चाचा, मला वाचवा ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 5 जुलै 2018

प्रिय चाचा, साष्टांग नमस्कार.

प्रिय चाचा, साष्टांग नमस्कार.
तुम्ही (सध्या) कुठे आहात? आय मीन, कुठल्या पक्षात आहात? गेले दोन दिवस तुम्हाला शोधतो आहे. मीच काय, उभ्या महाराष्ट्रात तुमची शोधाशोध सुरू झाली असून, तुम्हाला हुडकण्यासाठी तपास पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. सर्व पक्षांतील लोक तुम्हाला धुंडत असून, ‘तुम्ही आपल्या पक्षात तर नाही ना?’ ह्या भीतीने अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. हे चाचा कुठेही असले तरी आपल्या पक्षात नसोत, अशी सर्वपक्षीय भावना आहे. असाल तेथून गायब व्हा, असे सांगण्यासाठीच तुमचा लाडका भतिजा हे पत्र लिहीत आहे, हे जरा ध्यानात घ्या ! आता हे पत्र लिहिले आहे खरे, पण नेमके कुठल्या पत्त्यावर पाठवायचे, हे न कळल्याने पेपरातच छापून आणावे असे ठरवले.

नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यातील भतिजाचे चाचा कोण? हे लौकरच उघड करू, असा इशारा खुद्द मा. मु. नानासाहेबांनीच दिला असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे. तथापि, फार काळजी करू नये ! कारण चाचा नेमका कोण आहे? हे अद्याप कुणालाच माहीत नाही. चाचा दिसतात कसे, बोलतात कसे, चालतात कसे, हे कुणालाही माहीत नाही. समोर येणारा प्रत्येक असामी ‘चाचा’ तर नाही ना? अशी शंका येऊन पुढारी मंडळी घायकुतीला आली आहेत. नागपुरात विधिमंडळाच्या आवारात एका कार्यकर्त्याने (चुकून) एका म्हाताऱ्या गृहस्थांना ‘‘चाचा, थोडा आगे चलिये ना’’ एवढेच म्हटले. किमान पन्नास लोक दचकले !! वास्तविक ते आजोबा त्यांच्या पेन्शनचे काम मार्गी लावायला म्हणून आले होते. पुन्हा असो.

महाराष्ट्रातला हा नवा ‘चाचा’ कोण? हा कळीचा मुद्दा झाला आहे हे मात्र खरे. कारण चाचाचे नाव घेतले की महाराष्ट्राचे राजकारण बदलते, असा आत्तापर्यंतचा (राजकीय) इतिहास आहे. चाचा म्हणजे मराठीत काय? ओळखा पाहू... करेक्‍ट!- काका ! हे काकालोक कालपर्यंत (पक्षी : पुतण्यांनी त्यांना सळो की पळो करेपर्यंत) सकल महाराष्ट्राचा कारभार हांकत होते. काकांचा महीमा म्यां पामराने काय सांगावा? महाराष्ट्राच्या रयतेला काकांची महती चांगली ठाऊक आहे.

परंतु, काका वेगळे आणि चाचा वेगळे ! मराठीत ‘चाचा’चा अर्थ समुद्रावरचा डाकू असा होतो ! समुद्रावरचा डाकू महाराष्ट्रात कशाला येईल? ‘चाचा’ म्हटले की काही जणांच्या डोळ्यांसमोर विचित्र कपडे घालणारा, डोळ्याभोवती पट्टी बांधून जहाजावर आरडाओरडा करणारा, ज्याच्या अंगाला शिळ्या मासळीचा वास येतो, असा भयंकर इसम उभा राहातो. तथापि, मुख्यमंत्री नानासाहेबांना तो ‘चाचा’ अभिप्रेत नसावा, हे उघड आहे. कारण त्यांनी ‘चाचा’चा उल्लेख ‘चाय पे चर्चा’मधल्या ‘चा’सारखा केला असून ‘चमचा’तला हा ‘चा’ वापरून केलेला नाही, ह्याची संबंधितांनी नोंद घेतलेली बरी !! (नपेक्षा काही लोक ‘चाचा’ शोधण्यासाठी समुद्रावर जातील !! असो असो.) नागपूर अधिवेशनाच्या मुक्‍कामी अनेकांनी हा समुद्री चाचा समजून कित्येकांना हटकल्याचे समजते. काल सायंकाळी मलाच एकाने कॉलर पकडून ‘काय रे, तू चाचा आहे का बे?’ असे दर्डावून विचारले. माझी झडती घेतली. माझ्याजवळील पिशवीत ढेमसांची भाजी बघून समुद्री चाचा ढेमसे (पक्षी : टिंडा) खाणे शक्‍य नाही, हे त्याने ताडले व माझी कॉलर सोडली.

सारांश एवढाच की सध्या वातावरण चाचाने (म्हंजे तुम्ही) चांगलेच तापवले आहे. मी तूर्त नागपुरात असून चाचा म्हणून कोणाचे नाव पुढे येत्ये आहे, त्याची वाट पाहातो आहे. तुम्ही ओरिजिनल चाचा आहात, हे गुपित फक्‍त मलाच माहीत आहे. मी ते कोणालाही सांगणार नाही. परंतु हवा थंड होईपर्यंत बाहेर पडू नका ही विनंती.
आपला
लाडका भतिजा.

Web Title: editorial dhing tang british nandi article