जट्रोफा ! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

(एक ज्वलंत पत्रापत्री!)

(एक ज्वलंत पत्रापत्री!)

ना नासाहेब फडणवीस, मा. मु. म. रा, मुं, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास अत्यंत दु:ख होते की मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असून, मला ह्या रस्त्याची लाज वाटून ऱ्हायली आहे. असलावाला रस्ता आपल्यावाल्या कारकीर्दीत बनणे किंवा बिघडणे म्हंजे... शब्दच सुचून नै ऱ्हायले! फार म्हंजे फारच लाज वाटून ऱ्हायली. अशाने माणसे गोव्याले कशी जाणार? असा सवाल आहे. विमानाची टिकिटं पर्वडत नाहीत, म्हणून लोक मोटारीने, बशीने गोव्याले जातात. (किंवा येतात!) पण असला रस्ता असला तर झालंच त मग तं!!
ह्यावर उपाय म्हणून आम्ही जट्रोफा ह्या झाडाच्या बियांचे डिझेल बनवले असून विमानाले इंधन म्हणून ते स्वस्त पडते. तीन लिटर जट्रोफा तेलापासून एक लिटर बायोडिझेल बनते, असे मले कॉमर्स मिनिष्टर सुरेश प्रभूंनी सांगितले. हा मनुष्य पुड्या त नै नं सोडून ऱ्हायला? असे पहिल्यांदा वाटले, पण ते खरेच निघाले!! (माणूस सरळ आहे... रेल्वेमंत्री होता!) जाऊ दे.
परवाच्याला आम्ही डेहराडून ते दिल्ली असे विमान जट्रोफा तेलावर उडवले. ते सुखरूप पोचून गेले. काळजी नसावी! त्या कार्यक्रमाले मी हजर होतो. तेव्हा माझ्या मनात विचार आला की बोआ, बॉम्बे-गोवा विमान जट्रोफाने उडवले तर? विमान तिकिट स्वस्त झाले त मुंबई- गोवा रस्त्यावर कितीही खड्डे पडले तरी कोणाला काळजी पडली आहे? विचार करा! कळावे.
आपला. नितीनभाऊ.
* * *

प्रति, मा. चं. कोल्हापूरकर, मंत्री, सा. बां. वि. म. रा., सोबत श्री नितीनभाऊंचे पत्र जोडले आहे. कृपया वाचावे! योग्य ती विल्हेवाट लावावी! कळावे. नानासाहेब.
* * *
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वनमंत्री म. रा., शतप्रतिशत प्रणाम! मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्डेमय अवस्थेबद्दल आपल्याला कल्पना असेलच. ही बाब आता आमच्या सा. बां. खात्याच्या अखत्यारीत येत नाही. एकंदरितच खड्डे हा विषय आम्ही आता सोडून दिला आहे. (जे काय व्हायचेय, ते हुईल!!) सोबत नितीनभाऊंचे (नानासाहेबांना आलेले) पत्र जोडत आहे. रस्ते बोंबलल्यामुळे मुंबई-गोवा विमानसेवा जट्रोफा इंधनावर चालवावी, असे ते म्हणतात. म्हंजे त्यासाठी जट्रोफाची लागवड करणे आले! ही बाब तुमच्या खात्याशी संबंधित असल्याने संबंधित नस्ती आपल्याकडे धाडतो आहे. कावळा काढावा!! (पक्षी : सही करावी)...नितीनभाऊंची समजूत तुम्हीच घालावी!! कळावे.
आपला चं. कोल्हापूरकर.
ता. क. : जट्रोफाच्या झाडालाच डिझेलचा पंप बसवता येतो का? चौकशी करावी.
* * *

प्रिय मा. ना. नितीनभू, शतप्रतिशत प्रणाम. आत्ताच सा. बां. वि. कडून जट्रोफा लागवडीसाठीची मागणी पुटप करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा वनमंत्री ह्या नात्याने मी तेरा कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे, हे आपल्याला माहीत असेलच. ही सर्व तेरा कोटी झाडे जट्रोफाची लावली, तर भारताचा इंधनाचा प्रश्‍न कायमचा सुटून आपल्या सर्वांनाच उजळ माथ्याने फिरता येणे शक्‍य होईल, असे वाटते. कृपया लाज वाटून घेऊ नये! खड्ड्यांची काय लाज वाटून घ्यायची? ते तर असणारच.
तथापि, तेरा कोटी झाडे लावण्यासाठी आम्ही रोपे तयार केली असून, जट्रोफाच्या रोपांसाठी त्यांची रिप्लेसमेंट करण्यासाठी वेळ लागणार आहे. तेरा कोटी जट्रोफाची रोपटी तयार झाली की कळवतो. लागलीच एखादा इव्हेंट करूया! गर्द जट्रोफाच्या रानात दडलेला डिझेल पंप माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला आहे!! कळावे.
आपला सुधीर्भाऊ.
ता. क. : हल्ली मी फारसा घराबाहेर पडत नाही. विशेष काही नाही, सावधगिरी एवढंच! असो. सु. मु.

Web Title: editorial dhing tang british nandi article