सादादंभे..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 29 मे 2018

प्रति, श्री. नानासाहेब फडणवीस

प्रति, श्री. नानासाहेब फडणवीस
 यांसी जय महाराष्ट्र. पालघरातील इलेक्‍शन वगैरे आटपून तुम्ही परत मलबार हिलला गेल्याचे कळले. पालघरातील भाषणात तुम्ही ‘सामदामदंडभेद’ असा शब्द वापरला होता. आम्हाला अर्थ कळला नाही. म्हणून आम्ही तुमच्या भाषणाची क्‍लिप लोकांना ऐकवली. म्हटले, ‘‘तुम्हाला ह्याचा अर्थ सांगता येईल का?’’ त्यावर पालघरच्या जनतेने खांदे उडवले. इतके हायर मराठी तुम्ही प्रचारात कां वापरता? हा खरा सवाल आहे. पालघरचे आमचे प्रभारी (आणि तुमचे लाडके मंत्री) एकनाथभाई शिंदे ह्यांनाही आम्ही ‘सामदामदंडभेद ह्याचा अर्थ काय?’ असे विचारले. ‘‘काही तरी संस्क्रुत शिवी वाटते! कोणी दिली तिच्या * * *...बघतोच त्या ****!!,’’ ते म्हणाले.

‘‘तुमच्या नानासाहेबांनी!’’ आम्ही म्हणालो. त्यावर त्यांनी कानाची पाळी पकडून हातभर जीभ बाहेर काढली. म्हणाले, ‘‘येवढं हायर मराठी येत असतं तर आम्ही राजकारणात कशाला आलो असतो?’’ आम्हाला त्यांचे पटले!! असो. सामदामदंडभेद हा अष्टाक्षरी शब्द तुम्ही वापरला. निवडणूक आयोगाकडे जाऊन अर्थ समजावून घेण्याचे योजत होतो, परंतु त्यांनाही हा अर्थ लागणार नाही, असे सर्वांचे मत पडले. शेवटी तुम्हीच आमचा हायर मराठीचा क्‍लास घ्यावा, अशी सूचना पुढे आली. त्यानुसार हे पत्र लिहीत आहे. आमच्या बांदऱ्याच्या बंगल्यावर आठवड्यातून तीन दिवस येऊन आमची मराठीची शिकवणी घ्यावी. आम्ही तयार आहोत! त्याबदल्यात तुम्हाला आम्ही ‘अस्सल मराठी’, ‘शेलकी मराठी’, ‘इरसाल मराठी’ आणि ‘ठाकरी मराठी’ अशा चार बोली शिकवू!!
कळावे. आपला उधोजी.
ता. क. : शिकवायला घरी येणाऱ्या मास्तरास चहा देण्याची पद्धत आमच्याकडे नाही. कळावे. उ. ठा.
* * *
प्रिय मित्रवर्य उधोजीरावसाहेब, शिकवणीच्या निमित्ताने (का होईना) आम्हाला ‘मातोश्री’वर यायला मिळणार, ह्याचाच आनंद मोठा आहे. आम्ही थर्मासमध्ये आमचा चहा घेऊन शिकवणीसाठी येऊ. तुम्ही शिकवायला तयार असलेल्या चारही बोलीभाषा आम्हाला बोलता येत नसल्या तरी कळतात! हे थोडेसे गुजराथीसारखेच आहे...बोलता येत नाही, पण समजते! असो!!
सामदामदंडभेद ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला नाही, ह्याचे भारी आश्‍चर्य वाटले. वास्तविक त्यात समजण्यासारखे काहीही नव्हते. त्यामुळे न समजण्यासारखेही काही नव्हते. आमच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही ती भाषणाची क्‍लिप तयार केली होती. ज्याअर्थी तुम्हाला सामदामदंडभेदचा अर्थ समजला नाही, त्याअर्थी त्यांनाही समजला नसणार...पण तो एक कोडसंकेत आहे. काही विशिष्ट लोकांसाठीच तो होता. तुम्ही माझे सगळ्यात जवळचे मित्र आहात, म्हणून केवळ तुम्हाला (फक्‍त तुम्हालाच हं!) थोडे विस्कटून सांगतो. त्याचे असे झाले की तुम्ही आमचा उमेदवार पळवून नेल्यानंतर आम्हाला दुसऱ्याच्या घरातून उमेदवार पळवावा लागला. हे म्हंजे देवळाच्या दारातून नानासाहेबांच्या नव्याकोऱ्या चपला चोरीला गेल्या म्हणून नानासाहेबांनी अण्णासाहेबांचे डब्बलबारी सॅंडल पळवले आणि अण्णासाहेब अनवाणी घरी परत गेले, त्यापैकी झाले. एवढे घडल्यानंतर आम्ही बेत शिजवला...तो असा! जरा कान इकडे करा!!-
साम-सावजी मटण (हे नागपूरसाइडचे असते...झणझणीत! खाऊन बघा!!) दाम-दाबून मटकवा. (ह्याचा अर्थ काय सांगायचा? चार वर्षे सत्तेत आल्याला झाली!! असो.) दंड- दंगा डब्याचा...(सावजी मटण खाल्ल्यानंतर ह्याचा अर्थ पाठोपाठ समजेल! असोच!!)
भेद- भेरकावून दगड (वापरा)...कळला आता अर्थ?
सावजी मटण दाबून मटकवा (नंतर) दंगा डब्याचा (झाल्यास) भेदून दगड (वापरा) इज इक्‍वल टु सामदामदंडभेद!! (कंसातले शब्द विस्कटून सांगण्यापुरतेच आहेत...उच्चारायचे नाहीत.) ह्यात पर्यावरण सांभाळा हा स्वच्छता अभियानाचा संदेश दडलेला आहे. ह्यात साधेच तर मराठी आहे...
तेव्हा उगीच घायकुतीला येऊ नका...पुढल्या वर्षी आपण एकत्रच निवडणुका लढवणार आहोत. हो की नाही? कळावे. आपला नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article