मल्टिप्लेक्‍स डब्बा! (ढिंग टांग)

muktapeeth
muktapeeth

मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य, गरीब मल्टिप्लेक्‍स वारकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ह्यासंदर्भात आम्ही काही मूलभूत स्वरूपाचे चिंतन केले असून त्यातील निवडक निष्कर्ष येथे मांडत आहो, जेणेकरून आमच्या (लाखो) वाचकांना जगणे सुखकर व्हावे.
पहिल्याछूट आम्ही हे कबूल करतो की आम्ही एक अट्‌टल सिनेमाप्रेक्षक आहो!! आमचे बरेचसे आयुष्य हे थिएटराच्या काळोखात गेले असून उरलेले तेथे जाण्याच्या खटाटोपात व्यतीत झाले आहे. ‘थिएटरातील आहार : एक तौलनिक अभ्यास’ हा आमचा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर असून त्यात विविध चित्रपटगृहांत मिळणाऱ्या चटकदार खाद्यपदार्थांचे वर्णन आहे. हे झाले आमचे क्‍वालिफिकेशन! आता मुख्य मुद्यांकडे वळू.

घरगुती पदार्थ थिएटरात नेणे सुरक्षेच्या कारणास्तव ठीक नाही, ह्या सरकारी युक्‍तिवादात काही अंशी तथ्य आहे. उदाहरणार्थ, सकाळी चपाती आणि कोबीच्या भाजीचा डबा भरून हपिसात गेलेल्या येरुस दुपारनंतर चित्रपट बघावयाची हुक्‍की आली आणि चित्रपट ऐन भरात आलेला असताना त्याने आपला डबा उघडला तर काय होईल? सुज्ञांनी विचार करावा! चित्रपट दाखवणे हे मल्टिप्लेक्‍सवाल्यांचे मुख्य काम असून, पदार्थ विकणे हे नव्हे, हे जरी खरे असले तरी अरबट-चरबट खाणे हा चित्रपट बघण्याच्या प्रक्रियेचाच भाग असतो, हे सत्य डावलून कसे चालेल? पूर्वीच्या काळी थिएटरांमध्ये तिखट डाळ, उकडलेली अंडी, भजी-वडे आदी सकस अन्नपदार्थ मिळत. हल्ली ‘नाचो’ (हे खाद्यपदार्थाचे नाव आहे..!) ‘टाको’ (हेसुद्धा!) हॉट कॉर्न आदींनी त्यांची जागा घेतली आहे. तिखट डाळीचे वा चकलीचे पाकीट तेव्हा रुपाय-दोन रुपयांना असे. नाचो, टाको आदी नाविन्यपूर्ण पदार्थांचे रेट बघितले तरी संतापाने जीव लाही लाही होतो. असो.

अनेकांना चित्रपटगृहांमध्ये घरचे अन्न उपलब्ध होणे कठीण असते. उदाहरणार्थ, कॉलेज अथवा कामासाठी जातो, असे सांगून घर सोडल्यावर थिएटर गाठणाऱ्या माणसाने घरचा डबा कसा बांधून आणावा? त्याला बाहेरचे पदार्थच खावे लागणार!! घरचे अन्न घेऊन सिनेमा बघायला जाणे म्हणजे गटारी अमावस्येच्या पार्टीला बाटलीत ताक नेण्यापैकी आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे.

हल्ली होम डिलिवरीच्या नावानिशी हॉटेलातील पदार्थ घरपोच होताना दिसतात. त्याचप्रमाणे घरचे पदार्थ हाटेलात बसून खाण्याची मुभा मिळाली तर ते सयुक्‍तिक ठरावे. पूर्वीच्या काळी हाटेलात एक चहा मागवून जेवणाचा डबा उघडणारी मनुष्ये होती. गल्ल्यावरील उडप्याने कटकट केली तर अजून एक चहा मागवून त्याचे तोंड बंद करता येत असे. थिएटरात ते शक्‍य होत नाही. आजकाल ‘तुम्हाला बिल न मिळाल्यास पदार्थ फुकट समजावेत!’ असे वाक्‍य थिएटरातील स्टॉलच्या गल्ल्यावर लिहिलेले आढळते. ऐन वेळी बिलाचे यंत्र बिघडेल, ह्या वेड्या आशेपोटी आम्ही शेकड्यांदा प्रयत्न केले, पण व्यर्थ! बिल न मिळालेला सुदैवी इसम कुठे दिसल्यास त्याच्या जीवनावर ‘संजू’प्रमाणे चित्रपट काढावा, अशी आम्ही शिफारस करू.
अशा परिस्थितीत मल्टिप्लेक्‍समध्ये जाणाऱ्या सामान्य, गरीबगुरीबांनी काय करावे? तर सबुरीने लढा द्यावा. जमल्यास एखादे सभ्य आंदोलन करणेही पोलिटिकली करेक्‍ट ठरावे...लढा जिंकल्यावर मल्टिप्लेक्‍सवाल्यांच्या नाकावर टिच्चून मुळ्याची कोशिंबीर डब्ब्यातून थिएटरात न्यावी! मल्टिप्लेक्‍सच्या जिन्यावर डोईवर पन्नास-शंभर डब्बे घेऊन जाणारा मुंबईचा डब्बेवाला ज्या दिवशी दिसेल तो सुदिन होय! क्रांती चिरायू होवो!! इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com