वित्त आयोगाचे पित्त! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

सुधीर्जी मुनगंटीवार्जी,
वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल.

सुधीर्जी मुनगंटीवार्जी,
वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल.

महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया कळवावे. दरवेळी क्‍याबिनेट मीटिंगला ‘थोडी अडचण होती, पुढल्या महिन्यात परत करतो’ असे तुम्ही पुटपुटत होता. मी दरवेळी खिसे चाचपून ‘छे हो, तारीख किती आज?’ असे म्हणून तुम्हाला टाळत असे. माझा गैरसमज झाला! तुम्ही राज्याच्या तिजोरीची स्थिती म्हणून तर सांगत नव्हता ना? परवा वित्त आयोगाच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक आघाडीचे बारा वाजल्याचे नोंदले गेल्याची बातमी आली आणि तुम्ही राज्याचीच अडचण सांगत होता, हे कळले!! सॉरी!! टीव्हीवाल्यांमुळे माझा गैरसमज झाला. हल्ली टीव्हीवाले आपल्याविरुद्ध वाट्टेल ते दाखवतात. म्हणून मी दुर्लक्ष केले; परंतु आज घरातूनच आहेर मिळाला. ‘मेथीची जुडी कितीला पडते आहे, कल्पना आहे का?’ असे सुनावण्यात आले. हे काय चालले आहे? वर्षभरात आपण निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांना काय सांगायचे? काळ मोठा कठीण आलेला दिसतोय.
तातडीने राज्याच्या तिजोरीचा हिशेब तपासून कळवावे. इति.
आपला. नाना फडणवीस (कारभारी).
ता. क. :  ‘‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’’ ह्या आपणच गेल्या खेपेला विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर काय द्यायचे, तेही सांगून ठेवा!! नाना.
* * *
ना. नानासाहेब, शतप्रतिशत प्रणाम.
 आपण खामखा हैराण झालेला दिसता. राज्याच्या आर्थिक आघाडीचे बारा वाजल्याची बातमी सपशेल खोटी असून, ती केवळ अफवाच मानावी. वित्त आयोगाने काहीही अहवाल दिला असला तरी त्याकडे किंचितही लक्ष न देता महाराष्ट्र राज्य प्रगतिपथावर घोडदौड करत असून, येत्या पाच वर्षांत सारे काही आलबेल असेल, ह्याबद्दल खातरी बाळगावी. वित्त आयोगाच्या सदस्यांना पित्त झाल्यामुळे त्यांनी हा अहवाल दिला आहे, असे माझे मत्त आहे. असो!

उलटपक्षी गेल्या साडेचार वर्षांत आपल्या समर्थ नेतृत्त्वाखाली राज्याने प्रगतीचे नवेनवे टप्पे गाठले असून, आर्थिकदृष्ट्या मराठी माणूस संपन्न होत चालला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतवाढीमुळे पब्लिक प्रचंड संतापले असून, आपल्या नेत्यांना फिरणे मुश्‍किल होईल, अशी स्थिती आली आहे. परंतु, पेट्रोल-डिझेल तेच घेतात, ज्यांच्याकडे गाड्या आहेत!! हो की नाही? ह्याचा अर्थ एवढाच की महाराष्ट्रात सर्वाधिक गाडीवाले आहेत, हे उघड आहे. मग गरिबी वाढली असे वित्त आयोग कसे काय म्हणू शकतो? गेल्या वर्षी हायवेलगतचे बार बंद केल्यानंतर केवढा रोष निर्माण झाला होता ते आठवा! ते कशाचे लक्षण? अर्थात संपन्नतेचे!! सध्या रस्त्यांवरचे खड्डे बघून लोक संतापून सेल्फीवर सेल्फी टाकून निषेध करताना दिसतात. रस्त्यावरून वाहनेच जातात ना? मग हे कशाचे लक्षण? मराठी माणसाला हल्ली चालायला आवडत नाही, हे त्याचे खरे कारण आहे!! दर क्‍याबिनेटला मी ‘अडचण’ माझीच सांगत होतो, राज्याची नव्हे!! असो!! औंदा तेरा कोटी झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. तेरा कोटी ही साधी का संख्या आहे? त्यातले एखादे झाड जरी पैशाचे निघाले तरी आपले सगळे आर्थिक प्रश्‍न सुटतील! तेव्हा झाडे वाढेपर्यंत थोडा धीर धरा. कळावे.
 सदैव आपलाच. सुधीर्जी.

ता. क. : प्रश्‍न : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? उत्तर : ‘‘आँ? ऐकू येत नाही... मोठ्यांदा बोला!!’’ हाहाहा!! काही कळले?

Web Title: editorial dhing tang british nandi article