जगाला प्रेम अर्पावे..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (अत्यंत गंभीरपणे एण्ट्री घेत) मी आलोय मम्माऽऽ...! मैं आ गया हूं!!
मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) बरं वाटत नाहीए का बेटा? नेहमीसारखी उत्साहात एण्ट्री झाली नाही तुझी आज! आणि कुठे होतास इतका वेळ?
बेटा : (प्रामाणिकपणाने) मी अशा एका व्यक्‍तीबरोबर होतो की वेळ कसा गेला कळलंच नाही!!
मम्मामॅडम : (लाइटली घेत) तुला भूक लागली असेल!! लहानपणापासून बघतेय मी, भूक लागली की तू काहीही...
बेटा : (नकारार्थी मान हलवत) मला प्रेमाची भूक आहे मम्मा! जिथे मला पोटभर प्रेम मिळतं, तिथंच मी ओढला जातो! प्रेमापुढे पास्ता काहीच नाही! मी प्रेम वाटतो, म्हणूनच उभा देश माझ्यावर प्रेम करतो! पुढल्या वर्षी येणारी निवडणूक मी प्रेमाच्या जोरावरच जिंकणार आहे! प्रेम हाच माझ्या पक्षाचा अजेंडा, जाहीरनामा आणि किमान सहमतीचा कार्यक्रम असेल!! बघशील तू!...(सुरात गुणगुणत) खरा तोऽऽ एकचिऽऽ धर्मऽऽ जगाऽऽला प्रेम अर्पाऽऽवे...
मम्मामॅडम : (चक्रावून) ओह गॉड, तुला काही कुणी बोललं तर नाही ना? त्या कमळ पार्टीच्या नतद्रष्टांनी पुन्हा तुझी खोड काढली की काय?
बेटा : (नाक मुरडत) ते कशाला माझी खोड काढतील! माझं त्यांच्यावरदेखील प्रेम आहे! खोड काढली तर मी त्यांनाही प्रेमाने आलिंगन देईन!!
मम्मामॅडम : (त्याच्या कपाळाला हात लावत) ...तू बरा आहेस ना?
बेटा : (दुर्लक्ष करत) रांगेतल्या शेवटच्या माणसासोबत मी उभा आहे, मम्मा! ही रांग आहे कुंठितांची, वंचितांची, शोषितांची! त्यांचा धर्म, जात किंवा श्रद्धेशी मला फारसं कर्तव्य नाही! दु:खितांचा शोध घेऊन त्यांना आलिंगन देण्यासाठीच मी उभा आहे! भय आणि घृणा नष्ट करण्यासाठीच माझं अस्तित्व आहे! सर्व प्राणिजातावर माझं प्रेम आहे! मी काँग्रेस आहे... आमेन!
मम्मामॅडम : (कंप्लीट चक्रावून) बाप रे! काय झालंय तुला? थांब, जरा... अहमद अंकलना बोलवते... (हाका मारत) मि. एहमाऽऽद... हा बघा कसं करतोय ते!! ओह माय गॉड!!
बेटा : (दिलासा देत) अशी भयभीत होऊ नकोस मम्मा! आत्ता मी बोललो ना, तो सुविचार मी ट्‌विट केलाय!!...तू बघितला नाहीस? डोण्ट वरी मम्मा, घाबरू नकोस अशी! मी आहे ना?
मम्मामॅडम : (खोल आवाजात) तीच भीती वाटतेय रे!
बेटा : (उपदेशपर सुरात) नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मला एक प्रश्‍न विचारला गेला की ‘‘साहेब, आपला पक्ष नेमका कुणाच्या बाजूने आहे?’’ मी म्हटलं, ‘हा काय प्रश्‍न झाला? काँग्रेसला असा प्रश्‍न विचारणारे तुम्ही कोण?’ पण मग मी अंतर्मुख होऊन विचार केला! खरंच, आपला पक्ष मुळात आहे कुणासाठी? सांग बरं?
मम्मामॅडम : (बुचकळ्यात पडून ) हेच ते ...गरीब, किसान, मजदूर वगैरे!
बेटा : (उजळलेल्या चेहऱ्यानं) अंहं!! आता आपण लाईन बदललीये मम्मा! आपला पक्ष हा सर्व प्राणिजातासाठी आहे!! आय लव्ह ऑल लिव्हिंग बिईंग्ज!!...
मम्मामॅडम : (खचून जात) आपली पोलिटिकल पार्टी आहे, बेटा! आश्रम नाही!!
बेटा : (प्रवचन कंटिन्यू...) हा साक्षात्कार एकांतात किंवा विजनवासात होत नाही, तर समाजात राहूनच होतो मम्मा! माझी योजना प्रेम वाटण्यासाठीच आहे, हे आता मला पटलं आहे... म्हणूनच रांगेतल्या शेवटल्या माणसासोबत मी इतका वेळ उभा होतो!!
मम्मामॅडम : (गोंधळून) कोड्यात बोलू नकोस! महाराष्ट्रातल्या पृथ्वीबाबाजींसोबत होतास का? रांगेतला शेवटचा माणूस कोण?
बेटा : (एक मस्त पॉज घेत पोक्‍त सुरात) मीच!..मीच माझ्याबरोबर होतो, मम्मा! मी ‘मी’ आहे, मी आहे काँग्रेस!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com