नापास आमदाराची कैफियत! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

मा. ना. नानासाहेब फडणवीस
यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘धार्ष्ट्य’, ‘प्रातिनिधिक’, ‘शब्दबद्ध’ असे बोजड शब्द मी हेतुपुरस्सर वापरले आहेत. मी ‘आयात’ झालेला नवाकोरा पक्षकार्यकर्ता नाही, सतरंज्या उचलत, बौद्धिके ऐकत मोठा झालेला सेवक आहे, हे आपल्या लक्षात यावे. गेली चारेक वर्षे सत्ताधारी पक्षाची आमदारकी भोगण्याची संधी मला माझ्या पक्षाने दिली. पण ‘आहे मनोहर तरी, गमते उदास’ अशी अवस्था झाली आहे. त्याचे असे झाले की-
 दादर येथे परवा पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत आम्हा सर्व (उपस्थित) आमदारांना तपकिरी रंगाचे सीलबंद पाकीट देण्यात आले व ‘घरी जाऊन उघडा’ असे सांगण्यात आले. हल्ली पाकिटे दिसली की गोरेमोरे व्हायला होते.
‘‘काय आसंल ह्याच्यात?,’’ शेजारी बसलेल्या आमदाराने विचारले.
‘‘जाण्यायेण्याचा खर्च असावा! हल्ली पेट्रोल केवढं महागलंय!,’’ आणखी एका आमदाराने सकारात्मक उत्तर दिले. आपला पक्ष कार्यकर्त्यांची किती काळजी घेतो, ह्या विचाराने गदगदून आले. नाहीतर ते काँग्रेसवाले! येतील तर आल्या आल्या हात पुढे करून पेट्रोलचा खर्च, चहाभजी, जेवण, ड्रायव्हरचा भत्ता सगळे मागून घेतील!! आपला पक्ष स्वत:हून देतो...
पक्षाची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यावर घरी जाऊन पाकीट उघडले. पाहतो तो काय! आतमध्ये आमचे लाल रेघांकित रिपोर्ट कार्ड! लहानपणी शाळेतले प्रगती पुस्तक घरी नेल्यावर त्यातील लाल शाई आमच्या गालांवर ट्रान्स्फर होईल, ह्याची दक्षता आमचे तीर्थरूप घेत असत. एकदा तर पास झालो तरी केवळ सवयीने आम्हाला तीर्थरूपांनी बडवले होते, असे स्मरते. पण ते असो.
गेल्या चारेक वर्षातील आमचे आमदार म्हणून असलेले काम अजिबात समाधानकारक नाही, हे पक्षाचे मत वाचून विषण्ण वाटले. वस्तुस्थिती अशी आहे की आमदार म्हणून जनतेचे काही काम करायचे असते, हेच मुळात आमच्या गावी नव्हते! कारण आम्ही निवडणूक स्वत:च्या जोरावर कुठे जिंकलो होतो? ते सारे श्रेय तर आपले थोर नेते श्रीमद नमोजीसाहेब ह्यांनाच आहे! ते होते, म्हणून तर आमदारकीची माळ आमच्या गळ्यात पडली. त्यांच्यामुळेच हा आमदारकीचा प्रसाद मिळाला, ही कृतज्ञतेची भावना मनीं बाळगून आम्ही चारेक वर्षे शांतपणे काढली. जनतेची सारी कामे प्रधानसेवकच करणार असल्याने आपण त्यात ढवळाढवळ का करायची, असाही सुज्ञ विचार आमच्या निष्क्रियतेमागे होता, हे कृपया ध्यानी घ्यावे. पेपर सोडवणारा निराळाच होता, आम्ही मात्र अपयशाचे धनी झालो...
कधी चुक्‍कूनही पक्षाची बैठक चुकवली नाही. रस्त्यात गाय दिसली तर गाडी थांबवून तिचे शेपूट डोळ्यांना लावण्याचा प्रघातही कधी मोडला नाही. पक्षबैठकीला मुंबईत येत असताना रस्त्यात अशीच एक गाय दिसली. गाडीतून उतरून तत्काळ तिचे शेपूट उचलले असता अनर्थ झाला. नजरचुकीने ती गाय नसून रस्त्यात उभा असलेला मोकाट सांड आहे, हे कळेपर्यंत उशीर झाला होता...तरीही आम्ही लंगडत लंगडत पक्षबैठकीसाठी उपस्थित राहिलो...
इतक्‍या शिस्तीत वागूनही आमची नापास विद्यार्थ्यांमध्ये गणना व्हावी, ह्याचे प्राणांतिक दु:ख होत आहे. ज्या परीक्षेला आम्ही बसलोच नाही, त्यात आम्ही नापास कसे? आम्ही नेमके काय करायला हवे होते? कृपया आमच्या निकालाची फेरतपासणी व्हावी ह्या विनंतीसह...
आपला आज्ञाधारक.
 एक नापास आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com