हेल्पलाइन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान (बुद्रुक.)
वेळ : टळून गेलेली! काळ : वेळ टाळलेला!
प्रसंग : तेलही गेले, तूपही गेले... टाइप.
पात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य ऊर्फ हृदयसम्राट ज्यु.
.............................
विक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत आत येत) हे देअऽऽर बॅब्स...मे आय कम इन?
उधोजीसाहेब : हा प्रश्‍न खोलीच्या बाहेरून विचारायचा असतो!
विक्रमादित्य : (सपशेल दुर्लक्ष करत) फडणवीस अंकलचा फोन आला होता! म्हणाले, अर्जंट बोलायचंय! मी म्हटलं माझ्याशी बोला ना! तर आधी म्हणाले की शुभेच्छा द्यायला फोन केलाय!
उधोजीसाहेब : (कपाळाला आठ्या घालत) कसल्या शुभेच्छा?
विक्रमादित्य : (निरागसपणाने) गटारी अमावास्येचा फेस्टिव्हल चालू होतोय ना! त्याच्या शुभेच्छा असतील!!
उधोजीसाहेब : (दातओठ खात) काय हा जमाना आलाय! हल्ली लोक गटारीच्याही शुभेच्छा द्यायला लागले!!
विक्रमादित्य : थॅंक्‍यू म्हणायचंय साहेबांना असं म्हणाले ते!!
उधोजीसाहेब : (संशयानं) कसलं थॅंक्‍यू? ह्या कमळवाल्यांचं काहीही सरळ नसतं! पुढल्या वेळेला आला फोन तर कट करून टाक!!
विक्रमादित्य : दबक्‍या आवाजात बोलत होते... म्हणाले, बाबांना असतील तिथं फोन नेऊन दे! मला त्यांच्याशी बोलावंच लागेल!!
उधोजीसाहेब : (हात उडवत) वेळ नाहीए म्हणून सांग!
विक्रमादित्य : (दुप्पट निरागसपणाने) असं खोटं कसं सांगणार बॅब्स!!  त्याआधी ते कोल्हापूरचे दादाकाका आहेत नं... त्यांचाही फोन आला होता! फॉर दॅट मॅटर, कमळ पार्टीच्या कितीतरी लोकांचे फोन आले!!
उधोजीसाहेब : (कंटाळून) अस्सं? काय म्हणत होते?
विक्रमादित्य : (खांदे उडवत) हेच... प्रत्येकाला अर्जंट बोलायचं होतं तुमच्याशी! ‘साहेबांना फोन द्या’, ‘प्लीज दोनच वाक्‍य बोलायची आहेत..,’ ‘हा काही गेम नाही, सिरिअस म्याटर आहे...’ वगैरे!!
उधोजीसाहेब : (क्षणभर विचार करत) हे बघ, कुणाचाही फोन आला ना... अगदी कुणाचाही... मी घरात नाही असं सांगायचं! कळलं?
विक्रमादित्य : (हसून) कुणाचा विश्‍वास बसेल? तुम्ही तर कायम घरीच असता!! हाहा!!
उधोजीसाहेब : (चिडून) विश्‍वास गेला उडत! मला फोन द्यायचा नाही, म्हंजे नाही!!
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) बॅब्स, तुम्हाला इनकमिंगचा येवढा का कंटाळा येतो? मला तर कुणाचा फोन आला की जाम आनंद होतो!! मी तर राँग नंबरवरसुद्धा अर्धा तास बोलतो!!
उधोजीसाहेब : (कंटाळलेल्या सुरात) मला फोन द्यायचा नाही! मला कुणाशीही बोलायची इच्छा नाही!! (तेवढ्यात फोन वाजतो,)
विक्रमादित्य : (फोन उचलत) हाय देअर...धिस इज मातोश्री हेल्पलाइन! हु इज धिस?
अज्ञात आवाज : (परिचित सुरात) जे श्री क्रष्ण! मातोश्री हेल्पलाइन! सरस नाम राख्यो छे हं!! कोण वात करे छे?
विक्रमादित्य : (अनवधानाने) हुं विकी वात करू छुं!! (उधोजी त्याला ‘मराठीत बोल’ अशा खुणा करतात...) मी विक्रमादित्य बोलतोय!!
अज्ञात आवाज : (प्रेमळपणाने) बेटा, तमारा पप्पा छे के घरे?
विक्रमादित्य : नथी!! तमे कोण... आपलं ते हे... तुम्ही कोण?
अज्ञात आवाज : (जमेल तितका प्रेमळ...) हुं नमोअंकल वात करू छुं बेटा!! पप्पाने आपो तो जरा फॉन!!
विक्रमादित्य : (उत्साहाने) नोप... कुणाचाही फोन आला तरी द्यायचा नाही असं त्यांनी सांगितलंय मला!
अज्ञात आवाज : (धक्‍का बसून) ओह, एवु वात छे... तो पछीऽऽ... रहवा दो!!
उधोजीसाहेब : (मेलो मेलो... असा आविर्भाव) दे दे फोन दे!!
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) तुम्हाला गटारीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या की थॅंक्‍यू म्हणायचं होतं? मी मेसेज नक्‍की देईन!! हाहा!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com