टेप बाय टेप! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सकाळी अंथरुणात मस्तकावर पांघरूण घेऊन वारुळातील समाधिस्थ साधूप्रमाणे बसलो असतानाच घराच्या दाराची घंटा वाजली. पाहतो तो काय ! दारात साक्षात शहंशाह अमितशाह ऊर्फ मोटाभाई उभेच्या उभे !! आम्ही डोळे चोळून बघितले तरी अदृश्‍य झाले नाहीत. म्हणून म्हटले, ‘याना या, आत या !’
प्रसन्नचित्त मोटाभाई भस्सकन घरात घुसले आणि म्हणाले, 'आवो, आवो, अहियां बेसो !' आम्ही विनम्रतेने ‘थॅंक्‍यू’ म्हटले. 'तमे केम छो? बद्धा सारू छे ने?' त्यांनी प्रेमळ चौकशी केली. आम्ही अच्छे दिन आल्यासारखा चेहरा करून ‘चोक्‍कस’ असे म्हटले. हल्ली पहिल्यासारखे उकडत नाही, असेही सांगून मोकळे झालो.
' शतप्रतिशत प्रणाम मोटाभाई, बोलावणं धाडलं असतं तर आम्ही आलो असतो !' विनम्रतेने आम्ही म्हणालो. पूर्वीच्या काळी (पक्षी : कांग्रेसच्या काळात) आम्ही थोरामोठ्यांशी अदबीने बोलत असू. हल्ली विनम्रतेने बोलतो.
'जुओ, तमारीपासे मारा एक बहु इंपोर्टंट काम छे... छेल्ला वरस आम्ही लोगांनी जबरदस्त काम केला. एटला काम तो सत्तर वरसमां झ्याला नाय !! सांभळ्यो? आपडो मोदीजी तो कंटिन्यू काम करे छे. दिवस नथी, रात नथी... जागा त्याथी सवार... एटला काम झ्याला, पण लोगांना अजून माहिती नाय झ्याला...' मोटाभाई गंभीरपणाने बोलू लागले. हे खरे होते. गेल्या साडेचार वर्षांत इतकी कामं झाली, पण लोकांना त्याचे काय?
'हां, हां, सध्या तुम्ही जनसंपर्क अभियानावर आहात ना?' आम्ही.
'सध्या स्टेप बाय स्टेप जातोय...’ ’त्यांनी खुलासा केला. त्यांना बहुधा टेप बाय टेप म्हणायचे असावे. सगळीकडे तीच टेप !!
'व्वा ! गेल्या आठवड्यात कपिल देवकडे जाऊन आलात, परवा रामदेवबाबांकडे गेला होता...' आम्ही गुडघ्यावर थापट्या मारत म्हणालो.
'तमे खबर छे? कसा काय?' आश्‍चर्याने मोटाभाईंनी विचारले. वास्तविक हे सगळे पेपराबिपरात छापून आले होते. पण सीक्रेट माहीत असल्यासारखा चेहरा करून आम्ही मान डोलावली.
'ठेवतो आम्ही खबर... शिवाय परवा रामदेवबाबाजी आमच्याकडे येऊन गेले ना...' आम्ही डोळे मिटून म्हणालो.
'बाबाजी अहियां आव्या हता? शुं काम?' संशयाने मोटाभाईंनी विचारले.
'साबणचुरा विकायला !' आम्ही शांतपणे उत्तर दिले. मोटाभाईंनी विषय शिताफीने बदलला.
'आ जुओ... गेल्या साडेचार वरसमदी आम्ही त्रण करोडपेक्षा जास्त महिलाओंमाटे गेसना प्रबंध किधा !' त्यांनी आपल्या हाताचे पहिले बोट मोडत सांगितले.
'हो, हो ! गावाकडल्या चुली फुंकणाऱ्या लाखो भगिनीमातांच्या घरी तुम्ही ग्यास पोचवलात ! त्यासाठी चार करोड लोकांनी ग्यासची सबसिडी सोडली... तेच ना?' आम्ही.
'आ पण तमे खबर छे? कम्मालज थई' मोटाभाई पुटपुटले. पण त्यांनी तेवढ्यात आपले दुसरे बोट मोडले.
'युरियाच्या नीम कोटिंग करून किसानभाईमाटे आम्ही-' त्यांचे वाक्‍य आम्ही पुरे होऊ दिले नाही. 'हो हो, युरियाचा काळाबाजार होत होता. तुम्ही नीम कोटिंग केल्यामुळे त्याचा काळाबाजार थांबला आणि लाखो शेतकऱ्यांना युरिया मिळाला...तेच ना?' आम्ही.
'हे राम... आ पण तमे खबर छे?' मोटाभाई आता हतबुद्ध झाले.
'स्वच्छता अभियानात तुम्ही लाखो शौचालये बांधली. चाळीस लाख लोकांची जनधन खाती उघडली. सत्तेचाळीस लाख घरे बांधण्याची तुमची योजना आहे. झालंच तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी-,' ह्या वेळी मोटाभाईंनी सद्‌गदित होऊन आमच्या तोंडावर हात ठेवला.
'देशासाठी आम्ही एवढा केला की नाय?' त्यांनी विचारले. पण त्यानंतर आम्ही त्यांचा पंजा आमच्या तोंडावरून दूर करत म्हणालो, ते ऐकून मोटाभाई घाईघाईने निघूनच गेले. आम्ही इतकेच विचारले की, 'का हो मोटाभाई, हे सगळं कुठल्या देशात घडलं?'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com