शुक शुक मंत्रालय! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

कार्यक्षम आणि शिस्तबद्ध अशा एकनिष्ठ कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्यास टाळाटाळ सरकारच्या तिजोरीत नेमके किती पैसे आहेत? ह्याची उकल करण्यासाठी आम्ही सकाळी उठून आंघोळबिंघोळ करून मंत्रालयात गेलो. सरकारी तिजोरी नावाचे कपाट मंत्रालयातच असणार, असा दाट संशय आम्हाला होता. तो खरा ठरला. तथापि, संपकऱ्यांच्या कडक पवित्र्यामुळे मंत्रालयात अक्षरश: सामसूम असल्याचे आमच्या दृष्टोत्पत्तीस आले.

अभ्यागताचा पास काढण्यासाठी खिडकीपाशी गेलो. खिडकी उघडी होती, पण ‘बंद’ही होती. आतील मनुष्याने नुसता हात वारून आम्हाला ‘जा, जा’ असे सांगितले...पायऱ्यांवर शुकशुकाट होता. बंदोबस्ताला असलेले पोलिसदेखील तुलनेने आज थोडे आरामात होते. तुरळक अभ्यागते उगीचच चेहरा टाकून इमारतीत शिरत होती. मेटल डिटेक्‍टरमधून पसार होताना आम्ही पोलिसदादाकडे बघून स्नेहपूर्ण हसून घेतले. त्यावर त्यांनी ‘कशाला आले आज? काय होनार नाही कामफीम’ अशा आशयाचे उद्‌गार काढले.
‘‘आज ष्ट्राइक आहे णा...गवर्मिटवाल्यांचा!’’ त्यांनी खुफिया माहिती पुरवल्याच्या आवाजात सांगितले. म्हणाले, ‘‘पगार नाय, महागाई नाय...काय नाय की काय नाय! सनासुदीला काय करावं मान्सानं...
‘‘जगणं कठीण झालंय हल्ली दादा!’’ आम्ही नेमस्तपणाने अनुमोदन दिले.
‘‘चुचुक...’’ पोलिसदादा म्हणाले. अनुमोदनाखातर त्यांनी आमच्याकडे गाय छाप आहे का? अशी चौकशी खुणेनेच केली.
 ...इमारतीत शिरलो. इतक्‍यात ‘शुकशुक’ असा आवाज आला. एक व्यक्‍ती ओठांचा चंबू करून ‘शुक शुक’ असे करीत होती.
‘‘कोणाला करताय शुकशुक?’’ आम्ही विचारले. आम्ही चिकित्सक बुद्धीचे आहो. (म्हणूनच मंत्रालयात येतो...) असो.
‘‘कोणालाच नाही...असंच!’’ शुकशुक करणाऱ्या व्यक्‍तीने ओशाळ्या चेहऱ्याने खुलासा केला.
‘‘का?’’ आम्ही.
‘‘आज मंत्रालयात किती शुकशुकाट आहे ते बघत होतो..तुम्ही कुठे निघालात? सगळं बंद आहे...,’’ ती व्यक्‍ती म्हणाली.
‘‘सरकारी तिजोरी बघायला जायचे आहे...’’ आम्ही सत्य काय ते सांगितले.
‘‘आहे काय त्यात? पण चला, दाखवतो! सहाव्या मजल्यावर आहे...’’ त्या व्यक्‍तीने खुलासा केला. सहाव्या मजल्याशी जाणाऱ्या लिफ्टच्या समोर तीन-चार अभ्यागत शुकशुक करीत लिफ्टला बोलावत होते. लिफ्टमनचा पत्ता नव्हता. लिफ्टच्या दाराशी दातांनी काडी चावत उभी असलेली व्यक्‍तीच दररोज उत्कर्ष साधणारा लिफ्टमन असावा असे वाटले.
‘‘अहो, शुकशुक...सहाव्या माळ्यावर जायचंय!’’
‘‘थुथुक...जा की मग त्याच्या***..,’ दातातली काडी काढत त्या माणसाने ओठांची भेदक हालचाल करून आपण संपावरील कर्मचारी असल्याचे दर्शवून दिले.
...सहा मजले चढून जाणे तितकेसे सोपे नाही. तथापि शुकशुक करणाऱ्या व्यक्‍तीने आम्हाला तेथवर मजला दरमजला करीत नेलेच. अधूनमधून असे संप झाले तर मंत्रालयातील अभ्यागतांचे कोलेस्टेरॉल कमी होईल, असे मत आम्ही मनातल्या मनात नोंदवले.

सहाव्या मजल्यावरील एका भव्य तिजोरीसमोर त्या गृहस्थांनी आम्हाला नेऊन उभे केले. ‘उघडू का?’ अशी परवानगी मागून खिशातून चाव्यांचा जुडगा काढला आणि तिजोरीचा दरवाजा उघडला. पाहतो तो काय! आतमध्ये दगडधोंडे, मातीचे नमुने, झाडांची रोपटी व बी-बियाणे ठेवलेले!!
‘‘हे काय?’’ आम्ही एक किंचाळी मारली.
‘‘अहो, शुकशुक...जरा हळू ओरडा. मुनगंटीवारसाहेब म्हंटात ते मीच! बरं तर बरं, मी वनमंत्रीसुद्धा आहे!! इथं तिजोरीत खडखडाट आहे हे माहीत होतं, म्हणूनच तेरा कोटी झाडं लावायला घेतली ना आम्ही?’’
...मंत्रालयात घुमलेली दुसरी किंकाळीही आमचीच होती. बाकी सगळा शुकशुकाट होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com