दोन दैवते, एक कौल! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम:..रोज हा मंत्र १०८ वेळा लिहिण्याचा संकल्प आहे. तथापि, आज त्याची गरज नाही. कारण आज भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन जाहले. एक सोडून दोन-दोन भगवंत !! किती कृतकृत्य वाटते आहे !! आजचा दिवस सुवर्णाच्या (सोनियाच्या नव्हे !) अक्षरात लिहून ठेवावा असा आहे. ज्या दोघा दैवतांची आयुष्यभर नमोभावे (प्रिं. मिस्टेक नाही...नमोभावेच...) पूजा केली, त्या दोन्ही अलौकिक शक्‍ती माझ्या नश्‍वर देहीं एकवटल्याची भावना होत्ये आहे...

सकाळी उठून राजधानी दिल्लीला आलो. आल्या आल्या निरोप मिळाला की चलो, बुलावा आया है...डोक्‍याला केसरिया पट्‌टी बांधून भजने गात निघावे, असे मनात होते. पण काही कळायच्या आत मला मोटारीत बसवण्यात आले. ‘अरे अरे..’ असे म्हणेतोवर समोर ‘७, लोककल्याण मार्ग’ अशी पाटी दिसली. ओहो, साक्षात नमोजींचे सदेह दर्शन होणार, ह्या कल्पनेने थरारून गेलो...

हे सौम्य स्वरूपाचे दैवत आहे. रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असलेल्या भक्‍तांलागी त्यास कळवळा आहे. कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहणाऱ्या ह्या जागृत दैवताचे गुणगान म्यां पामराने काय गावे? त्याने बुलावा धाडिला, हेच खूप झाले !! पवित्र अशा त्या मंदिरात पाऊल ठेवले आणि काहीचिया बाही जाहले. ‘मन की बात’ मनातच राहिली. अवघ्या देहामनात नमोनामस्मरणाचा गजर होऊ लागला. काहीशा तुर्यावस्थेतच खुर्चीत सावरून बसलेलो असताना ती प्रेमळ हांक ऐकू आली...
‘‘देवेऽऽनभाई, केम छोऽऽ?’’ केम छो? केम छो...केमछ...केम..के...के...क...(इको इफेक्‍ट हं!)
...तटकिनी खुर्चीतून उठून बसलो. धडपडून साष्टांग लोटांगण घातले. पाठीत धपाटा बसला. ‘एऊ ना करवाय...’’ असे मधाळ शब्द ऐकू आले.
‘‘महाराष्ट्रामदी बद्धा च्यांगला आहे ने?’’ त्या प्रेमळ, मधाळ व दुधाळ आवाजाने चौकशी केली. खरे सांगतो भडभडून आले. कसला च्यांगला आहे महाराष्ट्रात? जीव नक्‍को झाला आहे!! पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या होमहवनात दानव येऊन हाडे टाकीत असत म्हणे!! सध्या आमच्या कारभारात हे विरोधकरूपी दानव अशीच विघ्ने आणत आहेत. आंदोलने, संपांनी जीव विटून गेला आहे. कुठल्या तरी दैवी हस्तक्षेपाशिवाय आता तरणोपाय नाही...
‘‘एकही दिवस असा जात नाही की कुठले आंदोलन नाही, गुरुवर!,’’ मी अतिवरिष्ठ पातळीवर तक्रार गुदरली.
‘‘चिंता ना करो...बद्धा ठीक होऊन ज्याणार ! सांभळ्यो?’’ त्या प्रेमळ, मधाळ, दुधाळ आणि आता तुपाळ (हे फायनल हं...आमचे ‘ळ’ संपले !!) आवाजाने दिलासा दिला.
‘‘दिल्ली मां आवानुं छे?’’ त्यांनी हळूचकन विचारले. पोटात गोळा येऊन आम्ही पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून प्रसादाचा ढोकळा तळहाताच्या द्रोणात घेऊन धूम ठोकली.

नमोभावे दोन्ही डोळ्यांना चिकटवून मुखात टाकून तेलकट हात डोईला पुसला आणि तिथून निघालो ते थेट दुसऱ्या देवस्थानात गेलो ! डोळे चुरचुरत होते. ढोकळ्याची फोडणी डोळ्यात गेली असणार...जाऊ दे. ‘६-ए, दीनदयाळ उपाध्याय मार्गा’वरील मंदिराचा कळस दिसू लागला आणि डोळ्यांची धणीच फिटली !

...हे दैवत नाही म्हटले तरी अंमळ उग्र स्वरूपाचे आहे. भक्‍ताने यावे, आपला नवस सांगावा (किंवा वेळेत फेडावा !) ह्या कामी फार पर्टिक्‍युलर असे हे दैवत आहे. नवस बोलून तो फेडला नाही की खेळ खलास ! दानव बरे, अशी पाळी येत्ये !! पण टायमात नवस फेडला तर मात्र भक्‍ताला तत्काळ यशफलप्राप्ती होते.
सोफ्यावर बसलेल्या उग्र दैवताने स्थिर डोळे रोखून भिवया उडवल्या. विचारले, ‘‘शुं काम? दिल्ली आवानुं छे?’’
...पुन्हा पोटात गोळा येऊन आम्ही फक्‍त सपशेल लोटांगण घातले. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com