्हास समजेनासे झाले आहे.

तथापि, आमचा मुक्‍काम हा पानटपरीच्या फळकुटाच्या अलिकडे असतो, पलिकडे नव्हे, हे लक्षात ठेविले पाहिजे! फळकुटापलिकडील व्यक्‍तीस इतके परावलंबी जीवन जगावे लागत नाही. म्हणूनच पदवीधरांनी सरकारी नोकरीसाठी राजकारण्यांच्या मागे पळण्यात वेळ घालवण्यापेक्षा पान टपरी उघडावी, असा सल्ला त्रिपुरासुर निर्दाळक मुख्यमंत्री बिप्लबकुमार देब ह्यांनी दिला, त्याला आमचे उत्तर एकच - ‘‘च्युक...बयोब्बय!’’ असेच होते.

सांप्रत काळी हल्लीचे तरुण सरकारी नौकरी मिळवण्यासाठी पुढाऱ्यांचे वशिले मिळवण्यासाठी धडपडत असतात. काहीही करून पुढाऱ्यांच्या चिठ्ठ्या मिळवून सरकारी चाकरीत मान एकदाची अडकवली की पुढील आयुष्य सुखाचे जाते, असा गैरसमज देशभरात फैलावलेला दिसतो. गरजू लोकांना नोकऱ्या लावणे हे सरकारचे कर्तव्यच आहे, हे त्यांस कोणी सांगितले? पुढाऱ्यांच्या मागे धावण्याच्या नादात प्राय: अनेक वर्षे वाया जातात व तारुण्य फुकट जाते. हे टाळावयाचे असेल तर हरेक तरुणाने पान टपरी उघडून पाच लाख रुपये जमवावेत, असा सल्ला मा. बिप्लबकुमार देब ह्यांनी दिला.
म्हणजेच तरुणांनी पानटपरीच्या अलिकडे उभे राहून हयात फुकट न घालवता फळकूट उचलून (किंवा फळकुटाखालून वाकून जात) पलिकडल्या पानटपरीच्या कोंदणात बसावे, अशी इच्छा मा. बिप्लबकुमार ह्यांनी व्यक्‍त केली.

त्यांचे उद्‌गार ऐकून आम्हांस वाटले की अरेच्चा, इतकी वर्षे इथे (पक्षी : अलिकडे) उभे राहण्यात गेली, जरा दोन फूट ओलांडले असते तर आज बसावयास जागा मिळाली असती व उधारीही राहिली नसती. किती किफायतशीर व सुंदर विचार!! पण आपणांस कां बरे सुचला नाही? अरेरे!! पानटपरीचे जमण्यासारखे नसेल, तर किमान एक गाय पाळून रोज पहाटे कासंडी घेऊन तिच्याशेजारी उकिडवे बसून दूध दोहावे!! त्यानेही पाच लाख रुपये खात्यात जमा होऊ शकतात, असेही मा. बिप्लबकुमार म्हणाले.
 वाचकहो, आपल्या महान देशात बेरोजगारीचा प्रश्‍न हल्लीच फार उग्र झाला आहे. बघाल तो माणूस रिकामटेकडा वाटावा, इतका वेळ ‘फेसबुक’ आणि ‘व्हाट्‌सॲप’वर घालवीत असताना आपण पाहतो. ह्यावर उपाय काय? तर पानटपरी!!
...तेव्हा हरेक पदवीधर तरुणाने लगबगीने पानटपरी टाकण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहन आम्ही करीत आहो. जेणेकरून आमचा उधारीचा प्रश्‍न तूर्त तरी सुटेल! काय म्हणता? घ्या लावा चुना...!

Web Title: editorial dhing tang british nandi article