श्रावण संहिता! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

श्रावण महिना सुरू झाला असून दिवस जिकिरीचे आहेत. अशा परिस्थितीत धीराचे चार शब्द सांगण्यासाठी आम्ही तूर्त लेखणी उचलली आहे. ज्यांच्या मनीमानसी श्रावणमासी हिर्वळीसारखा हर्ष दाटुनि येतो, त्यांना आमचे वंदन असो. श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असून ह्या महिन्यात मनुष्याने व्रतस्थ राहाणे अपेक्षित आहे. गटारी अमावस्येनंतर काही दिवस माणसाने नेटाने व्रतस्थ राहून पुण्यसंचय करावा, अशा गैरसमजुतीतून ही व्रतस्थपणाची अट पडून गेल्याचे दिसते. ह्या जाचक अटींमुळेच श्रावण महिन्याचे काही लोकांना फार टेन्शन येत्ये. हा महिना कसा निभणार, ह्या कल्पनेने पोटात खड्डा पडतो.

श्रावण महिना सुरू झाला असून दिवस जिकिरीचे आहेत. अशा परिस्थितीत धीराचे चार शब्द सांगण्यासाठी आम्ही तूर्त लेखणी उचलली आहे. ज्यांच्या मनीमानसी श्रावणमासी हिर्वळीसारखा हर्ष दाटुनि येतो, त्यांना आमचे वंदन असो. श्रावण हा व्रतवैकल्यांचा महिना असून ह्या महिन्यात मनुष्याने व्रतस्थ राहाणे अपेक्षित आहे. गटारी अमावस्येनंतर काही दिवस माणसाने नेटाने व्रतस्थ राहून पुण्यसंचय करावा, अशा गैरसमजुतीतून ही व्रतस्थपणाची अट पडून गेल्याचे दिसते. ह्या जाचक अटींमुळेच श्रावण महिन्याचे काही लोकांना फार टेन्शन येत्ये. हा महिना कसा निभणार, ह्या कल्पनेने पोटात खड्डा पडतो. पोटात खड्डा पडला की भूक लागल्याची भावना होऊन जीभ खवळत्ये आणि मग श्रावण निभणे कठीण होऊन बसते. हे दुष्टचक्र आहे. वाचकहो, ह्या दुष्टचक्रातून मुक्‍तता मिळवण्याचा मार्ग दाखवण्यासाठीच आम्ही सदरील श्रावण संहिता त्रोटक स्वरूपात येथे मांडत आहो.
ही संहिता जो अंगिकारील, त्यास अच्छे दिन येतील. आधारकार्डावरील फोटो उत्तम वठेल व ब्यांकखात्यात किमान रक्‍कम न ठेवल्याबद्दल होणारा दंड कधीही आकारला जाणार नाही, ह्याची हमी आहे.  
१. ‘आम्ही कुत्रा पाळतो, श्रावण नव्हे’, हा डायलॉग मारून हल्ली हशा पिकत नाही. ह्या डायलॉगमुळे आपण जाम आधुनिक आहो आणि विज्ञानाची कास धरून जगून ऱ्हायलो आहो, असा आभास निर्माण करू नये. अंगलट येईल! कुणी चारचौघांत न्यूटनचा तिसरा नियम विचारला तर काय करायचे? बोला!!
२. श्रावणात मासे स्वस्त होतात ही एक भाबडी अंधश्रद्धा आहे. श्रावणात काय, मासे हे कधीच स्वस्त होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना मासेच काय, काहीच कधीही स्वस्त होत नसते, हा जगाचा नियम आहे.
३. श्रावणात चायनीज पदार्थात चिकन चालते, असे काही जणांना वाटते. अंडी चालत नाहीत, परंतु, आमलेट चालते, असे सांगणारा एक ‘येरु’देखील प्रस्तुत लेखकाला भुर्जीपावाच्या गाडीवर भेटला होता. अशा लोकांप्रती सहानुभूती बाळगून त्यांना अनुमोदन द्यावे.
४. श्रावणात पालेभाज्या खाव्यात, असे मुलाबाळांना त्यांचे पालक वारंवार सांगतील. लहान मुलांवर ह्याचा विलक्षण परिणाम होतो, हे पालकांनी लक्षात ठेवावे. तथापि, पालेभाज्या खाव्यात असे सांगणारे अनेक पालक, पालक सोडून पालेभाजी खात नाहीत, असे आमचे सूक्ष्म निरीक्षण आहे.
५. कुणीही श्रावणात (तरी) खोटे बोलू नये, असे म्हणतात. ही अट पाळणे राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या जनलोकांसाठी अवघड आहे. तेथे पदोपदी खोटे बोलावे लागते. एका पुढाऱ्याने ‘मला इंद्रधनुष्य दिसले’ अशी भर श्रावण महिन्यात थाप मारल्याने त्याच्याविरुद्ध एकाच वेळी शेतकरी, कामगार, एस्टी, सरकारी कर्मचारी, अशी अनेकविध आंदोलने पेटली आहेत.
६. श्रावण महिन्यात रिमझिम सरी पडल्यामुळे वातावरण रोम्यांटिक होते, असा निष्कारण संस्कार तमाम कविकुळाने मराठी मनांवर करून ठेवल्याने परिस्थिती धोक्‍याची निर्माण झाली आहे. श्रावण महिन्यात रोम्यांटिक होऊन काही करू जाल तर अनवस्था प्रसंग ओढवून ऐन श्रावणात ग्रीष्माच्या झळा भोगण्याची पाळी येईल!!
७. श्रावण महिन्यात मांसाशन आणि अपेयपान करणेचे नाही असे सांगितले जाते. इलेक्‍शनच्या काळी व अधूनमधून सरकारतर्फे ‘ड्राय डे’ घोषित केला जातो. तसा शास्त्राने श्रावण महिना हा ‘ड्राय मंथ’ म्हणून घोषित केला आहे. अर्थात ‘ड्राय डे’ला जसे मागल्या दाराने सर्व काही चालते, तसे येथेही चालून जाते.
८. सदर श्रावण संहिता प्रस्तुत लेखकाने दीप आमावास्येच्या दुसऱ्या दिवशी माध्यान्ह समयी उरलेली कोंबडी व अन्य सामग्रीचा उतारा घेऊन लिहिली असे. शुभं भवतु.

Web Title: editorial dhing tang british nandi article