साचलेले आणि तुंबलेले ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 27 जून 2018

(एक पाणीदार पत्रव्यवहार...)

(एक पाणीदार पत्रव्यवहार...)

आ दरणीय मा. साहेब (वांद्रे) यांस, जय महाराष्ट्र. घाईघाईने पत्र लिहिण्यास कारण की मी एक साधासुधा महापौर आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत मजबूत पाऊस पडून काही ठिकाणी पाणी तुंबल्यासारखे दिसले. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २३१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला असला, तरी कुलाबा, भायखळा, हिंदमाता, परळ, वरळी, दादर, माटुंगा, सायन ते भांडुप, मुलुंड, तसेच माहीम, बांद्रे, पार्ले, अंधेरी, कांदिवली, बोरिवली ते दहिसर असे तुरळक ठिकाणी पाणी साचले होते. हे पाणी ‘साचलेले’ असून तुंबलेले नाही, असा खुलासा करकरून माझ्या तोंडाला कोरड पडली आहे !! मीडियावाले क्‍यामेरा पाण्याच्या जवळ नेऊन भायखळा-परळ भागात समुद्र शिरल्याचा आभास निर्माण करून महापालिकेला बदनाम करत आहेत. लोक आता ‘साचलेले’ आणि ‘तुंबलेले’ ह्यांच्यातला फरक विचारू लागले आहेत. काय उत्तर देऊ? कृपया मार्गदर्शन करावे.
आपला आज्ञाधारक. मुं. मा.
* * *

प्रति मा. महापौर, मुंबई इलाखा, यांसी, जय महाराष्ट्र. मुंबई इलाख्यात सत्ता आमची असली तरी कारभारी तुम्ही. तुमचा सहीशिक्‍का (फक्‍त सहीशिक्‍काच) चालतो. ह्या जिकिरीच्या दिवसात गनिमाचे फांवते. नको नको ते आरोप होतात. गुदस्त साली आमचें कारभारावर कुण्या रेडिओ गायिकेने ‘‘तुजा माझ्यावर भरोसा नाय का?’’ अशा शब्दयोजनेचे थिल्लर गीत बनविले होते. ह्या गीताने आमची यथेच्छ बदनामी जाहली. औंदा तसे काही घडले तर आम्ही आपणांस जबाबदार धरू, हे बरे जाणोन असा !!

पावसाळ्यात आपल्यावर विविध प्रकारचे हल्ले होतात. ते सहजी परतवून लावता येतात. ज्याप्रमाणे मच्छर मारण्याच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत, त्याप्रमाणे विरोधकांची चिलटेही चिरडता येतात, हे आमच्याकडे बघून शिकून घेणे. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांना खड्डे पडतील. आता हे खड्डे पाडण्यासाठी आम्ही काही कुदळी घेऊन मुंबईभर हिंडत नाही. पण विरोधकांची तोंडे कोण धरणार? दुर्लक्ष केलेले बरे. अशा वेळी ‘खड्डेच पडलेले नाहीत’ असे ठोकून द्यावे, हे इष्ट !

मुंबईत पाऊस फार पडतो. परंतु ‘फार’ ह्या शब्दास फार वजन नाही. सबब मुंबईत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस पडतो, ही लाइन संपूर्ण चार महिने चालू ठेवावी. चेरापुंजी हे गाव नेमके कोठे येते हे आम्हांस ठाऊक नाही. पण तेथे मुबलक पाऊस पडतो, असे आम्ही शाळेत शिकलो आहो ! (आपणही शिकला किंवा शिकविले असेल !! असो.) चेरापुंजी येथे पाऊस पडूनही पाणी कां तुंबत नाही, हे आम्हांस माहीत नाही. तथापि, मुंबईत चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस पडूनही रस्ते कोरडेठाक आहेत, वाहतूक सुरळीत असून, मुंबईकर सुखात आहेत, असे सांगावे. आम्हीही तेच सांगत आहो !!
‘साचलेले ‘पाणी आणि ‘तुंबलेले’ पाणी ह्यातला फरक तुम्हाला सांगता येत नाही? कमाल झाली !! अकबराने एकदा बिरबलास फर्मावले की ‘आपल्या राजधानीत कावळे किती आहेत ते मोजून ये आणि सांग !’ बिरबलाने दुसऱ्याच दिवशी उत्तर दिले : ‘‘आपल्या राजधानीत पाच हजार तीनशे पन्नास कावळे आहेत !... जास्त असतील ते पाहुणे म्हणून नुकतेच आले असतील आणि कमी असतील तर उडून दुसऱ्या गावी गेले असतील. खाविंदांनी स्वत: मोजून खातरी करून घ्यावी !!’’
...मीडियाला हल्ली अशी उत्तरे लागतात ! ह्याच बिरबलाच्या चालीवर सदर पाणी ‘साचलेले’ असून, नुकतेच आभाळातून पडले आहे,
असे सांगावे !
 कळावे. आपला. उधोजी.
ता.क. : आमचे कमळ पार्टीशी असलेले भांडण हे ‘साचलेले’ असून, मंत्रालयावर आपला झेंडा फडकवण्याचे स्वप्न हे ‘तुंबलेले’ आहे..! आता कळला अर्थ?
 जय महाराष्ट्र. उठा.

Web Title: editorial dhing tang british nandi article