आमचे योगसूत्र ! (ढिंग टांग)

शुक्रवार, 22 जून 2018

प्रात:स्मरणीय योगमहर्षी पतंजलींचे स्मरण करोन आम्ही सर्वप्रथम योग दिवसानिमित्त आमच्या लाखो वाचकांना भरभरून शुभेच्छा देत आहो ! योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत आहे. आम्हीही रिकाम्यापोटी हे शुभेच्छांचे वाटप करीत आहो. एकंदरित आम्हाला व्यायामाचे वावडें असले तरी योगासनांचे महत्त्व आम्हाला नुकतेच पटले आहे. बरोब्बर चार वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही योगाभ्यासास ‘आळशांची तालीम’ असे हिणवत असू. परंतु आमचे दात आता घशात गेले आहेत !!

प्रात:स्मरणीय योगमहर्षी पतंजलींचे स्मरण करोन आम्ही सर्वप्रथम योग दिवसानिमित्त आमच्या लाखो वाचकांना भरभरून शुभेच्छा देत आहो ! योग दिनाच्या शुभेच्छा ह्या सर्वसाधारणपणे अनेशापोटी द्यायच्या असतात, हे सुज्ञ वाचकांना माहीत असेलच. कारण भरल्यापोटी भलभलती योगासने करू नयेत असा शरीरशास्त्राचा नियम सर्वश्रुत आहे. आम्हीही रिकाम्यापोटी हे शुभेच्छांचे वाटप करीत आहो. एकंदरित आम्हाला व्यायामाचे वावडें असले तरी योगासनांचे महत्त्व आम्हाला नुकतेच पटले आहे. बरोब्बर चार वर्षांपूर्वीपर्यंत आम्ही योगाभ्यासास ‘आळशांची तालीम’ असे हिणवत असू. परंतु आमचे दात आता घशात गेले आहेत !! योग ही खरी जीवनशैली असून, बाकी सारे फिजूल एवं अनावश्‍यक आहे, हे आम्हास आता शतप्रतिशत पटले असून, यापुढील आयुष्य आम्ही योगप्रचारास वाहून घेण्याचे ठरवले आहे. असो.

यु नो, आपला योग युनोत, यानेकी संयुक्‍त राष्ट्रसंघात गेला, त्याला आता चार वर्षे झाली. चार वर्षे !! पतंजली ऋषींनी चार हजार वर्षांपूर्वी योगसूत्रे सांगितली असली, तरी आमच्या मते त्याला फारसे महत्त्व नाही. ज्याप्रमाणे मत्स्येंद्रासनात स्वत:च्याच तंगड्या स्वत:च्याच गळ्यात घालून बसावे लागते, तद्वत अखिल जगताने बरोब्बर चार वर्षांपूर्वी ही योगसूत्रे आपल्या गळ्यात घालून घेतली. तो खरा दुर्मीळ योग मानावा लागेल. कारण उत्पादन तितकेसे महत्त्वाचे नसून ब्रॅंडिंग अधिक मोलाचे असते, हे व्यावहारिक सत्य आहे. योगसूत्रांच्या ब्रॅंडिंग कार्यक्रमात भारताने भरीव यश मिळविले, ह्याचे श्रेय आम्ही थोर प्रधानसेवक श्रीमान नमोजी आणि योगगुरू श्रीमद सदसद बाबाजी बामदेव ह्यांना देऊ.

योग ही ऋषी पतंजली ह्यांनी भारताला दिलेली देणगी असून, बरीच वर्षे संदुकीत ठेवलेली पैठकी आज्जीने नातीस नेसावयास द्यावी, तद्वत भारताने ही देणगी जगताला दिली. म्हणूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून देशोदेशी साजरा होत असून, कोरिया, अफगाणिस्तान, उरुग्वे आदी देशांतील मंडळीही सतरंजीवर आडवी पडलेली पाहून आम्हाला विलक्षण समाधान होत आहे.
तथापि, योगाभ्यास ही संपूर्णत: वैयक्‍तिक अशी गोष्ट असून, तिचे सार्वजनिक प्रदर्शन शोभनीय नाही, अशी टीका काही (डावे) लोक करताना आढळतात. आम्ही तूर्त डाव्यांना डावलू. कारण त्यांना सारे उलटेच दिसते ! कुठल्या हाताने जेवावयाचे, ह्याचाही कायम संभ्रम असलेल्यांना योगाभ्यासाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे? जाऊ दे, झाले!!

योगाभ्यास ही साधना असून त्याचा धंदा होऊ नये, तसेच योगासने सार्वजनिक ठिकाणी करणे हे प्राय: गैरसोयीचे असते, हे मत आम्हाला मान्य आहे. श्रीमान नमोजी आणि योगगुरू बाबाजी ह्यांच्या ‘योगाब्रॅंडिंग’च्या घवघवीत यशामुळे अनेकांना आम्लपित्ताचा त्रास होत असून, त्याबद्दल राजकीय आर्डाओरड करण्यात ते धन्यता मानतात. हे चूक आहे. आता उत्तानपादासन हे आसन चारचौघांत करणे बरे नव्हे, हे घटकाभर मान्य करू, पण सरसकट योग हा धंदा आहे, हे आम्ही मान्य करण्यास तयार नाही. योगगुरू बाबाजी बामदेव ह्यांच्या योगशिबिरात सकाळच्या वेळी शेजारील सतरंजीवरील एका अवघडलेल्या मध्यमवयीन गृहस्थाने पवनमुक्‍तासनाचा पवित्रा घेताक्षणी आमच्यासकट आसपासच्या सर्व सतरंजी बहाद्दरांनी प्राणायामाची मुद्रा घेतल्याची भयंकर आठवण अजुनी आमच्या नासिका प्रदेशाशी रुंजी घालते. पण अशी काही उदाहरणे अपवादात्मक मानावीत !

योगाभ्यासाच्या प्रचारामुळे जनताजनार्दनाची प्रकृती ठणठणीत राहात्ये, देह सुटसुटीत आणि चेहरा फटफटीत राहातो, हे मात्र तितकेसे खरे नाही. योगाभ्यास हा एक उत्तम व्यवसाय असून भजी, पकोडे तळण्यापेक्षा उदात्त आहे, हे कोणीही मान्य करील. तेव्हा ‘करा योगा, फळे भोगा’ हा संदेश आम्ही देऊन आजची योगमीमांसा संपवतो. इत्यलम.