‘योगा डे’चा हॅंगओव्हर! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

ज्यांनी ज्यांनी २१ जून रोजी उत्साहाच्या भरात योगा डे साजरा केला, त्या सर्वांबद्दल मनात अपार सहानुभूती बाळगून आम्ही ही शब्दभस्रिका आरंभिली आहे. वर्षातून एक दिवस योगासने करणे हे वाटते तितके सोपे नसते. एरवी बुटाची नाडी वाकून बांधण्याची गरज पडू नये म्हणून सॅंडल वापरणाऱ्या सद्‌गृहस्थही बेसावधपणे योगा डे साजरा करण्याच्या भरीस पडतात व त्याची परिणती २२ जूनमध्ये होते !! २२ जून ही तारीख भारतीय इतिहासात स्वातंत्र्यचळवळीशी जोडली गेलेली असली, तरी आमच्यालेखी हा दिवस सध्या ‘योगा डे’चा हॅंगओव्हर’ म्हणूनच मानणे इष्ट ठरेल...
रोजच्या रोज योगासने करणाऱ्या माणसाला स्वत:च्या देहाची कश्‍शीही घडी घातली तरी चालते. ही अलौकिक माणसे मयूरासनात दोन्ही हातांवर शरीर व पायरूपी पिसारा तोलून ‘हे बघ, असं करायचं !’ अशी सूचनाही करू शकतात. त्यांना आमचे वंदन असो !! ह्या योगपुर्षांना पद्मासनातदेखील बसता येते हे विशेष ! सर्व योगासनांमध्ये पद्मासन हे भयंकर क्‍लिष्ट असे आसन आहे. एकावर एक पाय चढवून उलटेपालटे आंगठे धरल्यामुळे शरीराच्या उर्ध्वभागात असलेली फुफ्फुसे कां काम करीनाशी होतात, हे आम्हाला आजवर न उलगडलेले कोडे आहे. माणसाने सतरंजीवर मस्त पाय पसरून, दोन्ही हात टेकूसारखे पाठीपलीकडे टाकून बसावे, हे योग्य. पण काही मंडळींना सुखातील जीव दु:खात घालून बसण्याची सवयच असते. पद्मासनात तीन मिनिटे बसल्यानंतर आमची कशीबशी सोडवणूक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी उजाडलेला २२ जून आम्ही उभ्याने काढला !!  

तथापि, केवळ ‘आपण योगासने करतो’ ह्या क्‍वालिफिकेशनच्या जोरावर दिवसभर टणकेगिरी करत फिरणे हे आम्हाला अप्रशस्त वाटते. एरवी वर्षभर मौन बाळगणाऱ्या योगपुर्षांना हल्ली २१ जून जवळ आला की चेव येतो. कुठल्या योगासनाने कोठा साफ होतो किंवा पाठीचा कणा सरळ होतो, हे सांगत हे योगपुंगव हिंडू लागतात. योगासने करणारी माणसे ही सामान्य बापड्या लोकांच्या मनात न्यूनगंडाची भावना गडद करतात, असे आमचे निरीक्षण आहे. वास्तविक अशा समाजकंटकांना प्लास्टिकबंदीचा कायदा दाखवून दंड ठोठावण्याची गरज आहे. पण नकोच ! दंड ठोठावल्यास ही मंडळी सलग चाळीस दंड (आणि वर शंभर बैठका) काढून दाखवतील !! सांप्रत ह्या योगिष्टांबद्दल जितके कमी बोलावे तितके बरे ! मुद्दा योगा डे नंतरच्या ‘भोगा डे’चा आहे.

...तर योगा डेनंतर समाधानी चेहऱ्याने घरी यावे तो हळूहळू देहातील अवयव काहीबाही बोलू लागतात. शरीर आखडून धरते. सांधे असहकार पुकारतात. पायांत वेळीअवेळी पेटके येतात. शरीर-मन आळसावते. पडून राहावेसे वाटते. आणखी आठवडाभर आंघोळही करू नये अशी भावना बळावते. अंथरुणावर कूस वळवतानाही मुखातून नको नको ते अपशब्द येतात. अशा परिस्थितीत उशीरपर्यंत पडून राहावे असे वाटत असतानाच घरातील सदस्य हेतुपुरस्सर पंख्याचे बटण बंद करून खोलीबाहेर जातात, तेव्हा संतापाचा प्रस्फोट होऊन सदर सदस्याच्या निकट नातलगांचा उद्धार करण्याची उबळ येते. पण ज्याचे खांदेदेखील असह्य दुखत असतात, अशा माणसाने अन्य जनांस लागट बोलू नये ! बरीच कामे अडतात !!

योगा डे नंतरच्या भोग दिनाला सकाळचा चहा कोपातून बशीत ओतून व्हटांशी नेण्याची क्रियाही अवघड योगासन होऊन बसते. तिथेच २२ जूनची महती पटत्ये !!
...ह्या साऱ्यावर उपाय योगासने हाच आहे, असे सांगितले तर तुम्ही हलासनात काढतात तशी हातभर जीभ बाहेर काढाल !! पण ते सत्य आहे. २१ जूनचा योगा डे झाला की तद्‌नंतर येणारा २२ जूनचा भोग दिन शवासनात काढावा, अशी आमची सूचना आहे. एवढं सांगून आम्ही आमची शब्दभस्रिका आटोपती घेतो. आईग्गंऽऽ...अयायायाऽऽ...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com