कावळे! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

तारेवर हेलकावे खात काही कावळे बसले होते. राजकीय सभा असणार, हे उघड होते.
‘‘आपण नेमके किती जण आहोत?’’ लकलकत्या डोळ्यांच्या कावळ्याने पहिला सवाल केला. वास्तविक त्याने एका डोळ्याने सगळी मोजदाद आधीच केली होती, पण उगीच खडा टाकून पाहिला इतकेच!
‘‘तेरा...तेरा आहोत!,’’ एक अनुभवी कावळा कावून म्हणाला, ‘‘कमी असल्यास दुसऱ्या पक्षात गेले असतील, जास्तीचे नव्याने जॉइन झालेले असतील!’’ त्या कावळ्याच्या काव्यात बिरबलाचे चातुर्य होते.
‘‘पक्ष म्हणजे आपला लाडका भाद्रपद कृष्णपक्ष ना?’’ एका आगाऊ कावळ्याने काळाकुट्ट विनोद केला. ब्लॅक ह्यूमरसाठी तो म्हणे काकसाहित्यात प्रसिद्ध होता.
‘‘पितृपक्षात अशी सभा ठेवणं हेच मुळात चूक आहे...ह्या काळात किती घरगुती कामं असतात आम्हाला,’’ एका कावळ्याने नाराजीचा सूर लावला. हेही खरेच होते. एक महिन्याची सुगी, मग वर्षभर उगी...अशी कावळेसंप्रदायाची स्थिती!
‘‘हेच...हेच तुमचं आजवर चुकलं. पक्ष म्हटलं की तुम्हाला लेको पिंडच आठवणार!!,’’ लकलकत्या डोळ्याच्या कावळ्याने सात्त्विक संतापाने आवाज चढवला.  ‘‘निवडणुका तोंडावर आल्या की मग तुम्हाला बांधिलकी सुचते का?’ असा हेत्वारोप एका परान्नपुष्ट कावळ्याने समस्तांवर केला. एकच कावकाव झाली. एक-दोघांनी सपासप चोची उगारल्या.
‘‘काकशाही आघाडी होऊच नये, म्हणून ही सत्ताधारी बगळ्यांनी रचलेली कारस्थानं आहेत, हे समजतंय आम्हाला! पण आम्ही असे डरणार नाही...सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार आम्ही काकरयतेसमोर मांडूच! नेशन वाँट्‌स टु नो...’’ एक कावळा तारस्वरात ओरडला. पुन्हा कावकाव झाली.
‘हलो, हलोऽऽ...शांत व्हा! हे काही टीव्हीवरचं प्यानल डिस्कशन नाही!’ असे नळावर भांडल्यासारखे काय भांडता? विचाराचा विरोध विचारांनी करावा! आरडाओरडा करून टीआरपी मिळतो, हे गृहीतक आता जुनं झालं...काय?,’’ एक शहाणा कावळा म्हणाला. हे म्हणताना त्याने डोळा मारला नसता, तर बरे झाले असते, असे त्याच्या शेजारी बसलेल्या डोमकावळ्याला वाटले.
‘‘आपल्यात एकीच झाली नाही तर मग कशाला अर्थ उरणार नाही! आपण असे वागतो म्हणूनच आपली घरं शेणाची झाली...,’’ एक समजूतदार कावळा म्हणाला.
‘‘क्‍या बात कही, जनाब! वाहव्वा!!,’’ एक कावळा म्हणाला. त्याला दाढीबिढी नव्हती, पण एका मशिदीसमोर त्याचे काड्यामोड्यांचे घरटे होते, तेवढ्या क्‍वालिफिकेशनच्या जोरावर तो कायम उर्दूमिश्रित कावकाव करत असे. तो म्हणाला, ‘‘हम लोग हैही ऐसे! म्हणून तर ती कोयलची बिलंदर औलाद आमच्या गरीबखान्यात अंडी घालून पळून जाते. आम्ही आमची पोरं म्हणून वाढवायची, वेळ आली की ह्यांच्या नरड्यातून बराब्बर ‘कुहू कुहू’ आवाज येतो. हमारी दिलजमाई हुई तो माशाल्ला, ह्यांची पितरं कुठं जातील, जरा सोचो!’’
‘‘मी म्हंटो की प्रत्येकाला एक पिंड गिळायला मिळणार असेल, तर आघाडी करण्यात अर्थ आहे...एकाच पिंडावर सगळ्यांनी तुटून पडण्यात काय हशील?,’’ आंबट चेहऱ्याच्या कावळ्याने मुळावर घाव घातला.
‘‘पिंडे पिंडे मतिर्भिन:..दुसरं काय!,’’ नुकतेच एक श्राद्ध आटोपून परतलेल्या बुजुर्ग कावळ्याने आपले पांडित्य प्रतिपादिले.
प्रचंड कावकाव सुरू होऊन कोणाचा सूर जुळेना, असे झाल्यावर अखेर एका तरुण कावळ्याने घोषणा केली, की काकशाही आघाडीचा विजय झाला तर हरेक कावळ्याला स्वतंत्र पिंड मिळेल, पण सर्वांत मोठा पिंड मलाच हवा!!’’
एकच हलकल्लोळ उडून सारे कावळे कोकलू लागले. गोंधळातच सभा संपली.
‘‘आचारसंहितेपेक्षा आहारसंहिता महत्त्वाची असते,’’ असे नंतर एक बुजुर्ग कावळा दुसऱ्या कावळ्याला उडता उडता सांगत होता. त्याच्या बोलण्यात एक वैराग्य होते.
वि. सू : ह्या गोष्टीचा वर्तमान राजकारणाशी संबंध वाटला तर तो सर्वपित्री योगायोग मानावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com