तयारी! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : लगबगीची.
प्रसंग : सीमोल्लंघनाच्या तयारीचा.
पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद.
...............................
अत्यंत चिंतामग्न अवस्थेत राजाधिराज उधोजीमहाराज अंत:पुरात येरझारा घालत आहेत. कुणाची तरी प्रतीक्षा करीत असावेत, असे दिसते. अधून मधून घड्याळात बघतात. चडफडतात. अब आगे...
उधोजीराजे : (अधिकारवाणीने) कोण आहे रे तिकडे?
मिलिंदोजी फर्जंद : (दाराच्या पलिकडून) ओऽऽऽ...
उधोजीराजे : (क्रुद्ध आवाजात) कोण आहे तिथं?
मिलिंदोजी : (दारापल्याड राहूनच) छुत छुत...मांजर आसंल!
उधोजीराजे : (खवळून) ताबडतोब माझ्या समोर ये!!
मिलिंदोजी : (गडबडीने येत) आलो म्हाराज!...मुजरा!!
उधोजीराजे : (रागावून) आम्ही बोलावले की साधी ‘ओ’ देता येत नाही का रे तुम्हाला?
मिलिंदोजी : (खुलासा करत) दिली की!!..क्‍येवड्या जोरांदी वरडलो- ओऽऽऽऽ....असं!!
उधोजीराजे : (संतापून) खामोश!! कुठे गेला होतास कडमडायला?
मिलिंदोजी : (थक्‍क होत) तुमीच पाठिवलं व्हतं की कमळाबाईंच्या महालात सोनं आणाया!!
उधोजीराजे : (दबकून) हळू बोल! सोनं काय...आपट्याची पानं म्हण! अरे, उद्या दसरा ना!! (घाईघाईने विषय बदलत) ते जाऊ दे...आमच्या मोहिमेची तयारी कुठवर आली?
मिलिंदोजी : (चक्रावून) आँ? कसली तयारी?
उधोजीराजे : (संतापाने बेभान होत) आमचं पायताण कुठं आहे?
मिलिंदोजी : (निरागसपणे) लगीच निघायचं मोहिमेवर!
उधोजीराजे : (खुंखारपणे) नाही! तुला बडवायचे आहे! लेका, दसरा उद्यावर आला!!
मिलिंदोजी : (एकदम उजेड पडत) हां हां! आलं ध्यानात! तयारी एकदम कंप्लीट झाली आहे, म्हाराज!
उधोजीराजे : (समाधानाने) उद्या ह्या कमळेला दाखवतोच माझी ताकद! हा उधोजी एकदा पेटला की सारी लंका जाळल्याबिगर स्वस्थ बसायचा नाही की विझायचा नाही!! बस झाला आता कमळेचा जुलूम!!
मिलिंदोजी : (दातात काडी घालत) फारच वायट वागल्या बाई तुमच्यासंगट!
उधोजीराजे : (कष्टी होत) आम्ही म्हणून सहन केलं. त्यांना शब्द दिला होता ना आम्ही...पण केसांनी गळा कापणारी ही औलाद...आता ह्यांना क्षमा नाही!! नाही नाही, त्रिवार नाही!!
मिलिंदोजी : (दुर्लक्ष करत)...तुम्ही त्यास्नी येवडी इज्जत दिली, कारभार त्येंच्या हाती दिला, स्वोता बाराच्या भावात ग्येले पन शबूद पाळला!! तुम्ही धन्य होय, म्हाराज! त्या कमळाबाईनं तिचं घर भरलं, दागदागिने केले, तुमच्या हाती काय ऱ्हायलं? ही आपट्याची पानं! घ्या!!
उधोजीराजे : (उत्सुकतेनं) काय आहे रे बाईंच्या गोटातली खबर?
मिलिंदोजी : (खांदे उडवत) त्यांनीच मला तुमच्याकडं पाठिवलं!!
उधोजीराजे : (संशयानं) तू आमचा फर्जंद की त्यांचा?
मिंलिंदोजी : (ओशाळून) तुमचाच जी!! आपट्याची पानं आणाया तुम्हीच पाठिवलं व्हतं मला थितं!!
उधोजीराजे : (गोरेमोरे होत) बरं बरं!! त्यांनी काय निरोप धाडलाय तो सांग आता!
मिलिंदोजी : (भोळा भाव आणत) कमळाबाई म्हणाल्या की ताबडतोब साहेबांना पुढ्यात घालून घेऊन ये! उद्या दसरा...चक्‍का टांगायचाय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com