भाऊसाहेबांचे राखीबंधन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

ना. भाऊसाहेबांना कोण वळखत नाही? भाऊसाहेबांसारखा नेता शोधूनही सापडणार नाही. भाऊसाहेब गेली कित्येक वर्षे सरकारात मंत्री आहेत. सत्ता कुठल्याही पक्षाची असो, मंत्रिपदी तेच असतात. पक्षकारण कोणाला चुकले आहे? परंतु, सत्ता हा लोकसेवेचा कायमस्वरुपी मार्ग असल्याने भाऊसाहेब हमेशा सत्तापक्षातच असतात. लोकांची अविरत सेवा करता यावी, म्हणून दर निवडणुकीपूर्वी ते जमल्यास पक्ष बदलतात. ते म्हणतात, माझी निष्ठा लोकांशी आहे, पक्ष महत्त्वाचा नाही. लोक हीच माझी विचारधारा. किती उच्च विचार! किती लोकशाहीची चाड!!

केवळ लोकजागृतीसाठी भाऊसाहेब दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव बसवतात. दहीहंडीचे आयोजन तर त्यांचे भारी आवडीचे! नवरात्रीचा उत्सवही ते साजरा करतात. त्यासाठी ते खपून वर्गणी गोळा करतात आणि पुरस्कर्तेही मिळवतात. मजा येत्ये!!
भाऊसाहेब अतिशय प्रेमळ गृहस्थ आहेत. त्यांचा लोकसंग्रह किती मोठा! मध्यंतरी त्यांनी आपल्या मतदारसंघात एक छोटासा बंगला बांधला. बंगल्याच्या मागल्या बाजूला एक छोटेसे हेलिपॅड आहे. तेथे त्यांना एका उद्योजक मित्राने- मित्र कसला मानलेला भाऊच तो- भेट दिलेले हेलिकाप्टर उभे असते. भाऊसाहेबांना भेटायला येणाऱ्यांची संख्याच खूप आहे. बंगल्याच्या बाहेर दारापाशी चिक्‍कार चपला असतात. ढिगारेच म्हणा ना! ना. भाऊसाहेब एकदा म्हणाले होते, ‘‘बरं का, मी स्वत: खूप गरीब आहे. इंचभर जमीन आणि गूंजभर सोने माझ्या नावावर नाही. अफाट लोकसंग्रह हीच माझी श्रीमंती... ह्या चपलांच्या ढिगाऱ्याकडे पहा, मी किती श्रीमंत आहे ते कळेल!...’’ किती खरे आहे, नै!!

‘महाराष्ट्रातील सारे पुरुष माझे बंधू आहेत आणि सर्व महिला ह्या माता-भगिनी’ असे ना. भाऊसाहेब बंधुभावाने म्हणतात. किंबहुना, त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरवातच मुळी ‘माझ्या बंधूंनो, बहिणींनो आणि मातांनो’ अशी असते. लोक खूप टाळ्या वाजवतात. ना. भाऊसाहेब हे साऱ्या महाराष्ट्राचे भाऊ आहेत. नुसते भाऊ नाहीत, तर मोठे भाऊ आहेत.

राखीपौर्णिमेला भाऊसाहेबांच्या बंगल्यासमोर लेडिज चपलांचा ढिगारा असतो, ह्यात सारे काही आले!! राखीपौर्णिमेला भाऊसाहेबांचा हात मनगटापासून मानेपर्यंत राख्यांनी भरून जातो! मागल्या खेपेला एकदा त्यांचे दोन्ही हात राख्यांनी भरले. मग माळेसारख्या त्यांनी गळ्याभोवती राख्या बांधून घेतल्या. तरीही बहिणींची रांग थांबेना, मग त्यांनी बोटांना, डोक्‍याला, कमरेला, गुडघ्याला अशा विविध ठिकाणी राख्या बांधून घेतल्या. काही वर्षांपूर्वी भाऊसाहेब काही कारणास्तव तुरुंगात होते. त्यांनी पैसे खाल्ले, असा अतिशय खोडसाळ आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला आणि त्यांना नतद्रष्टासारखे जेलमध्ये पाठवले. पण राखीपौर्णिमेला काही महिला मंडळांनी कैद्यांना राखी बांधण्याची टूम काढली, तेव्हा भाऊसाहेबांच्या हातालाही राख्या बांधल्या गेल्या. भाऊसाहेब भावनावश होऊन रड रड रडले. म्हणाले, ‘आजपासून मी सर्वांचा भाऊ!!’ तेव्हापासून ते राखीपौर्णिमा सार्वजनिकरित्या लोकशाही पद्धतीने साजरी करतात.

...आपादमस्तक राखीबंधनात अडकलेल्या भाऊसाहेबांचे फोटो पेपरात झळकतात. ट्विटर म्हणू नका, फेसबुक म्हणू नका, इन्स्टाग्राम म्हणू नका, व्हाट्‌सॅप म्हणू नका, सर्वत्र भाऊसाहेबांच्याच राखीच्या छब्या! काल तर त्यांनी टीव्ही क्‍यामेऱ्यासमोर उभे राहून बाइट दिला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते अश्रू गळ्याभोवतीच्या स्पंजाच्या राख्यांमध्ये टिपले गेले. टीव्हीवर ते म्हणाले, ‘‘माझ्या भगिनींन्नो, तुमच्या अलोट बंधुप्रेमाने हा भावड्या कंप्लीट गारद झाला आहे. मी तुम्हाला नमन करतो.’’ भावाचे काम बहिणींचे रक्षण करण्याचे असते. पण राखीपौर्णिमेला पुरस्कर्ते मिळत नाहीत, ही माझी खरी व्यथा आहे. त्यासाठी आपण सारे प्रयत्न करू... चालेल?’’
पुढल्या वर्षी भाऊसाहेबांच्या ‘स्पॉन्सर्ड’ राखीबंधनाला तुम्ही द्याल ना पाठिंबा? इन ॲडव्हान्स, थॅंक्‍यू!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com