पुत्र व्हावा ऐसा...! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 12 जुलै 2018

(‘चांदोबा’ची गोष्ट...)

(‘चांदोबा’ची गोष्ट...)

एक आटपाट नगर होतं. तिथं एक लक्ष्मीदत्तनामक राजा राज्य करीत असे. सुवर्णवतीनामक त्याची लाडकी व एकमेव राणी होती. प्रजाजनांचं दुखलंखुपलं पाहावं, हवं ते उपलब्ध करून द्यावं, नाममात्र शुल्क घेऊन साऱ्या सोयीसुविधा द्याव्यात, हे त्याचं ब्रीद होतं. साहजिकच प्रजाजन सुखी होते. ‘तुम्ही नागरिक नसून माझ्या राज्याचे भागधारक आहा!’ असे तो दोन्ही हात जोडून विनम्रपणे सांगत असे. राणी सुवर्णवतीदेखील देवलसी आणि शुद्ध विचारांची होती. राजा लक्ष्मीदत्तास मोहिमेवर जावे लागले की तीच राज्याचा कारभार कौशल्याने हाताळत असे. आपल्या राज्यातील मुलांनी विद्यार्जन करावे, तसेच फुटबॉलही खेळावा, असे तीस वाटत असे. एवढे सगळे होऊनही राजास अपत्य नव्हते.

मृगयेसाठी रानात गेला असताना राजा लक्ष्मीदत्तास एक साधू भेटला. फळफळावळ, प्रसाद आदी अर्पण करून राजाने साधूचे मन जिंकिले. राजा लक्ष्मीदत्ताच्या मनातील शल्य साधूने अंर्तज्ञानाने ओळखले व तो म्हणाला, ‘‘जिओ!’’
‘‘म्हणजे काय स्वामी?’’राजाने विचारले.
‘‘म्हणजे तथास्तु!,’ एवढे बोलून साधू अदृश्‍य झाला. मृगयेवरून महाली परतलेल्या राजाने हा प्रसंग राणी सुवर्णवतीस सांगितला. कालांतराने महालावर तुतारीचा निनाद झाला. नगरात साखर वाटण्यासाठी बारा सालंकृत हत्तींचे पथक रवाना झाले. हत्तींच्या पाठीवर सुवर्णाची अंबारी होती. सोंडेवर रत्नजडित शुंडवस्त्र होते, इतकेच काय त्याच्या शेपटांस रेशमी आवरण होते. ते साफसुथरे ठेवण्यासाठी घमेली घेऊन पाच सेवक हत्तीच्या मागे तत्परतेने धावत होते. नगरजनांनी विचारले, ‘काय झाले? काय झाले?’ राजाचा सरदार म्हणाला,‘राजाचा वारस जन्मणार आहे. राजपुत्र अवतरणार आहे!’
‘राजाचा वारस जन्मणार आहे, राजपुत्र अवतरणार आहे! राजाचा वारस जन्मणार आहे, राजपुत्र अवतरणार आहे!’ वाऱ्यासारखे वृत्त पसरले. होणाऱ्या पुत्राची कुंडली मांडण्यासाठी राजज्योतिषांना पाचारण करण्यात आले. राजज्योतिषी डुलत डुलत आले आणि डुलत डुलतच त्यांनी कुंडली मांडली व घाईघाईने (उजव्या) हाताची पाचही बोटे स्वमुखात घातली.

‘‘पुत्र चक्रवर्ती होईल...सारे शुभग्रह त्याच्या शुभगृही जमले असून अशी कुंडली कधी बघितली नाही! पुत्र यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत होईल! तो विद्यावानही असेल...किंबहुना बृहस्पतीला लाजवेल, अशी त्याची मेधा असेल!! त्यास जगतातील सारे मानसन्मान मिळतील!’’ तोंडातील बोटे काढून राजज्योतिषी कसेबसे म्हणाले.
‘‘जीतम! जीतम!’’ सारे दरबारी एकसुरात ओरडले. राजज्योतिषाच्या अंगावर सुवर्णकंकण फेकून राजा लक्ष्मीदत्ताने त्यांचा यथोचित सन्मान केला. अतिउत्साहात आलेल्या राजज्योतिषाने ‘‘पुत्रास सूर्यदर्शन केल्यावर शनिसूत्राची बांधणी त्याचे मनगटावर करणे आवश्‍यक असल्याने त्यास आणावे!’ असे सांगितले. जो पुत्र जन्मास अजून आला नाही, तो सूर्यदर्शनासाठी कसा आणणार? हे त्या मूढास कळले नाही. सबब राजा लक्ष्मीदत्ताने पायताण फेंकून त्याचा पुन्हा यथोचित सन्मान केला.
होणारा पुत्र हा मेधावी, बळिवंत होणार असल्याचे आता ठरून गेले असल्याने पुत्रास डी. लिट ही सर्वोच्च पदवी बहाल करण्याची घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विद्यापती ह्यांनी करून टाकली. सेनापतीने आदराने लवून होणाऱ्या पुत्रास ‘सरलष्कर’ हा किताब बहाल केला. शेजारील राष्ट्राचे अधिपती सम्राट मालसेन ह्यांनी आपली पुत्री मालवती इचा विवाह होणाऱ्या राजपुत्राशी करणेत येईल, असे जाहीर केले.

अशा रीतीने जन्माआगोदरच राजपुत्रास सारे काही लाभले. तेवढ्यात दरबारात तो जुना साधू प्रविष्ट झाला. त्यास राजा लक्ष्मीदत्ताने ओळखले. ‘हे आपल्या आशीर्वादाचेच फळ!’ असे म्हणून राजा-राणी उभयतां साधूच्या चरणी वांकले. साधू म्हणाला, ‘‘जिओ, जिओ!’’
...ज्याप्रमाणे राजा लक्ष्मीदत्ताचे ईप्सित सुफळ संप्रुण झाले, तसे तुमचे-आमचे होणार नाही. उगीच उड्या मारू नका...हात मेल्यांनो!

Web Title: editorial dhing tang british nandi article