झुंड! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 4 जुलै 2018

रानभरीच्या माळावर
सुखात चरत राहिलेल्या
हरणांच्या कळपातील
तरण्याबांड अल्फा नरानं
चटकन कान टवकारून
भवतालच्या झाडोऱ्याकडे पाहिले,
दोन-तीनदा खूर आपटून
तो पुन्हा बिनधोक चरु लागला...
तेव्हाच

रानभरीच्या माळावर
सुखात चरत राहिलेल्या
हरणांच्या कळपातील
तरण्याबांड अल्फा नरानं
चटकन कान टवकारून
भवतालच्या झाडोऱ्याकडे पाहिले,
दोन-तीनदा खूर आपटून
तो पुन्हा बिनधोक चरु लागला...
तेव्हाच

झाडीमध्ये दबा धरून बसलेल्या
कोळसुंद्यांच्या भुकेल्या टोळीने
दोन-चार कोवळी पाडसं
क्रूरपणे हेरली, आणि मग
तिन्ही बाजूंना पांगून
शिताफीनं घेरली...
अचानक झालेल्या हल्ल्यानं
गांगरून गेलेला हरणांचा कळप
धडपडला, उधळला...
राकुत्र्यांच्या टोळीनं
चार झेपेत गाठलं सावज,
काही कळायच्या आतच
शिंगहीन, दुर्बल हरणांनी
सोडला ठाव,
कोळसुंद्यानी क्षणार्धात रुतवले
तीक्ष्ण दात कोवळ्यालूस मांसात
त्यांच्या फऱ्यात, मानेत, पाठीत, पोटात.
रक्‍ताचे उडाले फवारे,
जिवंतपणी आतडी खेचून काढत
भयंकर गुरगुरत कोळसुंद्यांनी
तोडले लचके, आणि लपकले
बिनदिक्‍कत जिवंतपणीच.
रानभरीच्या माळावर घुमला
हरीण पाडसांचा केविलवाणा आकांत.

मरणपंथाला लागलेल्या पाडसानं
विझत चाललेल्या डोळ्यांनीच
पाहिला स्वत:चाच गमावलेला पाय,
गवतावर सांडलेले आतडे किंवा
तुटून पडलेले आपले भाईबंद.
तडफडून तडफडून हळू हळू
मरणाच्या दारात गेलेल्या
हरिण पाडसांनी कधीतरी
सोडले प्राण ह्याच दरम्यान.

‘‘भयानक भयानक..शी:!’’ असे
मध्यमवर्गीय संवेदनशील सुसंस्कृत
वगैरे उद्‌गार काढत
टीव्हीसमोर बसलेल्या
जबाबदार भारतीय नागरिकाच्या
अंगावर आला शहारा.
तांतडीने बदलला त्याने चॅनल,
आणि तो निर्ममपणे पाहू लागला
मानवी जगातल्या बातम्या.

टीव्हीवरील अँकर सांगत होती की,
धुळ्याजवळ राइनपाड्यात
मुले पळवणारी टोळी समजून
गावकऱ्यांनी पाच जणांना
ठेचून ठेचून मारले...
ठेचून ठेचून ठे-चू-न.

‘‘अरेरे! काय हे?’’ असे
मध्यमवर्गीय संवेदनशील सुसंस्कृत
वगैरे उद्‌गार काढत त्याने पुन्हा
बदलला टीव्हीचा चॅनल...

...आणि तो मिटक्‍या मारत
आवडत्या मालिकेचा
रिपीट टेलिकास्ट बघू लागला...
घडले ते एवढेच.

आपल्याच प्रजातीतल्या पाचांना
आपल्याच प्रजातीतल्या पंचावन्नांनी
कोळसुंद्यांसारखेच फाडले, हे मात्र
त्याच्या मध्यमवर्गीय,
 संवेदनशील, सुसंस्कृत
वगैरे मनाच्या गावीही नव्हते.

Web Title: editorial dhing tang british nandi article