तळीरामाचे स्वप्न! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन शुद्ध सप्तमी.
आजचा वार : ट्यूसडेवार.
आजचा रंग : ये लाल रंग कब मुझे छोडेगाऽऽ..!
आजचा सुविचार : साकी की क्‍या जरुरत, क्‍या मानी है मयकदे के,
                      मेरे दर पे आज मेरी सरकार आ रही है...
.........
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सुविचाराच्या रकान्यात लिहिलेला शेर आम्हालाच सुचला आहे, पण तो आम्ही (वेळवखत पाहून) आमचे अर्थमंत्री सुधीर्जी मुनगंटीवार्जी ह्यांच्याकडे सोपवू. बजेट वगैरे मांडताना त्यांना उपयोगी येईल. एकंदरित शेर बरा जमला आहे...
साकी की क्‍या जरुरत, क्‍या मानी है मयकदे के,
दर पे आज मेरी सरकार आ रही है...
ऐ कंबख्त (हे आपले उगाच!) मद्याचे वाटप करणाऱ्या सुंदरीची आता गरज कुणाला आहे? मद्यशाळेलाही आता काय अर्थ उरला? सुरई घेऊन आमचे सरकारच माझ्या घराच्या दारी आले आहे...अहाहा!! क्‍या बात, क्‍या बात, क्‍या बाऽऽत!
...त्याचे झाले असे की सरकार आता मद्याची होम डिलिव्हरी करणार, ही बातमी (कशी कोण जाणे) बाहेर फुटली. आमचे मंत्री बावनकुळेसाहेबांनी ‘घरपोच मद्यपुरवठ्याचे सरकारी धोरण’ अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितल्यावर माध्यमांच्या जगात एकच खळबळ उडणे साहजिकच होते. त्यावर आमचे वांदऱ्याचे परममित्र भडकले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आमचा ‘चखणा’ केला!! वास्तविक असे कुठलेही धोरण नाही, हे मी लागलीच जाहीर केले होते. घरपोच मद्यवितरणाची योजना कार्यान्वित करण्याचा सरकारचा अजिबात विचार नाही. तथापि, ‘घरोघरी तळीराम’ ह्या नावाने अशी योजना प्रत्यक्षात आणण्याची काही लोकांची शिफारस होती, हे मान्य करावे लागेल. विद्यार्थ्यांपासून वृृद्धांपर्यंत सर्वांना मद्य सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावे, तसेच ते सुकरपणे हाती पडावे, अशी ‘एकच प्याला’ ह्या गडकरीसाहेबांच्या (हे रामगणेश... नागपूरवाले नव्हे!) नाटकातील तळीरामाचे स्वप्न होते. तिठ्यातिठ्यावर मद्यमंदिरे स्थापन व्हावीत, असेही तळीरामास वाटायचे. ते काही शक्‍य झाले नाही. उलटपक्षी आम्ही हायवेलगतची ५०० मीटर अंतरातली मद्यगृहे (काही काळ का होईना,) बंद करून टाकली. नंतर हेच अंतर अडीचशे मीटरवर आणून थोडी सवलत दिली. आता अडीचशे मीटरांचा निर्बंधही गायब होऊन माल थेट घरपोच होणार, ह्या कल्पनेने गावोगावच्या तळीरामांना हर्षवायू झाला आहे. एका कपोलकल्पित बातमीमुळे आमच्यावर मात्र निष्कारण कुऱ्हाड कोसळली. चालायचेच.
‘‘तुम्ही असे का बोललात?’’ असे मी बावनकुळेसाहेबांना कळवळून विचारले. त्यावर त्यांनी हा गैरसमज झाल्याचे उत्तर दिले.
‘‘कुणाचा गैरसमज?,’’ मी म्हणालो.
‘‘माझाच... त्या पत्रकाराने विचारलेला प्रश्‍न ‘राइट टू पी’च्या धोरणासंबंधी होता, असे मला वाटले, म्हणून मी...’’ बावनकुळेसाहेबांना नमस्कार करून मी निघालो. ‘राइट टू पी’चा मराठीत अर्थ लावून माध्यमे काहीही बातम्या देणार असतील तर उधोजीसाहेब भडकले त्यात नवल ते काय? आणखी साडेपाच वर्षे तरी ही योजना राबवली जाणार नाही, असे आता जाहीर करणार आहे. पुढची टर्म आमचीच, हे त्यात ओघाने आलेच!!
ता. क. : निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली तर आमचा विजय गॅरेंटीड!! दिल्लीला कळवावे काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com