भेटीनंतर...! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री प्यालेस, वांद्रे बुद्रुक.
वेळ : रात्री उशिरा...
प्रसंग : सुटकेचा निःश्‍वास!
पात्रे : आमचे लाडके उधोजीसाहेब आणि प्रिन्स विक्रमादित्य!
..........................................
विक्रमादित्य : (दार ढकलत)...हाय देअर! बॅब्स, मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (कानटोपी चढवत) नको!...गुड नाइट!!
विक्रमादित्य : (कुतुहलानं) बॅब्स, तुम्ही आजच्या बैठकीसाठी मागवलेला ढोकळा, गाठिया, फाफडा आपल्या फरसाणवाल्याकडूनच मागवला होता ना? की ते शहा अंकल घेऊन आले होते?
उधोजीसाहेब : (थंडपणाने) ते काही देण्यासाठी आले नव्हते, घेण्यासाठी आले होते!
विक्रमादित्य : (हुरळून) काहीही म्हणा, बैठक सकारात्मक झाली! लोक पोटभर जेवून समाधानाने गेले!!
उधोजीसाहेब : (खवचटपणे) त्याअर्थी बैठक ‘डकारा’त्मक झाली!
विक्रमादित्य : (टाळी वाजवत) मजा आली आज...नै?
उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी मोडत) कसली डोंबलाची मजा? क्‍येवढं टेन्शन होतं मला!
विक्रमादित्य : (टाळी वाजवत) घरी गेस्ट आले की मज्जा वाटते मला! सकाळी मी आपल्या मिलिंदाकाकाला विचारलंसुद्धा की ‘कोणी येणार आहे का?’ मिलिंदाकाका म्हणाला, की ‘आज बाबांना त्रास देऊ नकोस...त्यांना टेन्शन आलं असेल!’’
उधोजीसाहेब : (धुसफुसत) अफझुल्ला खान स्वराज्यात शिरल्यावर कोणालाही टेन्शन येणारच! खरं तर कलानगरच्या वेशीवर तंबूच बांधणार होतो ह्या भेटीसाठी! पण माणूस ‘घरीच येणार’ म्हणून हटून बसला!! हॅ:!!
विक्रमादित्य : (भोळेपणाने) कित्ती चांगले आहेत ना ते शहा अंकल? आल्या आल्या मला म्हणाले, ‘‘केम छो तमे? अरे, खरा तर मी तुलाज भेटायला अपोइंटमेंट घेतली होती! मला तुज्या डेडींना भेटायच्याज नाय! हाहा!!’’
उधोजीसाहेब : (धुमसत) मला भेटायचंच नाही म्हणे! वा रे वा!! हरभऱ्याच्या झाडावर चढवत होते तुला ते!!
विक्रमादित्य : (ठामपणाने) नोप! आत्ता तुझ्या डॅडींशी बोलून घेतो, मग फायनल बोलणी आपणच करु, असा शब्द दिलाय त्यांनी मला!!
उधोजीसाहेब : (कपाळावर हात मारत) अरे देवा!! म्हणून मी म्हणत होतो, हा गृहस्थ दिसतो तितका सरळ नाही...
विक्रमादित्य : (हात उडवत) तुम्हाला काय, आपले देवेंद्र अंकलसुद्धा सरळ वाटत नाहीत! ॲक्‍चुअली ही सगळी चांगली जंटलमन माणसं आहेत, असं माझं हंबल ओपिनियन आहे!
उधोजीसाहेब : (विचारात पडत) जंटलमन माणसं प्लेटभर ढोकळे, वाडगाभर फाफडा नि गाठिया खातात का कधी!!
विक्रमादित्य : (ओठांचा चंबू करत) काहीही हं बॅब्स! शहा अंकलनी फक्‍त दोन ढोकळे उचलले! मी स्वत: पाहिलं...विथ माय ओन आइज!!
उधोजीसाहेब : मी तुझ्या देवेंद्र अंकलबद्दल बोलतोय!
विक्रमादित्य : (मुद्द्यावर येत)...ते जाऊ दे! आपलं काय ठरलं?
उधोजीसाहेब : (गुडघे चोळत) बारा आण्याचा मस्का लावल्यावर मी पाघळेन असं वाटलं की काय त्यांना? वाट बघा म्हणावं!!
विक्रमादित्य : घरात आलेल्या गेस्टला असं तिष्ठत ठेवणं बरं नाही बॅब्स!
उधोजीसाहेब : मी नाहीच ठेवत! दहा मिनिटांत फुटवतो मी!!
विक्रमादित्य : (मुद्दा रेटत)...कधी नव्हेत ते, आले आपल्या घरी! चांगले दोन-अडीच तास बसले होते! मला वाटतं युती केलेली बरी!!
उधोजीसाहेब : (खुन्नस देत) उद्या राहायला येतील आणि तुमचा पक्ष आमच्यात विलीन करा म्हणतील! चालेल का? काहीही झालं तरी आता स्वबळावर लढायचं ठरवलंय ना आपण? आणि युती करायची म्हटलं तर आपल्या लोकांना काय सांगणार?
विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) आयडिया! आपण स्वबळावर युती करूया!! ओक्‍के?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com