पगडी : एक चिंतन ! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

सांप्रतकाळी पगडी कोणीही घालत नाही, ह्याचे आम्हांस अपरंपार दु:ख होते. आम्ही वगळता कोणाच्याही शिरोभागावर हा दागिना हल्ली दिसत नाही. (पाहा : मजकुराखालील आमचे रुबाबदार चित्र..!) हे...हे...हे...सर्वथा गैर आहे. जगतातील अनेक प्रजाती कालौघात नष्ट जाहल्या. अनेक सत्ता उलथल्या. धुळीस मिळाल्या. तद्वत पगडी हे शिरोभूषणदेखील नामशेष होत असल्याचे पाहून आमच्या तळपायाची आग (पगडीयुक्‍त) मस्तकी जात आहे.

वास्तविक, पगडी हे विद्वत्तेचे शुभंकर चिन्ह आहे. पगडी हा अभिजनांचा अलंकार आहे. पगडी ही संस्कृतीची शोभा आहे. ‘ज्याच्या मस्तकी पगडी, त्याची बुद्धी तगडी’ अशी म्हणच आहे. ह्या शिरोभूषणाची इतकी महती असूनही हल्ली जनलोक भलभलत्याच टोप्या घालून हिंडू लागल्याचे पाहून आमचे शिर दुखूं लागले आहे. पगडीचा स्पर्शच मुळी वर्णनातीत आहे. तिचे ते रेशमी आवरण. त्यावरील तुरा...जरीचे कलाबुती काम. कपाळावरील कमल, आतील मुलायम गाभा... अहाहा !! पगडीच्या गोलाकार घेऱ्यामुळे शिराचे रक्षण होतेच, परंतु टांग्यात बसतानाही बरे पडते !! परंतु कालौघात भलभलत्या टोप्या बाजारात आल्याने पगडीचा पगडा कमी झाला.
मुंबईत पगडीपेक्षा पागडीचे वजन अधिक. चाळमालकाला पगडी उचलून दिली की दोन खोल्या आपल्या होतात, अशी आमच्या भाबड्या मनाची आपली समजूत होती. पण ती पगडी मोजून देण्याची असते, हे फार उशिरा कळले ! पण हल्ली ती पागडीदेखील नामशेष होऊ लागली आहे.

आमचा त्या पागडीशी संबंध आला नाही, पण बालपणापासून आम्हाला पगडीचे मात्र भारी अप्रूप. आम्ही पगडी मुळीसुद्धा घालू नये, ह्यासाठी सारीजणे आमची समजूत काढत. आम्हास डोके जरा कमी असल्याने पगडी फिट्ट बसणार नाही, असे सर्वमान्य मत मान्य करून आम्ही मान तुकवली असती, तर आज आमच्या मस्तकावर ही पगडी नसती. (पुन्हा पाहा : मजकुराखालील आ. रु. चि..! ) वस्तुसंग्रहालयाच्या दुर्लक्षित कोपऱ्यात अश्रू ढाळत बसलेल्या एखाद्या अनामिक प्राचीन अर्धपुतळ्यासारखी पगडीची अवस्था आता झाली आहे. पुणेकरांनो, ह्याला कोण जबाबदार? बोला, बोला ना?
...आमच्या दुर्दैवाने पुणेकरांनी पगडीचा त्याग केला.(...पण विद्वत्तेचा नव्हे!!) पगडी गेली, तेव्हा ‘ब्रूटस तूसुद्धा?...तर मग सीझरला मरायलाच हवे’ ह्या शेक्‍सपीअरच्या चालीवर आम्ही हंबरडा फोडायचे तेवढे बाकी ठेवले होते. पुणेकरांनी पगडीप्रथेचा त्याग केला तेव्हापासून मराठी संस्कृतीच्या ऱ्हासास सुरवात झाली, असे ढोबळ मानाने म्हणता येईल. खरा पराभव पानिपतावर नव्हे, पगडीवर झाला, असा आमचा निष्कर्ष आहे.

दरम्यान, मुळा-मुठेतून बरेच पाणी वाहून गेले. (आईशप्पत..खरंच!) नियतीच्या मनातच वेगळीच टोपी होती. पुणेकरांच्या डोईवर हेल्मेटसारखे अपमानास्पद शिरस्त्राण दिसो लागले. पण करावे तसे भरावे! पुणेकरांनी पगडीची साथ सोडली नसती, तर आज हेल्मेटसक्‍तीची कटकट डोक्‍यावर आली नसती! पगडीने काम भागले असते! जस्ट इमॅजिन करा...नळ ष्टापाच्या सिग्नलला भरधाव सुटलेले पगडीधारी गाडीवाले! (खुलासा : पुण्यात टू व्हीलरची गाडी होते...) ‘विदाऊट पगडी’ असे दंडाच्या पावतीवर कारण लिहून पैका मोजून घेणारे ट्राफिक पोलिस !!... ‘रूपाली’च्या टेबलावर चहाच्या कोपाशेजारी ठेवलेली घेरेदार, तुरेदार पगडी !! पण हे होण्यातले नव्हते.
...परवा तर कहर झाला ! पुणेरी पगडीचे भर सभेत वस्त्रहरण झाले. जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचावयाची पाळी यावी? (खुलासा : फुले...म्हंजे पुष्पे, सुमने, कुसुम वगैरे...तुम्ही म्हंजे ना...जांव दे!)
कारागृहाच्या शृंखला भेदून ‘पुनश्‍च हरि ॐ’ करणाऱ्या एका थोर नेत्याने भर सभेत पुणेरी पगडीचा त्याग करून नवे शिरोभूषण चढवले. मनाशी म्हणाला : शिर सलामत, तो पगडी पचास !
काळाचा महिमा, दुसरे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com