खंड्याशेठ, बारियाशेठ आणि वकीलसाहेब! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

‘दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां... पुन्हा नाही गाठ’ हेच खरे आहे. कोण कोणाला कधी आणि कुठे भेटेल, काय सांगावे? आता कुणी नतद्रष्ट असे विचारील ओंडक्‍यांनी एकमेकांना फारतर वखारीत एकमेकांना भेटावे... सागरात जाऊन पडण्याचे कारण काय? पण ते कां ओंडक्‍यांच्या मनात असते? ओंडके ओंडके असतात. ठरवून भेटायला ते का दादा कोंडके  आहेत? (हे आपले उगीच हं!) ओंडक्‍यांची सागरातील भेट ही एक दुर्मिळ घटना असते. सागरात मासेसुद्धा एकमेकांना नीट भेटत नाहीत. ओंडके कशाला भेटतील? पण दुर्मिळ घटनेत असे होते.

‘दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां... पुन्हा नाही गाठ’ हेच खरे आहे. कोण कोणाला कधी आणि कुठे भेटेल, काय सांगावे? आता कुणी नतद्रष्ट असे विचारील ओंडक्‍यांनी एकमेकांना फारतर वखारीत एकमेकांना भेटावे... सागरात जाऊन पडण्याचे कारण काय? पण ते कां ओंडक्‍यांच्या मनात असते? ओंडके ओंडके असतात. ठरवून भेटायला ते का दादा कोंडके  आहेत? (हे आपले उगीच हं!) ओंडक्‍यांची सागरातील भेट ही एक दुर्मिळ घटना असते. सागरात मासेसुद्धा एकमेकांना नीट भेटत नाहीत. ओंडके कशाला भेटतील? पण दुर्मिळ घटनेत असे होते.

अशाच दोन ओंडक्‍यांच्या भेटीबद्दल काही खुलासे करण्यासाठी आम्ही येथे बसलो आहो! आमचे परंप्रिय सायंकालीन मित्र खंड्याशेठ आणि दिल्लीचे सुप्रसिद्ध वकीलसाहेब ह्यांची भेट होण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते. वकीलसाहेब भयंकर वक्‍तशीर गृहस्थ. सकाळी उठावे. कार्ले-कोर्फड, दुधी-तुळसादी वनस्पतीजन्य रसांचे सेवन करावे. पावलें मोजून मॉर्निंग वॉक घ्यावा... दिवस कसा घड्याळाचे काट्यांवर काढावा. खंड्याशेठचे तत्वचि वेगळे. सकाळी उठावे... बारा ललनांच्या हस्ते चहागिहा घ्यावा. उद्याचा दिवस उगवणारच नाही, अशा आवेगात आजचा दिवस काढावा!!
वकीलसाहेब काही संध्याकाळच्या बैठकीतले नाहीत. खंड्याशेठ सकाळच्या बैठकीतले नाहीत!! तसे पाहूं गेल्यास आम्ही खंड्याशेठच्या मठात नियमित जाणारे. वकीलसाहेबांच्या मठीत वेळवखत पाहूनच जातो. असो.

कर्मधर्मसंयोगाने खंड्याशेठला अचानक देश सोडून जावे लागले. शा. बारियाकडून घेतलेली भांडवली रक्‍कम वेळच्या वेळी परत न केल्याने बारियाशेठने त्यांच्या मागावर पठाण सोडले. वर वकीलसाहेबांना गळ घातली की खंड्याशेठने पैका परत न केल्यास बारियाशेठचा बोरिया वाजेल!! वकीलसाहेबांनी खंड्याशेठला निक्षून सांगितले, की ‘नियम म्हंजे नियम... बारा तारखेला दुपारी बारा वाजता बारियाशेठचे बारा रुपये बारा आणे परत केले पाहिजेत म्हंजे पाहिजेतच!! नथ्थिंग डुइंग!!’ खंड्याशेठचे जगणे मुश्‍किल झाले. वकीलसाहेबांनी त्यांस भेटण्यासही मनाई केली. अत:पर त्यांनी देश सोडला.

तथापि, देश सोडण्यापूर्वी आपण वकीलसाहेबांना भेटून बारियाशेठची रक्‍कम परत करण्याबद्दल नवा शब्द दिला होता, असे खंड्याशेठने जाहीर केल्याने वकीलसाहेबांची पांचावर धारण बसली.
आँ? हा इसम आपणांस कधी भेटला? कुठे भेटला? कसा भेटला?
अखेर त्यांना आठवले ते असे...
बारियाशेठला बाहेर थोपवून वकीलसाहेब एक दिवस कानांत काडी घालून बसलेले असताना खंड्याशेठने त्यांना खिडकीतून ‘शुक शुक’ असे केले. ती ऐकून वकीलसाहेबांनी दुसऱ्या कानात काडी घातलीन!! खंड्याशेठने एका चिठोऱ्यावर ‘भेटा’ असे लिहून वकीलसाहेबांकडे टाकले. त्या चिठोऱ्याची पुंगळी करून वकीलसाहेबांनी तिसऱ्या कानात घातली. (खुलासा : वकीलसाहेबांना तीन कान कसे? असा प्रश्‍न कुणास पडेल! पण आहेत!!) बराच काळ अशी टाळाटाळ झाल्यानंतर वकीलसाहेबांना जागेवरून उठण्याची निकड निर्माण झाली. अवघडलेल्या अवस्थेत ते खुर्चीतून उठले व स्वच्छतागृहाकडे निघाले...

चालताना कधी कधी वेळ लागतो. पावलें जड पडतात. पोटांस तडस लागते. त्यात स्वच्छतागृह अंमळ दूर असले तर अधिक चालावे लागते. मजल दरमजल करीत वकीलसाहेब त्यांच्या मोहिमेवर निघालेले असताना खंड्याशेठने धावत पळत येऊन वकीलसाहेबांना गाठले.
‘‘वकीलसाहेब, बारियाशेठला आवरा... मी लग्गीच वापस करतो पैसे!’’ खंड्याशेठ म्हणाला.
त्यावर वकीलसाहेब काय म्हणाले? असे तुम्ही विचाराल. काहीही म्हणाले नाहीत. त्यांनी फक्‍त किरंगळी वर केलीन!! कडी लावण्याचा आवाज आला, तो शेवटचा... बारियाशेठ बाहेर ओरडत बसलाय, खंड्याशेठ पळून गेलाय आणि वकीलसाहेब अजून आहेत तिथेच आहेत!!
...दोन ओंडक्‍यांच्या भेटीत आणखी काय होणार? हॅ:!!

Web Title: editorial dhing tang british nandi article