कारभाराची सूत्रे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 19 जून 2018

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० निज ज्येष्ठ शु. पंचमी.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार। परि स्वगृही परतणे हा आनंद की अपार।।
........................................

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० निज ज्येष्ठ शु. पंचमी.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार। परि स्वगृही परतणे हा आनंद की अपार।।
........................................
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मी परत आलो!! काल रात्री उशिरा सुखरूप मुंबईत पोचलो. मुंबई ते कॅनडा, कॅनडा ते अमेरिका, अमेरिका ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई...केवढा तो प्रवास! जाताना हातात एकच बॅग होती, येताना पाच होत्या!! अमेरिकेत जाऊन आल्यावर असेच होते. दबकतच बंगल्यात शिरलो. पण अचानक मनात आले, अरेच्चा, आपण आपल्याच घरात दबकत का शिरतो आहोत? मग ताठ मानेने आत आलो. जेमतेम दहा-बारा दिवसांचा अमेरिका दौरा होता. पण कधी एकदा घरी जातो असे झाले होते. पण घरी परत आल्यावर कुटुंबाने उत्साहाने विचारले, 'जेवून आलाच असाल!' निमूटपणाने ‘हो’ म्हटले.
'माझ्याकडे कोणी आलं होतं?' मी विचारले.
'चंदुदादा कोल्हापूरकर आले होते. काहीतरी वस्तू ठेवून घाईघाईने निघून गेले...,' कुटुंबाने माहिती दिली. उत्सुकतेने मी विचारले, 'कुठाय ती वस्तू?'
'थोड्या वेळाने विनोद तावडेजी आणि मुनगंटीवारजी येऊन ती वस्तू घेऊन गेले...' कुटुंबाने सांगितले. सत्यनाश!
'आहो, ती राज्याच्या कारभाराची सूत्रं होती...' कपाळावर हात मारून मी ओरडलो. ‘मला काय माहीत?’ असे काहीसे पुटपुटून कुटुंब आतल्या खोलीत नाहीसे झाले.
रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून मंत्रालयात जायचे होते. पण हातात राज्याची सूत्रेच नाहीत, तर जाऊन करणार काय? चडफडत घरातच बसलो. सकाळी पीए आले, तेव्हा त्यांना तातडीने महाराष्ट्राच्या सूत्रांची चौकशी करायला सांगितले. ‘होम डिपार्टमेंट आपल्याकडेच असल्याने मिसिंगची कंप्लेंट देऊन टाकावी,’ असा सावधगिरीचा सल्ला त्यांनी दिला. ‘राज्याची सूत्रे हरवून चालणार नाहीत, लौकरात लौकर शोधा,’ असे मी त्यांना फर्मावले. आम्ही दोघांनीही सगळी कपाटे, फायली पालथ्या घातल्या. कुठ्ठेही सूत्रे सापडायला तयार नाहीत! अशाने महाराष्ट्राचे कसे होणार?
'इतके दिवस ती कुठे होती?' पीएंनी विचारले. कुठे म्हंजे? हा काय प्रश्‍न झाला? अर्थात माझ्याकडेच होती!!
'महाराष्ट्राच्या कारभाराची सूत्रे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडेच असतात,' मी शक्‍य तितक्‍या शांत सुरात म्हणालो, 'अमेरिकेला जाण्यापूर्वी मी ती आमच्या एका ज्येष्ठ सहकाऱ्यांकडे ठेवायला दिली होती. त्यांनी परत आणून दिली, असं कळतंय! शोधा आता लौकर!!'
' बांदऱ्याला फोन करून विचारलं तर? चुकून त्यांच्याकडे गेली का म्हणून?,' पीएंनी विचारले. इतक्‍या निरागस, भाबड्या माणसाला कोणी नेमले असेल पीए? जाऊ दे झाले!
'इथंच असतील कुठेतरी, तुम्ही शोधा प्लीज!,' मी म्हणालो.
'दिल्लीत राहिली असतील...ना?,' पीएंनी पुन्हा विचारले. मी हतबल झालो. शोधाशोध करत असतानाच अचानक खुद्द चंदुदादा कोल्हापूरकर चष्मा पुसत हजर झाले.
'कधी आलात?' त्यांनी जणू काही मी नागपूरहून आल्यागत विचारले.
'आत्ताच! अहो, माझी सूत्रं कुठे ठेवलीत...जाताना आठवणीने तुम्हाला देऊन गेलो होतो...,' मी कळवळून म्हणालो.
'कसली सूत्रं?'
'अहो कारभाराची सूत्रं!! तुम्हाला देऊन गेलो नव्हतो का? काल तुम्ही ठेवून गेलात, असं मला कळलं...' मी रडकुंडीला आलो होतो.
'हां हां!! ती नेलीच नाहीत मी! मंत्रालयात असतील!!,' त्यांनी पुन्हा एकदा चष्मा पुसायला घेतला.
...ह्या शोधाशोधी पायी आख्खा एक दिवस वाया गेला. हुश्‍श! मंत्रालयात उद्या जाऊ, तेव्हा घेऊ, असे म्हणून मी सोफ्यावर बसलो.
विचार आला, नाहीतरी सूत्रांवाचून काय अडतंय?

Web Title: editorial dhing tang british nandi article