मुक्‍ती! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आभाळात घिरट्या घालणाऱ्या
गिधांच्या थव्याकडे बघत
धनुर्धर पार्थाने हताशेनेच
हलवली मान, परंतु
युगंधराच्या मागोमाग
तो चालू लागला निमूटपणाने.
दूरवर पिप्पलीच्या वृक्षातळीं
कुरुंचा जत्था दिसत होता...
उत्तरायणाच्या प्रतीक्षेत पडलेल्या
पितामह भीष्मांचा शरपंजर
हळूहळू दृग्गोचर होऊ लागला,
तसे पेटकेच येऊ लागले,
पार्थाच्या पायांत...

कुरुक्षेत्रातील भणाण वाऱ्यांवर
उडणारे उपवस्त्र सावरत
युगंधराने जवळ येऊन
कुरवाळले पितामहांचे भाळ.
काळजीच्या सुरात त्याने
विचारले : ‘‘किंचित ज्वर
दिसतो आहे,
रणवैद्यकाला पाचारण केले?’’
भीष्मांनी तिरक्‍या नेत्रांनी
पाहिले युगंधराकडे,
आणि मुखातून येणारा
रक्‍ताचा ओघळ टिपत
केले किंचित स्मित.

किंचित उसासा टाकत
ते म्हणाले : गोविंदा,
तुझ्या कूट राजकारणाचे आणि
पार्थाच्या बाणांचे विष पचवून
जीवित असलेल्या ह्या गांगेयाला
ज्वर काय करणार आहे?’’

धनुर्धर पार्थ गडबडून गेला.
‘‘क्षमस्व, पितामह, क्षमस्व!
पण तुमच्या दिशेने सोडलेल्या
प्रत्येक बाणात धडधडत होते,
एक आक्रंदणारे हृदय.
कुठल्याही नरपुंगवाला शक्‍य
नव्हता आपला पाडाव, म्हणूनच-’’

‘‘म्हणून तू अर्धपुरुष शिखंडीच्या
स्त्रैण अस्तित्वाची ढाल
करून लढलास रणधुरंधरासारखा?
तेव्हा कोठे गेला होता
पार्था तुझा राजधर्म?
शिखंडीच्या आड दडून
ह्या गांगेयाला शरशायी
करण्याची ही तुझी
नीती कुठल्या धर्मग्रंथातली?
धनंजया, ह्या कृत्यामुळे
रणातला तुझा पराक्रम
तर डागाळलाच, पण
ह्या यादवाचे देवत्वही
कचकड्याचे ठरले रे...’’

पाठीमागे हात बांधून शांतपणे
उभ्या असलेल्या युगंधराने
धीरगंभीर स्वरात दिले उत्तर :
‘‘शांतनवा, राजधर्माइतकाच
श्रेष्ठ युद्धधर्म असतो,
हे मी तुला वेगळं काय सांगावं?’’
एवढ्याशा संवादानेही
धाप लागलेल्या पितामहांनी
पाळले फक्‍त मौन.
आभाळातील गिद्धांचे थवे
दिवसागणिक जवळ येऊन
घिरट्या घालत होते...

‘‘काही दिवसांत उत्तरायण लागेल,
पितामह, तोवर तुम्ही...’’
पश्‍चात्तापदग्ध पार्थ सद्‌गदित
स्वरात म्हणाला, तेव्हाही
पितामहांच्या चेहऱ्यावर
होते एक मंद स्मित.
पार्थाला मध्येच अडवून ते म्हणाले :
अर्जुना, माझे युद्ध मी लढलो,
तुझे तुला लढायचे आहे...
मी आता जाणार... पुढले कांड
देखतडोळां बघण्याची माझी
सिद्धता नाही, आणि
...कदाचित पात्रताही!’’

एवढे बोलून भीष्मांनी डोळे मिटले.
त्याक्षणी युगंधराने वळवली पाठ,
आणि तो रथाकडे निघाला,
अश्‍वांचे वेग हाती पेलत
तो पार्थाला एवढेच म्हणाला :
चल, आता रण तुझे आहे...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com