वाघाच्या मागावर...! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

ना. सुमुसाहेब, वनमंत्री, महाराष्ट्र
अत्यंत नाजूक समस्येबाबत हे गोपनीय पत्र पाठवत आहे. वाचून झाल्यावर फाडून टाकावे. सदर बाब तुमच्या वनखात्याच्या अखत्यारीत येते, म्हणून लिहीत आहे. आपल्याला हे बहुधा माहीत असेलच, की यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड्याच्या नरभक्षक वाघिणीने (नाव : टी-१) आजवर अनेक बळी घेतले असून अद्यापही ती मोकाट हिंडते आहे. आणखी किती बळी घेतल्यावर सरकार जागे होणार? असे तिखट सवाल केले जात आहेत. परिस्थिती गंभीर आहे. तिच्या अस्तित्त्वामुळे यवतमाळच्या ह्या भागात भीतीचे वातावरण असून मानवी वस्त्यांमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. तिच्या अस्तित्त्वाचा स्वच्छता अभियानास जरी फायदा होत असला आणि ‘दरवाजा बंद आंदोलना’ला अचानक बळ मिळाले असले तरी हा काही उपाय नव्हे, हे आपण समजू शकाल!!
सदर नरभक्षक वाघिणीला जिवे मारण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असूनही त्या आघाडीवरही अजून म्हणावी तशी हालचाल नाही. वनखाते झोपले आहे काय? माझ्याकडे ह्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या असून ‘आता तुम्ही स्वत: येऊन वाघीण टिपावी’, अशी निर्वाणीची सूचना आल्यानंतर तातडीने हे पत्र तुम्हाला पाठवत आहे. तेव्हा त्वरित आणि कडक उपाययोजना करावी व अहवाल पाठवावा.
आपला.
 फडणवीसनाना. मा. मु. म. रा.
* * *
आदरणीय ना. नानासाहेब,

 सुरवातीलाच सांगतो की काळजीचे काहीही कारण नाही. टी-१ वाघिणीच्या बंदोबस्तासाठी खास हैदराबादेहून नवाब अली नामक नामचीन शिकाऱ्यांस बोलावून आणण्यात आले असून दररोज उघड्या जीपमधून फिरून ते नरभक्षक वाघिणीचा माग घेत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या मालकीचे दोन इटालियन बनावटीचे शिकारी कुत्रेही खास मोटारीने आणण्यात आले आहेत. केन कोर्सो जातीचे हे शिकारी कुत्रे एरवी रानडुकराला सहजी लोळवतात. वाघालाही डरत नाहीत. सर्व तयारी पूर्ण झाली असून, सदर माणसेखाऊ वाघीण टप्प्यात आली की विषय संपलाच म्हणून समजा! पुढील मजकूर यथावकाश कळवीनच.
 आपला आज्ञाधारक. सु. मु. (ऊर्फ चंद्रपूरचा वाघ!), वनमंत्री, म. रा.
* * *
प्रिय सुमुराव, असे कितीक शिकारी आले आणि गेले! टी-१ वाघीण सगळ्यांना पुरून उरली आहे. इतक्‍या गोळ्या खाऊन अद्याप जिवंत आहे. आपण एवढ्या औषधाच्या गोळ्याही खाऊ शकत नाही!! इटालियन कुत्रे सह्याद्रीच्या वाघाला तोंड देणे कठीण आहे, असे वाटते!! कारण इटलीत वाघ आहेच कुठे? सैबेरियन वाघ, इंडोनेशियन वाघाबद्दल ऐकले आहे, इटालियन वाघ बहुधा नामशेष झालेली प्रजात असावी!! असो.
गेले काही महिने ह्या प्रकरणी कोर्टकज्जे चालू आहेत. शिकारीच्या मोहिमाही निघाल्या आणि थंडावल्या. तरीही टी-१ वाघीण अजून आहे तिथेच आहे! हे लक्षण ठीक नाही. वाघाच्या मागावर निघालेल्या शिकाऱ्याने येत्या काही दिवसांत वाघीण लोळवली नाही तर काय करायचे? हा खरा सवाल आहे. तसे झाल्यास निर्वाणीचा उपाय म्हणून मला आपले परममित्र उधोजीसाहेब बांद्रेकर ह्यांना गळ घालावी लागेल. एका गोळीत वाघ लोळवणारा माझ्या माहितीतला एकमेव शिकारी म्हणजे उधोजीसाहेब! त्यांना सांगितले की काम फत्ते होणार, ह्यात शंका नाही. अर्थात त्यांना ह्या कामगिरीबद्दल आधीच सांगू नये. ऐनवेळी गळ्यात मारू! फोटो काढायला म्हणून पाठवले की येताना वाघ पाठीवर घालून आणतील!! बघाच तुम्ही!!
कळावे.
 आपला. नाना.
ता. क. :
मला तर ‘टी-१‘ हे आपल्या राजकारणाचे प्रतीक वाटते. आपण दोघे सापळ्यात अडकलो असून वाघ मात्र बाहेर आहे आणि मा. उधोजीसाहेब फोटो काढताहेत...अरेरे!! जाऊ दे. नाना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com