मानस इंधन! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

बेटा : (प्रवासी ब्याग खाली ठेवत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! स्ट्रेट फ्रॉम कैलासा!!
मम्मामॅडम : (प्रेमभराने) दमला असशील ना? शाब्बास!! आपल्या खानदानात कुणीही नाही केलं, ते तू करुन दाखवलंस!! शंभू महादेव तुला चांगलं यश देवो!! कशी झाली तुझी यात्रा?
बेटा : (अभिमानाने) मस्त! एवढा मी आयुष्यात चाललो नाही कधी! पण एक चैतन्य माझ्यात संचारलं होतं. एक तिबेटचे साधू भेटले होते, ते म्हणाले की ‘‘आपण कुणी तरी दिव्य पुरुष दिसता!! अध्यात्मात तुम्हाला चांगली गती आहे, असं दिसतं! कोण आपण?’’ मी डोळे मिटून फक्‍त हात दाखवला!!
मम्मामॅडम : (पार्टी सिंबॉलसारखा हात उचलून) असा?
बेटा : (डोळे मिटून) करेक्‍ट...अगदी अस्साच! त्यांनी चक्‍क नमस्कारच केला!!
मम्मामॅडम : (कौतुकानं) तुला काहीही जमतं हं! कम्मालच आहे तुझी!!
बेटा : (दुप्पट अभिमानाने) ते तिबेटी साधुपुरुष म्हणाले की ‘हे दिव्य साधका, आम्हाला दीक्षा द्याल का?’ मी त्यांना आपल्या पक्षाचं सभासद करून घेतलं!!
मम्मामॅडम : (खोट्या तक्रारीच्या सुरात) कश्‍शाला ते!!
बेटा : (दुर्लक्ष करत) कशाला म्हंजे? हम वो लोग हैं जो लोगोंसे प्यार करते है, दुश्‍मन के गले भी लगते है...प्रेमाने वागणाऱ्याला काहीही जिंकता येतं! ते साधू म्हणाले, की ह्या स्पीडने तुम्ही आकाशात उडूसुद्धा शकाल! रोज कैलासयात्राही शक्‍य आहे तुम्हाला!! तिबेटी साधूंपैकी काही लोक तसं करतात म्हणे!!
मम्मामॅडम : (दटावल्यागत) अज्जिबात असं करायचं नाही हं! एकदा झाली मनासारखी कैलासयात्रा, तितकी पुरेशी आहे!
बेटा : (पोक्‍त चेहरा करत) डोण्ट वरी मम्मा! आता आपल्याला कुठलीही चिंता नाही! सगळी संकटं टळली आहेत, असं समज! विरोधकांचा मी पुरता बंदोबस्त केला आहे!!
मम्मामॅडम : (कुतुहलानं) मानस सरोवर कसं आहे रे?
बेटा : (खांदे उडवत) बरं आहे तसं!! पाणी भलतंच गार होतं!
मम्मामॅडम : (सहजच) फोटोत तर अप्रतिम दिसतं!
बेटा : (उजळ चेहऱ्यानं) एक चांगली बातमी सांगू? मानस सरोवरात हंसबिंस काहीही नाही आणि कमळंसुद्धा नाहीत!! हे कमळवाले लोक उगीच काहीही थापा मारतात!!
मम्मामॅडम : (नाक मुरडत) थापाडेच तर आहेत मेले!! इंधन दरवाढीच्या विरोधात आपण आज दिवसभर इतका बंदबिंद केलाय, पण कुणी काही बोलतंय का बघ!
बेटा : (आध्यात्मिक चेहरा करत)...मानस सरोवर किसीसे कुछ लेता नहीं, सिर्फ देता है!! (ब्यागेतून एक बाटली काढत) हे घे!!
मम्मामॅडम : मिनरल वॉटरची बाटली घरी कशाला आणलीस?
बेटा : (खुलासा करत) मिनरल वॉटर नाहीए...मानस सरोवराचं पाणी आणलंय!! ते तिबेटी साधू म्हणाले की ह्या मानसजलाने काहीही होऊ शकतं! त्याने अध्यात्मशक्‍तीने त्या पाण्यावर चक्‍क दिवा पेटवून दाखवलान!!
मम्मामॅडम : (अविश्‍वासानं) छे, काहीतरीच!
बेटा : (दुर्लक्ष करत) मघाशी मी विमानतळावरून थेट राजघाटावर गेलो, तिथं आपल्या सगळ्या नेत्यांनाही एकेक छोटी बाटली भरून मानसवॉटर दिलं!! म्हटलं, मानसजलाचा एक घोट, मिळवेल हजार हजार व्होट!! बघा, कसे इंधनाचे दर धडाधडा खाली येतात ते!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावून) ओह गॉड...बहुतेक नेते घरी जाऊन देव्हाऱ्यात ठेवणार ती बाटली!!
बेटा : (विचारमग्न होत) हे मानसजल सर्व रोगांचा इलाज आहे मम्मा! आपलं सरकार आलं की मी मानसजल टॅंकरनं इथं आणायची सोय करणार आहे! हवं कशाला ते इंधनबिंधन?.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com