निरोप! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

माध्यान्हीच्या सुमाराला
अखेरची आरती झाल्यावर
मांडवातून (एकदाची) हललेली
मूर्ती गल्लीच्या तोंडाशीच
थांबली प्रहरभर, कारण
श्रींच्या निरोपाला येणाऱ्या
मंत्रिमहोदयांना झाला (थोडासाच)
उशीर भयंकर महत्त्वाच्या कामामुळे.

‘‘पुढच्या वर्षी लौकर या!.’’
असे बाप्पाआधी मंत्रिमहोदयांना
सांगायला हवे, अशी खूणगाठ
बांधत मंडळप्रमुखाने शेवटी
गळ्यातील झांजा आपटत
कार्यकर्त्यांना खुणावले - ‘‘निघा रे!’’

सत्तर ढोल, तीस ताशे,
शेकडो झांजा-लेझिमाच्या
देशी दणदणाटात अखेर
बाप्पाची महाकाय मूर्त
निघाली मुंगीपावलाने
जलाशयाच्या दिशेने.

गणपतीबाप्पा मोरयाऽऽ...
पुढच्या वर्षी लौकर याऽऽऽ...

अबीर-गुलाल उधळत,
गेंदफुलांच्या पाकळ्यांमध्ये न्हात
मिरवणूक निघाली तेव्हा,
अस्मान दणाणून गेले
ढोल-ताशाच्या गजरात
श्रींच्या जयजयकारात,
वितळून गेला आसमंत.
आसपासच्या चाळी, इमारती,
इस्पितळे, देवळे आणि दुकानांसकट.
अवघे विश्‍व झाले मोरयाकार...
बॅंडवाल्यांच्या छातीफोड
सुरावटींवर भक्‍त झाले सैराट.
पिसाटासारखे मेंदूत घुसले
बेभानाचे आवर्त, आणि
विवेक झाला फिका फिका...
दरवर्षी असेच होते, म्हणूनच तर
दरवर्षी असायला हवा
मिरवणुकीचा आवाजदार इव्हेंट.
ट्रकाधिष्ठित मंडळप्रमुखांच्या
कृतकृत्य मनात राहून राहून
येत आहे ते असे की-
श्रींच्या आवाजदार मिरवणुकीवर
व्हावी टनभराची पुष्पवृष्टी
हेलिकॉप्टरी पुष्पक विमानातून.
त्यातील काही फुले पडावीत,
आपल्याही अंगाखांद्यावर.
झळकावी तासंतास आपलीही
सगुणसाकार मूर्त टीव्हीच्या पडद्यावर.
गर्दीने करावा आपलाही जयकार...

त्यांच्या मनात आले की-
ट्रकभर ध्वनिक्षेपकांच्या गोंगाटयंत्राना
असती जर कायदेशीर परवानगी
तर काम सोपे झाले असते...

कारण, त्यांना हवाच आहे
यंदा बाप्पाचा आशीर्वाद,
आणि...जमल्यास
पुढल्या वर्षीच्या निवडणुकीचे तिकीट!

ते स्वत:शीच अस्वस्थपणे पुटपुटले,
‘‘अरे, लोकशाही नावाची गोष्ट
ह्या देशात आहे की नाही?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com