साखरेचा ‘पाक’! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

कयामत-ए- कांग्रेस, आलमगीर-ए-हिंदोस्तां, शेर-ए-गीर बाश्‍शासलामत नरेंदरशाह मोदीजी के कदमोंतले वझीर-ए-पाकिस्तान शाहीद खाक्‍कान अब्बासी यांच्यातर्फे सौफीसदी (याने की : शतप्रतिशत) कुर्निसात. बहोत अर्से हुए के आपकी मुलाकात नहीं हुई. मी असा बदनसीब की पाकिस्तानच्या कारभाराची रस्सी (याने की : सूत्रे) हातात घेतल्यानंतर माझ्या घरी मंगलकार्य उभे राहिले नाही. आमचे आधीचे वझीरे-आझम नवाझमियां शरीफ ह्यांच्या घरी मंगलकार्याला आपण आला होता. मी कुठले मंगलकार्य आयोजित करू?- मुआफी हो!

ऐ कयामत-ए-हिंद, आपल्याबद्दल चंद अच्छे लब्ज कागजपर लिख्खून ते एका सांडणीस्वारासोबत आपल्याकडे पाठवत आहे. साथ में एक मीठा मीठा तोहफादेखील पाठवत आहे. कुबुल करावा. आप तो हमारे अझीझ पडोसी है और मजहब-ए-पडोससाठी (याने की : शेजारधर्म) आम्ही काहीही करू. लेकिन क्‍या करू? अर्सोंसे आपल्या दोन्ही गरीबखान्यांमध्ये विस्तव जात नाही. आपले सख्य चाकू और कद्दूसारखे (याने की : विळ्या-भोपळ्यासारखे) आहे. चाकू कद्दू पर गिरा, या कद्दू चाकू पर...कटना तो कद्दूकोही होता है...खैर!

...गेल्या कित्येक बरसमध्ये ना आमच्या मुल्कातून तुमच्याकडे ईदचा शिरकुर्मा गेला, ना तुमच्याकडून दिवाळीला चार चिरोटे आणि चकल्या आल्या!! ना आमच्याकडून तुमच्याकडे बिर्याणीचे पार्सल गेले, ना तुमच्याकडून पुरणपोळी आली! ना आमच्याकडून खिमापाव गेला, ना तुमच्याकडून वडापाव आला...लाहौलबिलाकुवत! आठ-दस हजार बंदूक की गोलियां आणि तोफगोळे ह्यांच्यापलिकडे आपल्यात कसली देवाणघेवाण नाही. ये भी कोई जीना है?
टेररिस्ट सोडून आम्ही आपल्या मुल्कात काहीही एक्‍सपोर्ट केले नाही, ह्याचे फार दुख होते आहे.
असल में (याने की : वास्तविक) दोन पडोसी किती भाईचाऱ्याने राहतात? कधी आम्ही तुम्हाला विचारावे, ‘‘क्‍यों जनाब, आईये चाय पीते है...हमारा एसी आपके एसीसे अच्छा है!’’ त्यावर तुम्ही यावे! त्या एसीच्या इश्‍तिहारमधल्या मूर्तीसारखी आम्ही आपली पीठ (याने की : पाठ) खाजवून द्यावी. दोघांनीही मजेसे चाय पीते पीते मसलत (याने की : चाय पे चर्चा) करावी. किंवा इन्शाल्ला, तुम्ही आम्हाला बोलवावे, अस्सल पंजाबी लस्सी पाजावी, आठ-दहा खजूर पुढे करावेत!
...लेकिन ये हो न सका! न रहे वो अरमान, न रहा वो...जाऊ दे.

अडीअडचणीला एकमेकांच्या वास्ते मध्यरात्री धावून जाणाराच खरा पडोसी असतो. ‘अब यह गलती दुरुस्त करने का हमें मौका दिजिए आलमगीरसाहब!’ असे खत मी लिहिणारच होतो, पण तेवढ्यात तुमच्या मुल्कातून शक्‍करची ऑर्डर आली आणि दिल बाग बाग हो गया!! आपल्या मुल्कात तीनसो लाख टन शक्‍कर पैदा होते, तरीही तुम्ही आमच्याकडून तीस हजार टन शक्‍कर मागवलीत, ह्याचे खरे तर आश्‍चर्य वाटले होते. पण मग लक्षात आले की हा पडोसीचा मजहबच आहे! याने की विरजण देणे हा पडोसीचा धर्म असतो, तसाच विरजण मागणे हादेखील असतो!! हो की नाही?
तीस हजार टन शक्‍करची पोती जल्द-अज-जल्द धाडत आहो. काळजी नसावी!! ह्या शक्‍करची गोडी खूप ज्यास्त आहे. उपरवाला खैर करें, और आप की चाय और भी मीठी हो, उस चाय पे मीठी मीठी चर्चा हो, और आपकी मन की बात पूरी हो, इन मुबारकबातसमेत. शुक्रिया. आपका अपना अब्बासी.

ता. क. : शक्‍करच्या गोण्यांमध्ये शक्‍करच आहे. गोलाबारुद नाही!! पाहिजे तर खात्री करून घ्यावी. परंतु, शक्‍कर आणणाऱ्या आमच्या बंद्यांच्या बंदुका मात्र बंदुकाच आहेत हेही सच आहे!! त्या काढून घेऊ नयेत, ही इत्तला! शुक्रिया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com