सेल्समन ! (एक लघु व बोधकथा...) (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

टळटळीत उन्हात मोटाभाईंनी आभाळाकडे पाहिलं. डब्यात चार ठेपले होते. त्यातले दोन संपवले. दोन संध्याकाळसाठी ठेवले. न जाणो कुठं काही मिळालं नाही तर पोटाला आधार तरी होईल. पाण्याची बाटली काढून दोन घोटदेखील संपवले. तेही संध्याकाळपर्यंत थोडं ठेवलं पाहिजे...

खरंतर मोटाभाईंना एवढी वणवण करण्याची जरुरी नाही. घरचं तसं बरं आहे. गुजरातसाइडला आहे त्यांचं घर. जुन्या वडलार्जित घरावर नुकताच त्यांनी एक मजलाही चढवला आहे म्हणे. पण मजला चढवता चढवता खूप खर्च झाला. त्यानं मोटाभाईंची झोप उडाली. तशी मुलं हाताशी आली आहेत, पण मोटाभाईंचा कुणावर विश्‍वास नाही...

घटकाभर फुटपाथवर थांबून त्यांनी श्‍वास घेतला. तेवढ्यात एक पोलिस आला.
‘‘कायाय रं पिसवीत?’’ हातातली काठी थैलीवर मारत त्यानं संशयानं विचारलं.
‘‘साबणचुरा, अगरबत्ती, भांडी घासायची पावडर...जुओ ने!’’ असं म्हणत मोटाभाईंनी घाईघाईंनं थैलीचं तोंड उघडलं. पोलिसाचा मूड गेला! ‘इधर बैटने का नय’ असा उगीचच दम मारून तो पुढे निघून गेला. मोटाभाईंनी मग पुन्हा एकदा सामानाची थैली उचलली.

उंच उंच इमारतींमधल्या कुठल्या फ्लॅटची घंटी वाजवावी? मोटाभाई विचार करत राहिले. दुपारी ही माणसे जेवून आडवारतात. अशा वेळी विक्रेता दारात आलेला त्यांना आवडत नाही. पण काय करणार? धंदा आहे, म्हटलं की हे सगळं करावं लागतं.
एका बंगल्याच्या आवारात ते डोकावले. एक वृद्ध बाबाजी गाडी धुण्यात मग्न होता. मोटाभाईंनी संधी साधून बंगल्यात शिरकाव मिळवला. कमल ब्रॅंडच्या साबणचुऱ्यानं गाडी धुतली तर नवीकोरी चमकते. ‘वापरून बघा,’ अशी गळ घातली. एकावर एक फ्री पुडा देण्याची ऑफर दिली. बाबाजीनी एक पुडा घेतला.

मोटाभाई चालत पुढे निघाले. रस्त्यालगतच्या एका इमारतीतून त्यांना गाण्याचे सूर ऐकू आले. ‘‘अल्ला तेरो नाम, ईश्‍वर तेरो नाम...’ मोटाभाईंचे पाय नकळत तिकडे वळले. एक ख्यातनाम गायिका रियाझात मग्न होती. त्या सुरांच्या मंदिरातलं वातावरण भारून गेलं होतं. मोटाभाईंनी नम्रभावाने पायताणं काढून बैठक मारली. थैलीतून एक अगरबत्ती काढून पेटवली. वातावरण मंत्रभारले झाले. गायिकेनं किंचित स्मित करत तानपुरा गुंडाळला. पर्स उघडून अगरबत्तीचे दोन पुडे घेतले...
मोटाभाईंनी आणखी काही रस्ते ओलांडले. एका आलिशान घराची घंटी वाजवली. एका सुस्वरूप स्त्रीने हसतमुखाने दार उघडले. तिच्या हातात एक बादली होती व त्यात एकच कागद होता.
‘‘साबणचुरा हवाय? अगरबत्ती? गाईचं तूप? भांडी घासायची पावडर?’’ मोटाभाई म्हणाले.
‘‘ हे सगळं माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. तुमच्याकडे नवीन काही आहे का?’’ मंजुळ आवाजात ती स्त्री म्हणाली.
‘‘नवीन शुं?’’मोटाभाई गोंधळले.
‘‘पेट्रोल आहे का?’’
‘‘प...प...पेट्रोल?’’ मोटाभाई हादरले.
‘‘माझ्या मोटरसायकलमध्ये भरायचं आहे...,’’ मधुरस्मिताची मालकीण म्हणाली.
...ह्या जगात पेट्रोलची नव्हे, तर शुद्ध गाईच्या तुपाची गरज आहे. गाईचं तूप खाल्ल्याने ऊर्जा मिळून उरलेली बकेट लिस्ट पूर्ण करता येईल. पेट्रोलही पर्वडेल, असा सेल्स टॉक मोटाभाईंनी कळकळीनं दिला. मधुरस्मिताच्या मालकिणीनं एक तुपाचा डबा घेतला...

प्रत्येक घरात विक्री झाल्याच्या आनंदात मोटाभाई बाहेर पडले. बरीच पायपीट झाल्यानं त्या दमलेल्या जिवानं अखेर पुन्हा फुटपाथवर विश्रांती घेतली. कनवटीच्या नोटा मोजून टोटल केली. बरी कमाई झाली होती. मग समाधानानं त्यांनी ठेपल्यांचा डबा उघडला, मनाशी म्हणाले, ‘इथून बांदऱ्याला जायचं. त्याआधी थोडं खाऊन घेतलेलं बरं...तिथं काही मिळालं काय, नाही मिळालं काय...की फर्क पईंदा? ...शेवटी सारा खेळ दोन ठेपल्यांसाठी तर चालला आहे!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com