एकच सवाल! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सर श्रीशके १९४० वैशाख कृष्ण द्वितीया.
आजचा वार : ए वेडनसडे!
आजचा सुविचार : सुवर्णाला मुशीतील विस्तवाचे भय नसते. त्याला दु:ख असते ते गुंजेत मोजले जाण्याचे- एक सुभाषित (शाळेतील फळ्यावरले...)
.......................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) महाराष्ट्रदिनाच्या धकाधकीनंतर रात्री (दूध पिऊन) शांत झोपलो. सकाळी उठून आधी वर्तमानपत्रे बघितली. हेडलायनी बघूनच सावध झालो. ताबडतोब पीएला बोलावून बंगल्याच्या दाराची कडी घातली. पीएला सांगितले, ‘‘कोणीही बेल दाबून आत आलं तर साहेब घरी नाहीत असं सांगा !’’ त्यांनी ‘येस्सर’ म्हटले. निर्धास्त झालो. सैपाकघराकडे तोंड करून ‘पोहे येऊद्यात’ असे फर्मावले. सुखात चार घास खावेत आणि मराठी दौलतीच्या विकासासाठी फायली हातावेगळ्या करायला घ्याव्यात असे मनोमन ठरवले. शेवटी राज्याचा विकास महत्त्वाचा असतो. त्या विकासासाठीच सारे काही चाललेले आहे.
...पोह्याच्या गरमागरम बशीत सुखाचा चमचा खुपसणार, इतक्‍यात दाराची बेल वाजली. पीएने चपळाईने दार उघडून (किंचित फट ठेवूनच) ‘साहेब घरात नाहीत’ असे ठरल्याप्रमाणे सांगितले.
‘‘पुड्या सोडतो का बे?’’ असे म्हणत दार ढकलून साक्षात आमचे नाथाभाऊ घरात शिरले. पोह्याचा घास तोंडात असताना समोर नाथाभाऊ उभे असले, की कोणालाही ठसका लागणारच ! प्रच्चंड ठसका लागून प्राण कंठाशी आले.
‘‘का? आम्हाला बघून ठसका लागला?’’ कमरेवर हात ठेवून नाथाभाऊंनी करड्या आवाजात विचारले. भिवया वर ताणलेल्या होत्या. आवाजात आव्हान होते.
‘‘छे, छे ! आपल्याला बघून ठसका कशाला लागेल?’’ मी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. घाईघाईने ‘आणखी पोहे आणा रे’ अशी ऑर्डरही दिली.
‘‘सगळ्या आरोपांमधून मुक्‍त झालो. सुपारीबाजांनी गंडांतर आणलं होतं. निव्वळ आरोप झाले तर आमचं मंत्रिपद गेलं. एवढी किंमत मोजतं का कुणी? पण आम्ही मोजली ! केवळ पक्षासाठी मोजली. म्हटलं चुकीचं काम केलं असेल, तर फासावर द्या ! पण इथं कोणाला डर होती? कर नाही त्याला डर कशाची?...काय?’’ आमच्या समोर सोफ्यावर ऐसपैस बसून नाथाभाऊ बोलत होते.
‘‘झालं गेलं गंगेला मिळालं, तुम्ही पोहे घ्या फर्मास !’’ आम्ही गुळमुळीतपणाने म्हणालो. तेवढ्यात पोहे आले म्हणून वाचलो ! नाहीतर आमचे खानदेशी वांग्याचे भरीत झाले असते खासच. बराचवेळ कोणीही काही बोलले नाही....
‘‘काल इतक्‍या लोकांनी भेटून अभिनंदन केलं की विचारू नका. पण प्रत्येक जण एकच सवाल करत होता...’’ पोह्याच्या बशीतला शेंगदाणा हुडकून तोंडात टाकत नाथाभाऊ म्हणाले, ‘‘नाथाभाऊ, आता परत मंत्री कधी होणाऽऽर?’’
‘‘हो का? वाव्वा !...मग? मग तुम्ही काय सांगितलंत?’’ आम्ही खेळकर हसत, पण सावधपणाने विचारून घेतले.
‘‘आम्ही काय सांगणार? फक्‍त खांदे उडवले...अस्से!’’ नाथाभाऊंनी ‘काय म्हाईत’ अशा अर्थाने दोन्ही खांदे उडवून दाखवले. मी चतुराईने त्याकडे दुर्लक्ष केले. (हल्ली मला हे चांगले साधले आहे...) मग मी महाराष्ट्र दिनाला काय काय केले, त्यांचे मार्गदर्शन नसण्याच्या काळात महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त कसा झाला, वीज गावागावांत कशी पोचली, सध्या जलयुक्‍त शिवारची अवस्था कशी आहे, वगैरे काहीतरी सांगत बसलो.
‘‘ते जाऊ दे सगळं *** त!...आम्ही मंत्री कधी होणाऽऽर? हे सांगा !’’ पोह्यांची रिकामी बशी समोरच्या मेजावर हापटत नाथाभाऊ ताडकन उठून उभे राहिले. कमरेवर हात ठेवून एकच सवाल करते झाले. त्यांच्या आवाजात आव्हान होते. आम्हाला पुन्हा प्रच्चंड ठसका लागून प्राण कंठाशी आले... आम्ही फक्‍त ‘काय म्हाईत’ अशा अर्थाने खांदे तेवढे उडवले... अस्से !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com