शुभ्र काही जीवघेणे..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबिनाम संवत्सरे, श्रीशके १९४०, आषाढ शुद्ध पंचमी
आजचा वार : ट्यूसडे विदाऊट मिल्क !
आजचा सुविचार : दूध दूध दूध दूध...पीता है इंडिया !

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) माणसाने आयुष्यात काहीही व्हावे, पण महाराष्ट्राचा कारभारी होऊ नये. नागपूरला आल्यावर दिवस जरा बरे जातील असे वाटले होते. पण कसचे काय ! पावसाने तोंडचे पाणी पळवले. आता पाऊस थोडा उणावला आहे तर तोंडचे दूध पळाले आहे... अशा परिस्थितीत माणसाने कसा करावा कारभार, अं?
सकाळी उठलो. प्रसन्नचित्ताने खोलीबाहेर आलो. ‘चहा येऊ द्या’ अशी सैपाकघराच्या दिशेने तोंड करून हाक दिली. गरमागरम चहा, सोबत चनापोहे असा आस्वाद घेत वर्तमानपत्रे वाचावीत, मग दिवसभराच्या कामाला लागावे, असा छानदार बेत मनात शिजत होता. पण कसचे काय ! समोर कोरा चहा आला. भरीसभर म्हंजे त्यात साखरही नव्हती ! ही काय दिवसाची सुरवात आहे? ‘‘महाराष्ट्रातल्या समस्त जर्सी गायी तूर्त गाभण आहेत काय?’’ असा सवाल भडकून करणार होतो. पण त्याऐवजी तोंडातून ‘‘दूध मिळालं तर बरं होईल’’ असे काहीच्या बाहीच उद्‌गार बाहेर पडले. पण प्रतिसाद म्हणून आतून फक्‍त भांड्यांचा खडखडाट तेवढा ऐकू आला.
‘‘दूध आलंय कुठं आज?’’ सैपाकघरातून आलेल्या थंड उत्तराला प्रचंड उकळी आहे, हे आम्ही वळखले. एकदम आठवले ! अरेच्चा, हो की ! गेले दोन दिवस आमच्या राजूअण्णा शेट्टींनी आपले दूध तोडले आहे. नाही म्हटले तरी थोडेसे दूध घरात असतेच. दोनेक दिवस त्यात निघून जातील, शेट्टीसाहेबांचे आंदोलनही आटोपेल..अशी माझी अटकळ होती.

‘‘खरे असाल, तर पाव लिटर दूध आणून दाखवा,’’ असे आव्हान सैपाकघरातून फेकण्यात आल्याने आम्हाला स्फुरण चढले. दुग्धविकास खात्याला मेसेज पाठवला : ‘चहाचं काय?’’ त्यावर आलेली उत्तरे अशी : ‘दूध-उत्पादक दुधात पाणी घालतात. पाणी जास्त झाल्याने दूध कमी होऊन पाणी ऑटोमॅटिक वाढले, सबब दुधाचा तुटवडा आहे... तूर्त काही दिवस कोरा चहाच प्यावा’- सदाभाऊ.
‘कृपया आंदोलनाकडे दुर्लक्ष करा !..दूध-उत्पादक शेट्टींचं ऐकतील, पण गाई-म्हशी त्यांचे किती दिवस ऐकतील? सबब, त्यांना दूध द्यावं लागणारच... पण चहा पिणे तब्बेतीला वाईट !’- जानकरभाऊ. चडफडत मी फोन ठेवून दिला.
‘‘साखरेला काय झालं मग? का तीही आली नाहीए...’’ सैपाकघराकडे तोंड करून आम्ही उगीचच तक्रार केली.
‘‘संपली आहे ! नवी आणा, हिंमत असेल तर...,’’ आतून थंड उत्तर आले. शेतकऱ्यांशी पंगे घेऊन कारभार करणे तितके सोपे नाही, अशा आशयाचे काही भेदक उद्‌गारही ऐकू आले.

...टीव्हीवरची दृश्‍ये पाहून तर मन हेलावले. बादल्याच्या बादल्या दूध लोक रस्त्यावर फेकून देत होते. एक दूध उत्पादक तर आपल्या गायींना दुधाची आंघोळ घालत होता. अरेरे ! असे उद्‌गार काढून टीव्हीच बंद करून टाकला. इथे आम्हाला चहाला घोटभर दूध नाही आणि हे गुरांना दुधाची आंघोळ घालताहेत. अरे, दिवाळी आहे का?
...तेवढ्यात आमचे ज्येष्ठ सहकारी चंदुकाका कोल्हापूरकर आले. कुठल्याही पेचप्रसंगात शांत राहणाऱ्या ह्या सद्‌गृहस्थांकडे बघून मला हेवा वाटतो. ते नेहमीप्रमाणे गाणे गुणगुणत होते.
‘‘अहो, परिस्थिती काय, तुम्ही गाणी काय गुणगुणताय?’’ मी तक्रारीच्या सुरात विचारले. त्यावर त्यांनी गाणे बदलले, इतकेच.
‘‘चहा घेऊन आलाच असाल...’’ मी थेट पुणेरी पद्धतीने विचारून मोकळा झालो. ते अर्थपूर्ण हसले !
...असो ! काही दिवस लिंबूसरबतावर काढण्याचे ठरवले आहे. पण चहावाल्याच्या देशात चहा कोरा होणे किती क्‍लेशकारक आहे? ह्या विचाराने मन दुधासारखे नासले आहे !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com