शिंके लावियले दुरी..! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० श्रावण शु. कृष्णाष्टमी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : शिंके लावियेले दुरी, होतो तिघांचे मी वरी, दोन हात सहा हाती, तेव्हा मुखी पडे माती!!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मराठी माणसाने आयुष्यात काहीही व्हावे; पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ नये. कुठून ह्या भानगडीत पडलो असे झाले आहे. बाकी सर्व सणासुदीला कसे शुचिर्भूत वाटत असते. गणपतीत बाप्पाची पूजाअर्चना करून (टीव्ही क्‍यामेऱ्यांसमोर) आरती वगैरे केली की झाले. एखादा सात्त्विक बाईट दिला की टीव्हीवाले खुश असतात. आषाढी एकादशी असो की दसरा-दिवाळी...बरे वाटते! दहीहंडीचा उत्सव मात्र अंगलट येतो, असा आमचा अनुभव आहे. अंग नुसते शेकून निघाले आहे!! दिवसभराच्या धकाधकीनंतर रात्री घरी आलो. अंथरुणाला पाठ टेकण्याआधी गरम पाण्याच्या बादलीत पाय बुडवून बसलो. डोक्‍याला टापशी बांधून गवती चहाच्या काड्या टाकून दोन कप गरमागरम चहा प्यालो, तेव्हा कुठे जिवात जीव आला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लाघवी, लाडक्‍या, लोकप्रिय (लालालो) मुख्यमंत्र्याला हे असे का झाले? असे लोक विचारताहेत. ह्याला कारण दहीहंडी, दहीहंडी, दहीहंडी!!

दहीहंडीच्या मराठमोळ्या उत्सवात आपणही मनापासून सहभागी व्हायला हवे. थेट रयतेला भेटण्याची हीच संधी असते. अशा ठिकाणी गेले तर लोकांनाही बरे वाटते. आमचे सहकारी आणि मित्रपक्षाचे पुढारी नाथभाई शिंदे ह्यांनी ‘आमच्या ठाण्यात भारी हंडी लागते, तुम्ही याच!’ असे आग्रहाने सांगितले. मी विश्‍वास ठेवायला नको होता. ठाण्यापर्यंत पोचणे इतके जिकिरीचे आहे की रस्त्यातील खड्ड्यागणिक आमचे मित्र मा. चंदुदादा कोल्हापूरकर ह्यांची कडकडून आठवण येत होती.
‘ढाक्‍कुमाकुम ढाक्‍कुमाकुम’च्या तालावर गोविंदांचे थवे नाचत होते. मलाही गाण्याबिण्याचे थोडेसे आहे. संयोजकांपैकी एकाने टीशर्ट आणून दिला. ‘‘सायज छोटी पडली? ए, टिब्बल एक्‍सेल आना रे!’ अशी हाकाटी झाली. ‘अहो, नको, नको!’ ही माझी विनवणी कुणाच्या कानावर गेलीच नाही. आणखी एका गोविंदाने येऊन ‘चला, उतरा मैदानात,’ असे आव्हान दिले आणि हादरलो! हंडी चिक्‍कार उंच लावलेली होती. ही माणसे इतक्‍या उंचीवर हंडी का लावतात? दहीहंडी ही नेहमी आवाक्‍यातली असावी, असे माझे आपले नेमस्त मत आहे.
‘‘हेल्मेट नसताना कसं काय येणार?’’ मी आपले कारण सांगितले.
‘‘खालच्या थराला कुटलं आलंय हेल्मेट? चला!’’ त्या गोविंदाने माझे बखोट धरले. दहीहंडीत मी तसाही फारसा रमलो नाही, कारण आम्हाला कायम खालच्या थरात ठेवले जायचे! पण जाऊ दे.
‘‘कुठल्याही थराला जाणारा माणूस मी नाही,’’ असे त्या गोविंदाला बाणेदारपणाने सांगून तात्पुरती सुटका करून घेतली; पण तेवढ्यावर कुठले भागायला?
ठाण्यातून शिताफीने सटकल्यानंतर भिवंडीत जावे लागले. तिथे मा. आ. कपिल पाटीलसाहेबांनीही हंडी टांगली होती. ठाणे-भिवंडी रस्त्यावरचे खड्डे तर चंद्राला लाजवतील, इतके लाजबाब आहेत. न राहवून मा. चंदुदादांना फोन लावला. ‘कुठे आहात?’ त्यांनी लागलीच विचारले.

‘‘भिवंडीला निघालो आहे...बाय रोड!’’ एवढे मी म्हटले नुसते, तर त्यांनी फोनच ठेवून दिला. त्यांना सवय असणार!! एकवेळ कुठल्याही थराला जाऊन हंड्या फोडून दाखवीन, पण ह्या खड्ड्यांचे काय करायचे? म्हणून म्हटले अंग शेकून निघाले आहे...
...पण पुढल्या वर्षीची इलेक्‍शनची हंडी फोडायची असेल तर आत्तापासून प्रॅक्‍टिसला लागणे भाग आहे! शिंके अजून दूर आहे..!! असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com