‘हस्त-कमल’ संवाद! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्वतंत्रता दिवसाच्या कार्यक्रमासाठी राजधानीतील लाल किल्ल्यासमोर जमा झालेल्या मान्यवरांच्या रांगेत आम्हीदेखील होतो. रांगारांगातून पडलेले कागद उचलण्याची जबाबदारी आमच्यावर टाकण्यात आली होती व पाठीवर गोणपाट घेऊन आम्ही कर्तव्य बजावत असताना जे काही पाहिले, ते येथे सांगत आहो! कमळाध्यक्ष श्रीमान अमितभाई ऊर्फ मोटाभाई अने तरुण तडफदार ‘हस्त‘ सामुद्रिक श्रीमान राहुलजी ऊर्फ बेटाभाई हे दोघेही अभ्यागतांच्या पहिल्या रांगेत बाजूबाजूला बसले होते, हे अनेकांनी टीव्हीवर पाहिले असेल. दोघांमध्ये झालेला संवाद मात्र कुणी ऐकला नसेल. आम्ही ऐकला! खुर्चीखालील रिकाम्या (पाण्याच्या) बाटल्या व कागद गोळा करण्याच्या मिषाने आम्ही वाकून सारे काही ऐकले!!
बेटाभाई : (खुर्चीवर बसल्याबसल्या) और कितना टाइम लगेगा?
मोटाभाई : (हाताची घडी घालून) चिंता मत करो... बहोत टाइम लगेगा! बेहतर होगा की आपण २०२८ के चुनाव की तय्यारी करो!!
बेटाभाई : (खु. ब. गु. चो.) मी भाषणाबद्दल बोलतोय!
मोटाभाई : (हा. घ. घा.) कुणाच्या?
बेटाभाई : (निरागसपणाने) प्रधानसेवकांच्या शेवटच्या भाषणाबद्दल! पुढल्या वर्षी मीच इथून भाषण करणार आहे!!
मोटाभाई : (खोचकपणाने) फू:!! मम्मीजी नाही आल्या आज?
बेटाभाई : नाही...लेकिन मैं हूं ना!! आता परेड होईल ना?
मोटाभाई : पहिल्यांदाच आलात काय इथं भाषण ऐकायला?
बेटाभाई : (जोराजोराने मान हलवत) नाही...२६ जानेवारीला आलो होतो! पण तुम्ही लोकांनी मला तेव्हा सहाव्या रांगेत बसवलं होतं! मैं कभी भुलूंगा नही वो अपमान! तेव्हाच मी ठरवलं की नाही एक दिवस...
मोटाभाई : (पुन्हा खोचकपणाने) प्रमोशनबद्दल अभिनंदन! पण सहाव्या रांगेतून बघणं अधिक सोयीचं जातं असं म्हणतात!
बेटाभाई : (गोंधळून) असं का? मग तुम्ही का बसलाय पहिल्या रांगेत?
मोटाभाई : (खुलासा करत) सहाव्या रांगेत डुलकी लागली तरी चालते! इथं पहिल्या रांगेत सगळे बघतात! मघापासून मी जांभई आवरण्याचा किती प्रयत्न करतोय!
बेटाभाई : (समंजसपणे) मला वाटलं तुमचा चेहराच तसा आहे!! हाहा!! कायम जांभई दाबल्यासारखा!! बट इट्‌स ओके!! मी लक्षात ठेवून पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या सोयीच्या सहाव्या रांगेत जागा देईन! गॅरेंटी!!
मोटाभाई : (हात उडवत) वाट बघा, वाट!!
बेटाभाई : (ठामपणाने) मी आत्तापासूनच माझं भाषण तयार ठेवलं आहे! आत्ता म्हणालात तर आत्ता जाऊन तिथं भाषण करतो!! करू?
मोटाभाई : (सबुरीचा सल्ला देत) चिंता मत करो भाई... बहुत इंतजार करना पडेगा आपको!!
बेटाभाई : (कंटाळून) असं किती वेळ बसायचं? मला आमच्या मुख्यालयात झेंडावंदनाला जायचंय!
मोटाभाई : (दिलासा देत) चिंता मत करो... मला पण जायचंय!
बेटाभाई : (आश्‍चर्यानं) आमच्या मुख्यालयात?
मोटाभाई : (हसू आवरत) अंहं... आमच्या मुख्यालयात!
बेटाभाई : (चंग बांधल्यागत) येत्या इलेक्‍शनमध्ये मी तुमची अशी अवस्था करणार आहे की ओस पडेल तुमचं मुख्यालय!!
मोटाभाई : (खळखळून हसत) भलतेच बुवा तुम्ही विनोदी! हाहा!!
बेटाभाई : (आसपास शोधक नजरेने पाहत)... मागल्या रांगेत तो आंबट चेहऱ्याचा माणूस कोण बसलाय?
मोटाभाई : (मागे वळून पाहात) तो आम आदमी आहे!!
बेटाभाई : (आणखी चौकश्‍या करत) आणि त्यांच्या बाजूला कोण आहे?
मोटाभाई : (घाईघाईने) तमे आगळ जुओ ने...
बेटाभाई : (विचारात पडत) आपल्या दोघांमध्ये एक खुर्ची रिकामी आहे! इकडे सरकून बसा ना!!
मोटाभाई : (अजीजीने) बसतो! लेकिन गले तो नहीं लगाओगे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com