मखरशोभा (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

माध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे म्हणाले. आज कुठले व्यंग्यचित्र काढावे, ह्या विचारात गंभीर मुद्रा करोन निमग्न असल्याने राजियांनी नुसता हात उडवला. हात उडवणे हे दुहेरी असते. हाकलण्याचे हातवारे लांबून बोलावल्यासारखे वाटतात. साहजिकच फर्जंदाचा गैरसमज झाला. त्याने पदाधिकारी मंडळींना आतमध्ये पाचारण केले.
‘‘मुजरा, साहेब!’’ फर्जंदाने केलेल्या खुणेबरहुकूम प्रोटोकॉल पाळत सर्व पदाधिकाऱ्यांनी मुजरा केला.

माध्यान्हीच्या सुमारास अंत:पुरात दबकत शिरून फर्जंदाने राजियांना वर्दी दिली, की काही मोजके गणेश मंडळांचे पदाधिकारी आपल्याला भेटू इच्छितात. ‘हुं:’ राजे म्हणाले. आज कुठले व्यंग्यचित्र काढावे, ह्या विचारात गंभीर मुद्रा करोन निमग्न असल्याने राजियांनी नुसता हात उडवला. हात उडवणे हे दुहेरी असते. हाकलण्याचे हातवारे लांबून बोलावल्यासारखे वाटतात. साहजिकच फर्जंदाचा गैरसमज झाला. त्याने पदाधिकारी मंडळींना आतमध्ये पाचारण केले.
‘‘मुजरा, साहेब!’’ फर्जंदाने केलेल्या खुणेबरहुकूम प्रोटोकॉल पाळत सर्व पदाधिकाऱ्यांनी मुजरा केला.
‘‘कॅयॅय?’’ राजियांनी प्रेमभराने चवकशी केली. त्यांच्या सुरात सहानुभाव होता. पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्‍तिभाव होता. हा खरा विघ्नहर्ता! जे सरकारला जमत नाही, ते राजे सहजी करोन जातात.
‘‘साहेब! वाचवा आम्हाला...,’’ पदाधिकारी म्हणाले.
‘‘कॅयॅय कटकट?’’ राजियांनी पुन्हा एकवार प्रेमळ पृच्छा केली. पदाधिकाऱ्यांना आधाराचा हात पाठीवर फिरल्यागत वाटले. कोर्टाचे आदेश, कायदा-सुव्यवस्था, रस्त्यातील खड्डे आदी गोष्टींनी आधीच हैराण झालेल्या पदाधिकाऱ्यांनी जावे तरी कोठे?
‘‘साहेब, औंदा गणपती उच्छाव करणे जिकिरीचे जाहले आहे..’’ एक पदाधिकारी रडकुंडीला येवोन म्हणाला.
‘‘होय, साहेब! प्लास्टिकबंदीने तर आम्ही गुदमरून गेलो आहो!’’ दुसरा पदाधिकारी कुरकुरला.
‘‘...आनि रस्त्यात खड्डे किती? मिरवनूक काडन्याची काई सोयच नाही राहिली, साएब!’’ ति. प. म्ह.
‘‘एक उत्सव पण अटी किती? श्रींची मूर्ती अमूक इतकीच उंच हवी, मांडव अमूक इतकाच मोठा हवा, मंडपाच्या नजीक पार्किंगची मुबलक व्यवस्था हवी, स्वच्छता पाळावी, स्वच्छतागृहांची सोय असावी, पाण्याची सोय असावी, गर्दीचे नियोजन अचूक हवे, इतकेच नव्हे, तर मखरदेखील थर्मोकोलचे असता कामा नये...अशा २१ अटी सरकारने घातल्या आहेत...,’’ चौ. प. तावातावाने बोलू लागला.
‘‘खामोश!’’ राजे कडाडले. गर्रकन मान फिरवोन म्हणाले, ‘‘एकाने एक अट सांगावी!! गोंधळ घालो नये!!’’
हरेकाने एकेक अट सांगितली. त्या एकवीस निघाल्या! गणपती उच्छावाच्या एकवीस अटींची आयडिया राजियांना मनातून आवडली होती. एकवीस मोदकांसारख्या एकवीस अटी!! ‘ह्या अटी पाळल्या तरच मोदक मिळतील’ अशीही एक अट त्यांना सुचली. ते मनातल्या मनात खुदकन हसले.
‘‘काय सांगू साहेब! औंदा देवाला मखर पन करता येनार नाही...ओन्ली लायटिंग!’’ एक पदाधिकारी म्हणाला. गेल्या वर्षीपर्यंत हा बहुधा कार्यकर्ता असावा!
‘‘का?’’ राजियांनी अनवधानाने विचारले.
‘‘थर्माकोल बॅन झाला ना... आता थर्माकोलची मखर केली तर पोलिस लोक जीपमधी बशिवतात!’’ पदाधिकारी-कम-कार्यकर्त्याने खुलासा केला.
‘‘क्‍काय? जीपमध्ये?
‘‘तर हो! थर्माकोल दिसलं की डायरेक मखरासकट कलाकार अंदर... जबरी दंड होतोय साहेब!’’ पदाधिकारी हुळहुळला. तद्‌नंतर ‘थर्माकोलचे दिवस’ ह्या विषयावर अनेक मनोरम अनुभवांचे आदानप्रदान केले. थर्माकोल नाही, तर मखर नाही, मखर नाही तर डेकोरेशन कसले? असा त्यांचा रास्त सवाल होता. थर्माकोल हे प्रकरण पर्यावरणाचा महाभयंकर नाश करते. शिवाय ते पाण्यावर तरंगते! लहानपणी पव्हायला शिकिवणारी ही अमर वस्तू आता बंदी आयटम झाला, हे काही बरोबर झाले नाही...अशा आशयाच्या तक्रारी मांडण्यात आल्या.
शिवाय देव नाही, हे तर खरेच होते. देव्हारा सलामत तो देव पचास!
‘‘तुम्ही न घाबरता मखर करा. थर्माकोल काय वाट्टेल ते वापरा बिनधास्त! मी आहे ना...’’ राजियांनी छातीठोकपणाने दिलासा दिला.
‘‘थॅंक्‍यू साहेब... तुम्ही आहात म्हणून उत्सवाची शान आहे... पण पोलिस मांडवात आले तर काय करू?’’ एका पदाधिकाऱ्याने शंका विचारली.
‘‘माझ्याकडे पाठवा..,’’ राजे निर्णायक मुद्रेने म्हणाले, ‘‘...आणि हो, एक मखर इकडेही पाठवून द्या...म्हणावं, आम्ही इथंच बसलो आहोत! काय?’’

Web Title: editorial dhing tang british nandi article