गटारगाणे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी | Thursday, 16 August 2018

करोड सव्वाशे डोक्‍यांवर लोकशाहीचे गळके छप्पर पागोळीच्या खाली भगोली बर्तन भांडी आणिक टिप्पर इथून तेथे तिथून येथे अशी पसरली अफाट वस्ती जगणे येथे तेथे महाग बंधो मौत येथली बिलकुल सस्ती बिमार वस्तीमधुनी इथल्या कितिक जीविते पडली झडली पैदासाची परंतु पर्वा इथे कुणाला नाही पडली बुजबुजलेल्या सांदिफटीतून उगवत राहे आंबा पिंपळ दमेकऱ्याच्या बाजेवरती अंथरलेली जुनीच वाकळ पोटामधल्या देवभुकेचे इथे रंगते रोजच कीर्तन बुभुक्षितांच्या मोक्षासाठी पोट जाळते अधुरे जीवन

करोड सव्वाशे डोक्‍यांवर
लोकशाहीचे गळके छप्पर
पागोळीच्या खाली भगोली
बर्तन भांडी आणिक टिप्पर

इथून तेथे तिथून येथे
अशी पसरली अफाट वस्ती
जगणे येथे तेथे महाग बंधो
मौत येथली बिलकुल सस्ती

बिमार वस्तीमधुनी इथल्या
कितिक जीविते पडली झडली
पैदासाची परंतु पर्वा
इथे कुणाला नाही पडली

बुजबुजलेल्या सांदिफटीतून
उगवत राहे आंबा पिंपळ
दमेकऱ्याच्या बाजेवरती
अंथरलेली जुनीच वाकळ

पोटामधल्या देवभुकेचे
इथे रंगते रोजच कीर्तन
बुभुक्षितांच्या मोक्षासाठी
पोट जाळते अधुरे जीवन

दिवाबत्तीचा अतापता ना
कुठून यावे नळास पाणी
कसे म्हणावे जय हो, जय हो,
कशी म्हणावी सुरेल गाणी?

तिथे राहतो अण्णा त्याची
इडली चटणी केवळ अद्‌भुत
आणि सख्याच्या गुत्त्यावरती
सदा हरवतो अपुली सुधबुध

सलमा करिते काम जरीचे
रफिक चालवी भुर्जी गाडी
काड्या चावीत पांडेदादा
वसूल करतो सदैव भाडी

पद्माकरची बाईल करते
चार घरांतुन पोछा झाडू
सुमन लाटते पापड आणिक
वच्छी वळते बुंदी लाडू
पगड आठरा, बंददरी बारा
अशीच जगते इथली वस्ती
कशी करावी दयाघना रे
नशिबाशी ही सदैव मस्ती

वळवळणाऱ्या वस्तीमधुनी
वळणे घेते गटारगंगा
काठावरती तिच्या दुतर्फा
मोर नाचरे धरिती रांगा

गटार सरितेच्याच तळाशी
बुदबुद करिते अमूल्य इंधन
टपरीवरती आणि चहाच्या
कुणी ठेवितो सुखात आधण

बकाल कारंजाच्या भवती
शेवाळाचे थर हे नवथर
सांदीमधली झुरळे गाती
उच्छावाचे गीत शुभंकर

फरसबंदीच्या गल्लीत येथे
थेट उघडती शंभर दारे
दारिद्र्याचे ओघळ अवखळ
वाहत देती स्वतंत्र नारे

लोकशाहीच्या वस्तीमध्ये
माणुसकीचे अनेक विभ्रम
श्‍वास कोठला? 
मरण कोठले?
केवळ जगतो येथे संभ्रम

आत शिरावे वाकुनि माना
गरीबदासाचे हे मंदिर
वस्तीमध्ये कुणी नसे ह्या
थोर आणखी महान ईश्‍वर

जय हो, जय हो,
 जय हो आम्ही
आणिक अमुचे 
जीवित जय जय

आज तरी बा करू नका ना
उद्‌घोषामधि कोणी हयगय