प्लास्टिक पॉलिटिक्‍स! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

दादू : (गपचूप फोन फिरवत) म्यांव म्यांव !
सदू : मांजरं फार झालीत हल्ली महाराष्ट्रात ! छुत, छुत !!
दादू : (पटकन भानावर येत) सदूराया, अरे मी बोलतोय...!!
सदू : (सावध होत) मी कोण?
दादू : (भोळेपणाने) अरेच्चा, तू कोण हे तू मलाच विचारतोयस !!
सदू : (गोऱ्यामोऱ्या चेहऱ्यानं) वाईट विनोद होता !! पण मी ओळखला आवाज... बोल !
दादू : (अभिमानानं) त्याचं काय आहे की सध्या आमच्या चिरंजीवांनी प्लास्टिकबंदीचं मोठं कार्य हाती घेतलंय ! तुझा पाठिंबा हवा आहे !!
सदू : (कठोर आवाजात) मिळणार नाही !
दादू : (संयमानं) अरे, असं काय करतोस? किती महत्त्वाचा विषय आहे ! प्लास्टिकने पर्यावरणाची किती हानी होते माहितेय ना? चांगल्या कामाला नेहमी प्रोत्साहन द्यावं ! तुझ्या लाडक्‍या पुतण्यानेच प्लास्टिकविरोधी युद्ध छेडलं आहे आणि तू त्याला कुमक नाही पाठवणार? हे योग्य नाही !
सदू : ते पर्यावरणमंत्री रामदास कदम माझे पुतणे लागत नाहीत !
दादू : (समजूत घालत) त्यांचं जाऊ दे रे ! कधी नव्हेत ते त्यांना प्लास्टिकसारखी चमकायची संधी मिळतेय !! त्यांच्याकडे काय लक्ष देतोस? तुझा पुतण्या चि. विक्रमादित्य एकदा चौपाटीवर गेला होता, तर त्याला ढिगानं प्लास्टिक दिसलं ! त्याचा जीव कळवळला ! मला म्हणाला, बॅब्स, मी मुंबईचं पर्यावरण चकाचक करण्याचं ठरवलंय ! मी इतकं चांगलं काम केलं तर काका मला सपोर्ट करतीलच ना? मी म्हटलं, हो तर... कसाही असला तरी तुझा काका मनानं चांगला आहे !!
सदू : (संशयानं) ह्यात मला चापलुसीचा वास येतोय !
दादू : (डोळे मिटून गांभीर्यानं) हा प्लास्टिक जळाल्याचा वास आहे !!
सदू : (दचकून) छे...काहीतरीच !
दादू : (कार्यकर्त्याच्या उत्साहानं) गेल्या चार दिवसांत आम्ही शेकडो टन प्लास्टिक गोळा करून जाळलं !! सगळी मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ झाला की मॅगसेसे पुरस्कारासाठी अर्ज करायचं ठरवतोय आम्ही !!
सदू : (हादरून) दादूराया... खरंच?
दादू : (फुशारकी मारत) आहेस कुठे? शिवाय दहा-बारा लाख रुपये दंडदेखील जमा केला !!
सदू : (धोरणीपणानं) प्लास्टिकबंदी करण्यापूर्वी आधी कचराकुंड्या उपलब्ध करून द्या !! प्लास्टिकला पर्याय द्या, मग करा तुमची ती बंदी !! उगीच काय गरीब जनतेला वेठीला धरायचं?
दादू : (थेट विचारत) तू अजूनही प्लास्टिकचा वापर करतोस?
सदू : (शास्त्रीय दृष्टिकोनातून) हे बघ दादूराया, प्लास्टिक वाईट नसतं, आपल्या सवयी वाईट असतात !!
दादू : (संशय बळकट होत) ह्याचा अर्थ तू प्लास्टिक वापरतोस !!
सदू : (समजूत घालत) मी काचसामानाचा विरोधक आहे !!
दादू : (बुचकळ्यात पडत) क्‍काय? काचसामानाचा?
सदू : (खुलासा करत) हं... करेक्‍ट... दिसली काच की खळळ्ळ !!
दादू : सद्या, सद्या...हे बरं नव्हे !! तुला काचेचं येवढं काय रे वावडं?
सदू : (प्रतिसवाल करत) तुला प्लास्टिकची एवढी का ॲलर्जी?
दादू : सदूराया, ह्या प्लास्टिकमुळे मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबतं ! मिठी नदीचा प्रवाह अडतो !! प्लास्टिक फार वाईट !
सदू : (खवळून) तुमची गटारं वाईट, तुमचे सफाई कंत्राटदार वाईट ! तुमचं प्रशासन वाईट, तुमचं ते हे...सगळंच वाईट !!
दादू : तुझा पर्यावरण संवर्धनाला विरोध आहे का ते आधी सांग !
सदू : (धुमसत) नाही !
दादू : (आश्‍चर्यानं) मग तुझा प्लास्टिकला विरोध का? आत्ताच्या आत्ता पाच हजार रुपये दंड भर !
सदू : (कपाळाला आठ्या...) मी कशाला दंड भरू? माझ्याकडे प्लास्टिक सापडलंय?
दादू : (खिजवत) पण मग तुझं रेल्वे इंजिन कशाचं आहे... आँऽऽ..!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com