चाणक्‍य! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 10 जुलै 2018

समोरील साध्याशा भोजनपात्राकडे
निर्विकार, निर्मम दृष्टीने
क्षणभर पाहून आचार्यांनी
मिटले डोळे आणि मग
सोडले अखेर मौन...

समोरील साध्याशा भोजनपात्राकडे
निर्विकार, निर्मम दृष्टीने
क्षणभर पाहून आचार्यांनी
मिटले डोळे आणि मग
सोडले अखेर मौन...

ते म्हणाले : ऐक राजा बिंदुसारा,
सम्राट चंद्रगुप्ताचा तू पुत्र आहेस,
हे कधीही विसरू नकोस...
वारसाहक्‍काने मिळालेल्या
सत्ता आणि ऐश्‍वर्याचा आस्वाद
घेताना विचार स्वत:ला...
प्रजेच्या प्रत्येक घटकाचे
पोट भरले आहे काय?
प्रजाजनांमधला प्रत्येक जण
किमान सुखास पात्र आहे काय?
आपल्या सेवकांकडून निष्ठेची
अपेक्षा करणारा तू स्वत:
राष्ट्राप्रती निष्ठ आहेस काय?
ह्या साऱ्याची होकारार्थी
उत्तरे मिळाली तर..आणि तरच,
अशा सुग्रास अन्नग्रहणाचा
अधिकार तुला आहे, अन्यथा नाही.
तू प्रजेचा प्रधानसेवक आहेस,
प्रधानराजा नव्हेस!
तुझ्या पित्यास मी शिकविले
ते हेच होते, आणि त्याच्या पश्‍चात
तुलादेखील हेच सांगतो आहे...’’

तेव्हाच, सम्राट बिंदुसाराने
भाळावरली निळसर जन्मखूण
दाखवत पृच्छिले आचार्यांना
आपल्या जन्माचे रहस्य.

‘‘अन्नासमोर बसलो आहे,
आता सांगतोच...’’ असे म्हणून
आचार्यांनी सांगून टाकले : बिंदुसारा,
विषप्रयोगाला पचवणारी
आतडी लाभावीत, म्हणून
तुझ्या चक्रवर्ती पित्याच्या अन्नात
मी हरदिनी कालवत होतो
तोळाभर कालकूट...
परंतु, तुझ्या मातेने त्याचा
निष्कारण घेतला ग्रास, आणि
मरणोन्मुख तिच्या उदराला भेदून
मीच खेचून आणले तुला
ह्या विश्‍वपसाऱ्यात...कळले?’’

‘‘तुझा जन्म राष्ट्रासाठी आहे,
मातृृसुखासाठी नव्हे, बिंदुसारा!’’
करड्या सुरात आचार्य म्हणाले.

आपली भयंकर जन्मकथा ऐकून
शहारलेल्या बिंदुसाराने
नमविले मस्तक, आणि
कृतज्ञतेने केले वंदन आपल्या
परात्पर गुरुवर्यांस...
आचार्यांच्या संकेतानिशी
त्याने सहजच नेला आपला
उजवा हात भोजनपात्राकडे.

...आणि चटकन मागे घेतला!

Web Title: editorial dhing tang british nandi article

टॅग्स