प्रभारी! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 12 जून 2018

(एक पत्रव्यवहार...काल्पनिक!)

प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील,
महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मलबार हिल, बॉम्बे

(एक पत्रव्यवहार...काल्पनिक!)

प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील,
महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मलबार हिल, बॉम्बे

विषय : गोपनीय व महत्त्वाचा.
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मी येत्या शनिवारी आठ-दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहे. येथे (मुंबईत) प्रचंड उकडते आहे, म्हणून मी थंड हवेच्या प्रदेशात चाललो आहे, असे कृपा करून समजू नये. नागपूरचा माणूस उकाड्याला कधी घाबरत नाही. केवळ महाराष्ट्राच्या भल्यासाठीच माझा हा दौरा आहे. माझ्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा कारभार कोण पाहणार, अशी विचारणा दिल्लीहून वरिष्ठांनी केली आहे. मी तुमचे नाव सुचवतो आहे. याचा अर्थ मी नसेन, तेव्हा तुम्हीच महाराष्ट्राचे प्रभारी मुख्यमंत्री असाल. ही अत्यंत जबाबदारीची कामगिरी आहे, ह्याचे भान असू द्यावे. माझ्या अनुपस्थितीत परिस्थिती आपण चांगली हाताळाल, अशी आशा व अपेक्षा आहे. तथापि, आपले कारभारीय कसब दाखवण्याची संधीही ह्या निमित्ताने तुम्हाला मिळेल, त्याचा बिलकुल फायदा उपटू नये ही विनंती.
 कळावे. आपला. नानासाहेब.
ता. क. : तुम्ही प्रभारी असलात तरी परदेशातून माझे लक्ष असेल, ह्याचीही नोंद घ्यावी.
 नाना.
* * *

प्रति, मा. मुख्यमंत्री,
ंमहाराष्ट्र राज्य,
आपले पत्र मिळाले. आमच्या कार्यालयातील शिपायाने चुकून ते नोटीस बोर्डावर लावल्याने पत्र गोपनीय राहिले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहे. पण माझे नाव सुचवल्याबद्दल शतप्रतिशत धन्यवाद. ह्या आठ-दहा दिवसांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी पराकाष्ठा करीन.
आठ-दहा दिवसांसाठी (का होईना) आपण राज्याचे मुख्यमंत्री होणार, ह्या कल्पनेने काल रात्री झोप लागली नाही. सकाळी उठून इमानेइतबारे मंत्रालयात गेलो. एरवी लिफ्टमन आमच्याकडे ढुंकून पाहात नाही. आज चक्‍क सलाम केला. तुमच्या क्‍याबिनची कडी (आतून) लावून घेतली आणि खुर्चीत बसून गरागरा गरागरा फिरून घेतले!! टेबलाचे ड्रावर उघडून फायली काढण्याचा बेत मात्र तडीला गेला नाही. (सर्व फायली कडीकुलपात बंद करून गेलात!!) मुख्यमंत्री म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला हवेत, अशी अनिवार इच्छा होती. पण ‘इथे काहीही काम होत नाही’ असे सांगण्यात आले.
‘‘असं कसं? मुख्यमंत्र्याला काही ना काही काम असेलच ना?’’ मी टेबलावर मूठ हापटून विचारले.
‘‘ कामं विविध खात्यांमध्ये होत असतात. इथं आराम असतो!,’’ तिथल्या एका अधिकाऱ्याने शांतपणे सांगितले. हैराण झालो आहे! पुढला आठवडा कसा निभणार, ह्या विवंचनेत आहे. कळावे.
 आपला. दादासाहेब.
ता. क. : मंत्रिमंडळ विस्तार मी करून टाकू काय? कळवावे. दादा.
* * *
दादासाहेब-
तुमचे पत्र मिळाल्यापासून बाहेर बर्फात जाऊन बसलो होतो. तुमचा ताजा कलम वाचून हादरलो आहे. ‘मंत्रिमंडळ विस्तार करून टाकू का?’ ही मागितलेली परवानगी आहे की धमकी? मी येईपर्यंत कश्‍शालाही हात लावू नये ही कळकळीची विनंती. माझ्या क्‍याबिनमध्ये घुसून खुर्चीत गरागरा फिरलात, इतपत ठीक आहे. पण माझ्या क्‍याबिनमध्ये बसून डबा खाऊ नये! झुरळे होतात. मध्यंतरी उंदीर झाले होते, आठवते आहे ना?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काहीही काम नसते, हे उघडे गुपित आहे. तरीही त्याची वाच्यता करू नका. मी लौकरच परत येत आहे. (हा इशारा आहे...) यावेच लागेल, असे एकंदर तुमच्या पत्रावरून वाटू लागले आहे! कळावे.
 नाना.

Web Title: editorial dhing tang british nandi article