ना. बाबूराव यांचे भोजनव्रत ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 5 मे 2018

ना मदार बाबूराव ह्यांना आमचे शतप्रतिशत वंदन असो. कां की त्यांच्यासारखा मानवतेचा पुजारी समाजात शोधून सापडणार नाही. माणुसकीने त्यांचे मन दिनरात भळभळत असते. कुणीही गरीब त्यांच्या दारातून (आश्‍वासनाविना) विन्मुख गेला नाही. कुणीही मजूर (मोबदल्याविना) कामाशिवाय राहिला नाही. कुणीही दलित बांधव वर्गविग्रहाचा बळी ठरला नाही. जातीपाती, धर्मअधर्म ह्या खुळ्या कल्पना आहेत, ‘माणूस’ हाच समाजाचा केंद्रबिंदू आहे ही ना. बाबूरावांची श्रद्धा आहे. ना. बाबूराव म्हंजे माणुसकीचा झरा नव्हे, तर बारमाही धबधबा आहे.

ना मदार बाबूराव ह्यांना आमचे शतप्रतिशत वंदन असो. कां की त्यांच्यासारखा मानवतेचा पुजारी समाजात शोधून सापडणार नाही. माणुसकीने त्यांचे मन दिनरात भळभळत असते. कुणीही गरीब त्यांच्या दारातून (आश्‍वासनाविना) विन्मुख गेला नाही. कुणीही मजूर (मोबदल्याविना) कामाशिवाय राहिला नाही. कुणीही दलित बांधव वर्गविग्रहाचा बळी ठरला नाही. जातीपाती, धर्मअधर्म ह्या खुळ्या कल्पना आहेत, ‘माणूस’ हाच समाजाचा केंद्रबिंदू आहे ही ना. बाबूरावांची श्रद्धा आहे. ना. बाबूराव म्हंजे माणुसकीचा झरा नव्हे, तर बारमाही धबधबा आहे.

ना. बाबूरावांना कोण ओळखत नाही? गेली चाळीस दशके ते भारतीय राजकारणात तळपत आहेत. जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारा एकमेव नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांच्या निवासाशी प्रजाजनांची गर्दी असते. ‘‘दाराशी असलेल्या चपलाबुटांचा ढीग, हीच माझी श्रीमंती’’ असे ते विनयाने म्हणतात. किती खरे आहे? ना. बाबूराव ह्यांनी श्रीमंतीचा हव्यास ना कधी धरला, ना प्रसिद्धीसाठी स्टंट केले. त्यांचे तीस खोल्यांचे छोटेसे घर, आठशे एकर जमीन, अठरा मोटारी आणि तीन फार्महाउस सोडून त्यांच्याकडे काहीही नाही. राजकारणातील ड्रामेबाजी त्यांना बिलकुल मान्य नाही. मी समाजासाठी देह झिजवतो, पदांचा मला मोह नाही, असे ते वारंवार सांगतात, ते ह्यामुळेच.

विवाहानंतर लगेचच ना. बाबूराव ह्यांनी स्वत:च्या घरी जेवण्याचे सोडले. पानातील अन्नाकडे पाहून डोळ्यांत पाणी आणून ते पत्नीस म्हणाले, ‘‘माझा गोरगरीब, दलित बांधव कसा जेवत असेल? तो जे जेवतो, तेच मी यापुढे खाईन हो !’’ ना. बाबूराव ह्यांनी गेली कित्येक वर्षे हा नियम पाळला आहे. न्याहारीपासून रात्रीपर्यंत चारदा स्नॅक आयटम आणि दोन्ही टायमाचे जेवण ते दलित बांधवाच्या घरी जाऊनच करतात. उरलेली भूक कार्यालयातील फायलींमधून भागवतात. रोज नवा दलित बांधव शोधावा आणि त्याच्या घरी कोरभर भाकरी खावी, ‘हेच माझे अन्नव्रत, हाच माझा उपवास’ असे त्यांनी जाहीर केले. परवाचीच गोष्ट. एका गावात ते भाषण देण्यासाठी गेले असता, त्यांना प्रचंड भूक लागली. त्यांनी गर्दीतून एक दलित बांधव शोधून काढला. त्यास म्हणाले, ‘‘मित्रा, भूक लागली, जेवू घाल !’ दलित बांधवाने त्यांना घरी नेले. यथेच्छ जेवण झाले. जेवल्यानंतर दलित बांधवाने सैपाकघराकडे तोंड करून ‘आइस्क्रीम आणा रे’ असा पुकारा केला. आइस्क्रीम खाऊन तृप्त झालेल्या ना. बाबूरावांनी कृतज्ञतेने हात जोडून दलित बांधवास दुवा दिल्या.

‘‘अप्रतिम आणि आकंठ जेवण झाले रे मित्रा ! पण इतके सुग्रास अन्न कसे काय जुळवलेस?’’ ना. बाबूरावांनी मनातील प्रश्‍न विचारला.
‘‘त्यात काय येवढं ! तुम्ही म्हणालात भूक लागलीया, जेवायला न्या... ही आमच्या गावातली एक नंबरची खाणावळ आहे... दोनशे रुपये थाळी प्लस आइस्क्रीमचे पण्णास रुपये शेपरेट... हे घ्या बिल,’’ दलित बांधव खांदे उडवून म्हणाला. ना. बाबूरावांनी त्या रात्री खाणावळीतील भांडी प्रेमाने घासली. कारण बिलाचे पाचशे रुपये भरण्यास त्यांनी नकार दिला...

ना. बाबूराव ह्यांचे दलितप्रेम बेगडी, खोटे आणि नाटकी आहे, असे त्यांचे विरोधक म्हणतात. ना. बाबूराव दलित बांधवाच्या घरात जाऊन हाटेलातून मुर्गीमटण मागवून यथेच्छ ताव मारतात आणि नंतर ‘मी दलित बांधवाच्या घरी जेवलो’, म्हणून पुण्यवान झाल्याच्या आविर्भावात हिंडतात... हा विरोधकांचा लाडका आरोप ना. बाबूरावांना मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘बोलणाराची तोंडे दिसतात, खाणाराची नाहीत !’’
सध्या ना. बाबूरावांनी हाटेलातील खाद्यपदार्थांवरील जीएसटी रद्द करण्यासाठी आंदोलन उभारण्याचे ठरवले आहे. हा जिझिया कर रद्द झाला की विविध हाटेलांमध्ये जेवण्याचे व्रत ना. बाबूराव जोमाने धरतील, ह्यात शंका नाही. ना. बाबूरावांचा विजय असो !
भारतीय लोकशाही चिरायू होवो!!

Web Title: editorial dhing tang british nandi article