केकुची गोष्ट! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

एक होता केकु. मोठा लोभस होता. खोडकर असला तरी केकु सगळ्यांना आवडायचा. ‘केकुऽऽ’ अशी हाक मारली की चटकन कान टवकारून बघायचा. नक्‍की कुठे बघायचा हे जाम कळायचे नाही. केकु जसजसा मोठा होत गेला, तसतसा अधिकाधिकच केकु झाला!! परप्रांतीय किंवा उपरा कुणी आला की केकुने त्याचा डासा काढलाच म्हणून समजा. घरी आलेले अनेक आगांतुक फुल प्यांटीत येत आणि जाताना हाफ प्यांटीत जात! केकुच्या प्रतापामुळे घरात सर्वत्र चिंध्या पसरलेल्या असत.

केकु इमानी आहे. केकु महाराष्ट्राचा अभिमानी आहे. ‘सह्याद्री’ असा शब्द उच्चारताच केकुची छाती फुगते. (म्हंजे तसे म्हणायचे. कुणी पाहिलेय?) मागे एकदा एक परप्रांतीय (नाव सांगणार नाय..!) घरी आले आणि यथेच्छ जेवल्यानंतर त्यांनी ‘हैय्याऽऽब्रीऽऽ’ अशी लंबी ढेकर दिली. केकुला वाटले त्यांनी ‘सह्याऽऽद्रीऽऽ’ असे म्हटले. केकुने ताबडतोब शेपूट हलवायला सुरवात केली. कित्ती मज्जा ना?
केकुचा स्वभाव तापट आहे. संतापला की तो वाघासारख्या डरकाळ्या मारतो. अगदी डिट्टो डर्काळी!! इतकी डिट्टो की लोकांना केकु हा वाघाचा बछडाच वाटे. लोकांना कशाला? खुद्द केकुला बरेच दिवस आपण वाघच आहोत असे वाटायचे. पण एकदा केकु त्याच्या साहेबांबरोबर वाघाच्या अभयारण्यात गेला. तिथे त्याने खराखुरा वाघ पाहिला. तेव्हा त्याला कळले की आपले साहेब हेच खरे वाघ असून आपण साधेसिंपल केकु आहोत!! केकुचे साहेब शूर आहेत. ते वाघाला पण डरत नाहीत. सरळ वाघासमोर उभे राहून फोटोबिटो काढतात. मागे एकदा त्यांनी वाघाबरोबर सेल्फी घेताना वाघाच्या मानेत हात टाकला होता. तो फोटो खूप गाजला. केकुसुद्धा एरवी केकु असला तरी वाघासारखा फिरतो. तो का वाघापेक्षा कमी आहे? केकुला केकु हे नाव कसे पडले असेल? ती एक गंमतच आहे. त्याला कारण केकुच. केकुच्या अंगावर भयंकर केस आहेत. केकु म्हणजे केसाळ कुत्रा. तो कुठून बोलतोय हेच कळत नाही. लहानपणीच त्याचे डोळे उघडले होते, पण कुणाच्या लक्षातच आले नाही. मागल्या खेपेला एकदा एक दादरचे साहेब आले होते. ते म्हणाले, ‘‘ह्याचे तोंडबिंड काही दिसतच नाही...त्याला कुठून बघायचे ते तरी दिसते का?’’ सगळे खदाखदा हसले. मग त्यांनी केकुला बघून ‘यू यू यू यू’ असे केले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. पण ती पाठ नव्हतीच!! हाहा!! केकुचे तोंड होते. केकु त्यांना चावला!! केकुचे तोंड कुठे आणि बिंड कुठे कुण्णाला क्‍काही कळत नाही!! एवढे केस अंगावर घेऊन तो सदोदित हिंडत असतो. दादरचे साहेब म्हंजे केकुच्या साहेबांचे भाऊ! त्या प्रसंगानंतर दादरचे साहेब केकुला बघून ‘यूयू’ करण्याऐवजी ‘हडी हडी’ असे करतात. केकुच्या मनाला खूप दु:ख होते. पण काय करणार? इतक्‍या केसेस अंगावर असूनही केकु स्वभावाने मवाळच आहे. सज्जनाला तो अंगभर इतके चाटून काढतो की त्याला आंघोळीची गरजच पडू नये. (किंवा ताबडतोब करावीशी वाटावी!!) केकुला आंघोळीला तीन बाटल्या शांपू लागतो. एक बरे आहे की केकुला आंघोळीची फारशी आवड नाही. दुर्जनाला तो न चुकता चावतोच. तो नेमका कुठल्या बाजूने चावा घेईल, हे कुणालाही सांगता येत नसल्याने केकुचे फावते.

केकुचे साहेब म्हणतात की केवळ महाराष्ट्रासाठी इतक्‍या केसेस अंगावर घेणाऱ्या केकुला बहाद्दर म्हणायचे नाही तर काय? तेव्हा केकुपासून सावधान रहा!! आम्हाला केकु खूप खूप आवडतो.
तुम्हाला?... भू:!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com