वढाय वढाय..! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर...

...बहिणाबाईंच्या ओव्या गुणगुणत आम्ही छताच्या पंख्याकडे एकटक पाहात पहुडलो आहो. बाहेरील हिरव्यागार मळ्याकडे पाहात आयुष्यातील रखरखाटाचा विचार करतो आहो. मनात गीतासार उमटते आहे...तुम्हे कहां जाना था, तुम कहां पहुंच गये? तुमने क्‍या चाहा था, जो तुम्हे नहीं मिला? तुमने क्‍या पाया, जो तुमने खो दिया?
...इथं आमच्या मळ्यात पक्षीबिक्षी खूप येतात. येतात, पुन्हा उडतात. पाखरेच ती! माणसाच्या मनासारखीच वागणार. कितीही हाकलले तरी पुन्हा पिकावर येऊन पडणार. इथे मळ्यात असे काहीबाही छान सुचते.

वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर...

...बहिणाबाईंच्या ओव्या गुणगुणत आम्ही छताच्या पंख्याकडे एकटक पाहात पहुडलो आहो. बाहेरील हिरव्यागार मळ्याकडे पाहात आयुष्यातील रखरखाटाचा विचार करतो आहो. मनात गीतासार उमटते आहे...तुम्हे कहां जाना था, तुम कहां पहुंच गये? तुमने क्‍या चाहा था, जो तुम्हे नहीं मिला? तुमने क्‍या पाया, जो तुमने खो दिया?
...इथं आमच्या मळ्यात पक्षीबिक्षी खूप येतात. येतात, पुन्हा उडतात. पाखरेच ती! माणसाच्या मनासारखीच वागणार. कितीही हाकलले तरी पुन्हा पिकावर येऊन पडणार. इथे मळ्यात असे काहीबाही छान सुचते.

राजकारणाच्या धबडग्यातून दूर असे एकांतात बरे वाटते. एक धनछडीचा जोड पहाटे खिडकीवर येऊन टोचा मारून उठवतो. हिवाळ्यात हळदा कुलकुलून जायचा. हल्ली तांबट पक्ष्याला फार कंठ फुटला आहे...पाखरांचा किलबिलाट ऐकत मस्त स्वप्ने बघता येतात.

मुंबई जिंकायला निघालो होतो, शेवटी मळा नशिबी आला! कुंडलीतले ग्रह जरा बरे असते (किंवा अन्य काहींचे ग्रह वक्री असते) तर आज "वर्षा' बंगल्याच्या हिर्वळीवर वेताच्या खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत कांदेपोहे खाल्ले असते! फायली बगलेत मारून लक्ष वेधून घेण्याचा खटाटोप करणाऱ्या पीएकडे सपशेल दुर्लक्ष केले असते! कोंडाळ्यात आरामात डुलत डुलत चालत येत टीव्ही वाहिन्यांच्या प्रतिनिधींना झक्‍कास बाइट दिले असते. महाराष्ट्राच्या विकासासाठी कसे जोरात काम होऊन ऱ्हायले आहे, ह्याची न चुकता भाषणात जंत्री दिली असती.

वास्तविक पक्षात ज्येष्ठ मी! पक्षाला सत्तेत आणले मी! मुख्यमंत्रिपदी मी विराजमान व्हावे, हे नैसर्गिक न्यायाला धरून झाले असते. पण, हल्ली न्यायच कुठे शिल्लक राहिला आहे? सीनियॉरिटी डावलून दुसऱ्याच कुणाला तरी मुख्यमंत्री केले. चालायचेच. म्हटले काही दिवस वाट पाहू...मग मुख्यमंत्र्याची खुर्ची जाते कुठे? पण गेली ती गेलीच...

ज्युनियर लोक मोठ मोठ्या निवडणुका जिंकताहेत. टणाटणा घोषणा करताहेत, आणि आम्ही बसलो आहोत इथे मळ्यात पाखरांना झिर्र झिर्र करीत!! हा काय न्याय झाला?
परवा दुखऱ्या टांचा कुर्वाळत बसलो असताना कुणीतरी विचारले, ""काय भाऊ, कसं काय चाललंय?''
तर बोलण्याच्या ओघात सहज बोलून गेलो की खरा मुख्यमंत्री मीच! मनातले विचार ओठांवर आले. नको तेव्हा आले, हे कबूल...पण त्यात काय गुन्हा आहे?
पण पक्षातल्याच काही संभावितांनी लगेच त्या धनछडीच्या पाखरासारख्या खिडकीवर येऊन टोचा मारल्यान..!! म्हणाले, ""आवडेल तं काय झालं...भाऊंना मुख्यमंत्री काय, प्रधानमंत्री व्हायलासुद्धा आवडेल...पण कुणी केले तर पाह्यजे?''
खरे सांगतो, हे ऐकले आणि काळजाला घरे पडली. त्या दिवशी मळ्यात येवढी गोफण फिरवली की एक पाखरू बसू दिले नाही!! शेवटी थकून खांदे चोळत पुन्हा पडला ऱ्हायलो. मला पंतप्रधान व्हायला आवडेल, हे वाक्‍य उल्टेपाल्टे करून दिल्लीला कळवण्यात आले की झाऽऽले...मग आम्ही आयुष्यभर ह्या मळ्यातच राहणार...हरी हरी!!

प्रामाणिकपणाने सांगतो, मला मुख्यमंत्री होण्यात काडीचाही रस नाही! प्रधानमंत्री होण्यात तर अजिबातच रस नाही!! मी राष्ट्रपती होणार नाही की साधा केंद्रात मंत्रीही होणार नाही. मला पदांचा मोह नाहीच्चे. पदांचा मोह असता तर इतकी वर्षे गोफण फिरवत बसलो असतो का? नाही!!
...मला पुन्हा एकदा साधासा मंत्री व्हायचे आहे. आवतणाची वाट पाहात मळ्याकडे नजर लावून बसलो आहे. मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर...हिर्र हिर्र!!

Web Title: editorial dhing tang british nandi article