पावसाचे स्वप्न ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 2 जून 2018

आभाळाला फुटतो पान्हा
ओठिं उन्हाच्या उष्ण झळा
मांडीवरच्या तान्ह्यासाठी
पाणवठ्याला तीव्र कळा

कढईमध्ये जीवित फुटते
भवतालाची फुटे शेगडी
मरुभूमीतील मुसाफिराची
स्वप्ने हिरवी आणि बेगडी

उन्हे वितळली रस्त्यांमधुनी
आयुष्याचे होते डांबर
पिपात रटरट सडकेवरती
उन्हे ओतते निर्दय अंबर

काळोखाच्या विहिरींमधुनी
हिन्कळणारे कृष्णघडे
ठिणग्या पेरुन शेतामध्ये
रोखून धरतो शुष्क रडे

चरचरणारी जमीन होते
राखेमधला छुपाच विस्तव
तळपायाच्या फोडांमधुनी
आकांताचा होतो उद्‌भव

आभाळाला फुटतो पान्हा
ओठिं उन्हाच्या उष्ण झळा
मांडीवरच्या तान्ह्यासाठी
पाणवठ्याला तीव्र कळा

कढईमध्ये जीवित फुटते
भवतालाची फुटे शेगडी
मरुभूमीतील मुसाफिराची
स्वप्ने हिरवी आणि बेगडी

उन्हे वितळली रस्त्यांमधुनी
आयुष्याचे होते डांबर
पिपात रटरट सडकेवरती
उन्हे ओतते निर्दय अंबर

काळोखाच्या विहिरींमधुनी
हिन्कळणारे कृष्णघडे
ठिणग्या पेरुन शेतामध्ये
रोखून धरतो शुष्क रडे

चरचरणारी जमीन होते
राखेमधला छुपाच विस्तव
तळपायाच्या फोडांमधुनी
आकांताचा होतो उद्‌भव

वस्ती उठली, वृक्षही वठले
ऐन दुपारी मेले गाव
सुक्‍याप्रमाणे वणव्याला अन्‌
ओल्याचीही असते हाव

उघड्या देहामध्ये उतरते
रात्र दुकाळी तेव्हा अलगद
पडेल वाऱ्याशी अवखळते
ऊरात घेऊन कसली गदमद

अर्धी पागल रात्र उतावीळ
लागे दिवसालाहि पिसें
नश्‍वरतेच्या नशिबाला अन्‌
तप्त बिछाना आणि उसे

करवट घेतो सैल उकाडा
चराचराला पडते कोरड
तारेवरची घूक अमंगळ
नजर रोखिते उगाच बेरड

सुस्त डांबरी सडकांवरती
गदमदणारी करुण गर्दी
वावधुळीच्या वाहतुकीतच
कृष्ण ढगांनी द्यावी वर्दी

...आणि अचानक ऐन दुपारी
असले काही बाही व्हावे
भिरमिटलेल्या भवतालाचे
मस्तक जागेवरती यावे

थेंब टपोरा टपकन यावा
ओले व्हावे खुशाल मनगट
चमकून आभाळात पहावे,
भाळावरती यावे थेंबुट

क्षणात व्हावे होते नव्हते
शुष्क मातीचा व्हावा गुदमर
ृमृद्‌गंधाच्या नि:श्‍वासाला
माणुसकीचा यावा गहिवर
सृष्टीच्या जरि अंगी असले
ऋतुचक्राचे येणेजाणे
तरि मरुभूमित मुसाफिराच्या
मानत असते पाऊसगाणे

जसे बांडगुळ मनात जपते
हिरव्या खोडाचे आकर्षण
अमरवेलीची मनात पिवळ्या
हिरव्या मेंदीचे अन्‌ कुंपण

तसे उन्हाच्या मनात असती
पर्जन्याचे लक्ष उखाणे
पाठपखाल्या उंट गुणगुणे
अज्ञातातील पाऊसगाणे

आभाळाला फुटतो पान्हा
ओठीं उन्हाच्या उष्ण झळा
मांडीवरच्या तान्ह्यासाठी
पाणवठ्याला तीव्र कळा

कढईमध्ये जीवित फुटते
भवतालाची फुटे शेगडी
मरुभूमीतील सरड्यालाही
स्वप्ने हिरवी आणि बेगडी

Web Title: editorial dhing tang british nandi article