आनंदी आनंद गडे..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शुक्रवार, 13 जुलै 2018

प्रति, सर्वपक्षीय सहकारी-

प्रति, सर्वपक्षीय सहकारी-
शतप्रतिशत प्रणाम. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर घोडदौड करत असून, दिवसेंदिवस वेगाने प्रगती करत आहे. (ह्या वाक्‍याला तसा काही अर्थ नाही, पण बरे वाटते इतकेच!) तथापि, इतकी प्रगती करूनही अनेक लोकांना त्याचा आनंद घेता येत नाही, ह्याचे दु:ख होते. आनंद घेणे ही एक कला आहे. ती एक जीवनदृष्टी आहे. काही लोकांना हा आनंदच मुळी घेता येत नाही. म्हंजे ते सुखी असतात, पण आनंदी नसतात. हे थोडेसे समाजवाद्यांसारखे असते. गावात चकचकीत मॉल उभा राहिला तरी ही मंडळी ‘काय गरज होती? तिथे माणसांना स्वच्छतागृहे नाहीत, मॉल कशाला हवेत?’ असे काहीतरी बोलतात. पण समाजवाद्यांच्या मते त्यांना चांगले आनंदात राहता येते, उलट गंभीर राहण्याची खोड संघवाल्यांनाच असते. काय असेल ते असो, ह्या दोन्ही घटकांना आनंदी करणे, हे अशक्‍य असले तरी आम जनतेला आनंदात ठेवणे हे आपले परमकर्तव्य ठरते. अर्थात त्याचसाठी आपले सरकार विविध उपाय योजत असून, त्याची माहिती देण्यासाठी सदरील पत्र लिहीत आहे.

महाराष्ट्रात आनंदाची लाट निर्माण करण्याच्या हेतूने आपल्या सरकारमध्ये स्वतंत्र आनंद खाते सुरू करण्यात येत असून, त्यासाठी फुल टाइम क्‍याबिनेट दर्जाचा मंत्री नेमण्याची योजना आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हाच नवा आनंदमंत्रीही नेमला जावा, असा इरादा आहे. हे नवे मंत्रिपद स्वत:कडे ठेवावे की मित्रपक्षाला द्यावे, ह्यावर अजून चर्चा चालू आहे. सदर मंत्रालयाच्या बांधणीचा विचार करण्यासाठी सात आनंदी नेत्यांची समिती नेमण्यात आली असून, त्यांचा आनंद-अहवाल हाती पडला की त्यावर तात्काळ निर्णय होईल, ह्याची ग्वाही मी देतो. सदर आनंद मंत्रालयासाठी दिल्लीतील श्रेष्ठींकडे परवानगी मागण्यासाठी गेलो असता त्यांनी ‘अरे, शुं वात करे छे...एकदम चोक्‍कस!’ असे आनंदोद्‌गार काढून टाळी दिली व आनंदाची पहिली लाट निर्माण केली. आनंद मंत्रालयाचे लेटरहेडही छापून तयार आहे.
आनंदीआ नं दगडे, जिकडे तिकडे चोहीकडे
वरतीखाली मोदभरे, वायूसंगे मोद फिरे
...ह्या काव्य ओळी आनंद मंत्रालयाचे बोधवाक्‍य म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. तथापि, ह्यातील ‘वायूसंगे मोद भरे ह्या ओळींऐवजी चुकून ‘वायूसंगे मोदी फिरे’असे पडल्याने लेटरहेड पुन्हा छापायला टाकण्यात आली आहेत.

आनंद ही एक सापेक्ष गोष्ट आहे, हे सारेच जाणतात. ज्याप्रमाणे एखाद्यासाठी विषसमान असलेली गोष्ट दुसऱ्यासाठी आनंदाचे निधान असते. त्याचप्रमाणे एकाचे दु:ख हे दुसऱ्याचे दु:खाचे कारण असू शकते. राजकारणात तर आपण ह्याचे प्रत्यंतर वारंवार घेत आलो आहोत! उदाहरणार्थ, एक पुढारी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ‘अंदर’ गेला, की त्याच्याच पक्षातील दोघे-चौघे आनंदात सत्यनारायण घालतात! किंवा मित्रपक्षानेच सत्ताधारी पक्षाची गोची केली की विरोधक आनंदाने एकमेकांना टाळी देतात. दोघे भाऊ भांडायला लागले की तिसरा बोका आनंदडोही डुंबू लागतो. थोडक्‍यात, आनंद निर्माण करण्याचे कार्य आपण सारे गेली कित्येक वर्षे इमाने इतबारे करत आलो आहोत. तथापि, ह्या कार्यास शासनदरबारी मान्यता नसल्याने अनेकांचा हिरमोड होतो. नव्या आनंद मंत्रालयातर्फे अशा कामाची नोंद घेऊन यशस्वी आनंद निर्मिकांना पुरस्कार देण्याची योजना आहे.

काही लोक दिवसभरात कितीही दु:ख झाले तरी सायंकाळी ‘आनंद’ हटकून मिळवतातच, असेही निदर्शनास आले आहे. त्यांच्यापैकी काही जणांनी आनंद मंत्रालयाची स्थापना येत्या आगष्ट महिन्याच्या ११ तारखेला तिथीनुसार करावी, अशी शिफारसही काही जणांनी केली आहे. तिथीनुसार त्या दिवशी गटारी अमावस्या येते!! असो. संबंधितांनी आपापल्या शिफारशी पाठवाव्यात अशी सूचना ह्या पत्राद्वारे करण्यात येत आहे. इति.

Web Title: editorial dhing tang british nandi article