भिंताड! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

मोठमोठे थाळ वाजल्याचा ध्वनी चिनी सम्राटांच्या प्रासादात घुमला. सम्राट काय टाय मिंग उठले. पायघोळ झग्यातून बाहेर कसे यायचे, ह्याचा त्यांनी काही काळ विचार केला. उठल्याउठल्या चिनी सम्राटाला परंपरेनुसार शाही चहा प्यावा लागतो. सम्राट चहा पीत असताना प्रासादातले वादक टांग टुंग रागात काही धुन छेडतात. गंभीर चेहऱ्याने भांडीकुंडी वाजवणे म्हंजे संगीत म्हणायचे का? पण परंपरा म्हटली की हे आलेच. पारंपरिक चिनी पद्धतीने चहा पिणेही सम्राटांना बिलकुल आवडायचे नाही. एकतर उकिडवे किंवा पाय मोडून बसावे लागते. भातुकलीच्या कपबशीतून कोरा चहा प्यावा लागतो. उकिडवे बसून सक्‍काळी चहा पिण्याची डेरिंग कोण करेल? ज्याने कोणी ही परंपरा शोधून काढली त्याला पचनाचे भलभलते विकार असावेत, असे सम्राटांना वाटले. सम्राट टाय मिंग ह्यांना जांभई आली.
‘‘सम्राटांचा विजय असो..!’’ लगबगीने अंत:पुरात येऊन पांघरुणाच्या घड्या घालू लागलेल्या खासनीस मि लिंद ह्याने शुभेच्छा दिल्या. सम्राटांना रोज सकाळी ह्याचे मुखदर्शन सर्वांत आधी करावे लागते. किती वाईट!
‘‘आपल्या साम्राज्याच्या वेशीवर बांधण्यात येणाऱ्या अजस्र भिंतीचे वाढीव काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार जाम खातो ह्याने तेहेतीस कोटी युवान इतक्‍या रकमेची मागणी केली आहे. तो बाहेर दारात उभा आहे, सम्राट!’’ मि लिंद म्हणाला.
‘‘हाकलून दे!’’ अर्धवट झोपेत सम्राट बरळले.
‘‘त्याच्यामते ही दीडेक हजार किलोमीटरची भिंत पुरणार नाही, आणखी बांधावी लागेल!’’ मि लिंद म्हणाला.
‘‘बापाचा माल आहे का?’’ सम्राट संतापले.
‘‘चायनाची भिंत उभारली नाही तर भविष्यात जाम प्रॉब्लेम येईल, असं राजदरबाऱ्यांचंही म्हणणं आहे, सम्राट!’’ खासनीस मि लिंदाने विक्रमादित्यासारखा हट्ट सोडला नाही. काहीही करून सम्राटाची मूठ ढिली करायचीच, असा जणू त्याने चंग बांधला होता.
‘‘तुला काय तो कंत्राटदार कमिशन देतो काय रे?’’ सम्राटाने दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. पण मि लिंदची बोलती बंद झाली नाही.
‘‘राजज्योतिषांनीही भिंतयोग आहे, तोवर भिंत बांधून घेतली पाहिजे असा सल्ला दिला आहे. तेसुद्धा आत्ता दारात उभे आहेत...पाठवू?’’ मि लिंदाने शेवटचा उपाय केला. भविष्य म्हटले की चिनी लोक ढेपाळतात. सम्राटांनी साहजिकच ज्योतिषाला आत बोलवायला सांगितले.
‘‘बोला, लौकर ज्योतिषीबुवा! चहाचा पहिला घोट घेऊन ऱ्हायलो आहे...’’ सम्राट गुर्कावले.
‘‘महाराजांचा विजय असो! आत्तापर्यंत बांधलेली चीनची भिंत भरपूर लांबीची असली तरी पुरेशी नाही. आणखी थोडी बांधून मगच काम थांबवावे, अन्यथा आपले नाव भविष्यात राहणार नाही!’’ ज्योतिषी हेहुंग तेहुंग ह्यांनी कागदाची भेंडोळी काढत सांगितले. ह्या कागदाचा शोधदेखील ज्या कुण्या चिनी चांडाळाने लावला, त्याला त्याच कागदाची सुरनळी करून... सम्राट टाय मिंग ह्यांच्या मनात पुन्हा हिंस्र विचार डोकावले.
‘‘पुढे सांगा! घाई आहे...,’’ सम्राटांचा चहा संपत आला होता.
घसा खाकरून राजज्योतिषी म्हणाले, ‘‘चायनाची भिंत जगातले आश्‍चर्य ठरेल. ही भिंत अवकाशातूनही दिसेल. ती पुढे शेकडो वर्ष टिकेल, पण-’’
‘‘लौकर बोला होऽऽ..!’’ राजज्योतिषाचे भाकित ऐकताना सम्राटांना धीर धरवेना.
‘‘एकविसाव्या शतकात भारत देशात महाराष्ट्र नामक प्रांतात स्यू धीर मुन (गंटीवार) नावाचा एक देवदूत जन्माला येईल. तो तेथे तेरा कोटी झाडे लावील, आणि ‘वॉल ऑफ समृद्धी महामार्ग’ नावाची अजस्र भिंत उभारून चीनच्या भिंतीला टक्‍कर देईल...देईल...देईल...,’’ राजज्योतिषांची भविष्यवाणी महालात घुमली. इतके ऐकून सम्राट टाय मिंग टायमिंग साधत वेगाने पळाले.
...आणि समृद्धी महामार्गाच्या रेकॉर्डब्रेक भिंतीचा शुभारंभ जाहला. टांग टुंग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com