चलो, अयोध्या! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, बॅंड्रा.. याने की बांद्रे.
वेळ : निजानीज. काळ : रात्र आरंभ.
पात्रे : हिंदुहृदयसम्राट क्रमांक दोन उधोजीसाहेब आणि युवाहृदयसम्राट क्रमांक (दोनच) चि. विक्रमादित्य. (खुलासा : पहिले युवासम्राट शिवाजी पार्कातले हं!)
....................
विक्रमादित्य : (दार ढकलून येत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (पांघरुणाची जुळवाजुळव करत) नोप! गुड नाइट.
विक्रमादित्य : (पाय हापटत) मला तुमचं अभिनंदन करायचंय!
उधोजीसाहेब : (कानटोपी घालत) थॅंक्‍यू! जा आता झोपायला!
विक्रमादित्य : (हाताची घडी घालत) तुमचं मेळाव्यातलं भाषण टॉप होतं! काय गर्दी होती, माय गॉड! आय वॉज लाइक... उफ्फ!! गर्दीत केवढी लुटालूट झाली की विचारू नका! मी जाम लुटलं!!
उधोजीसाहेब : (धक्‍का बसून) काय लुटालूट? तरी मी त्या शिंद्यांना सांगत होतो गर्दी जमवण्यासाठी एवढा आटापीटा करू नका म्हणून!! म्हटलं येणारे येतील बरोब्बर! आता झाली ना लुटालूट! म्हंजे उद्या आमच्या नावानं मीडियावाले कोकलायला मोकळे!!
विक्रमादित्य : (सहजपणे) आता दसऱ्या मेळाव्यात लोक तुमच्या विचारांचं सोनं लुटायलाच येतात ना!!त्या अर्थी म्हणालो की लुटालूट झाली!!
उधोजीसाहेब : (सर्द होत) तू...तू...झोपायला जा बघू! मी जाम दमलोय! यंदाचा दसरा नाही म्हटलं तरी अंगावर आला!! भयंकर झोप येत्येय!!...(जांभई देत) हॉऊऽऽऽब्बफिश्‍याश्‍याश्‍याऽऽऽ...!
विक्रमादित्य : (बोट नाचवत) तरी सांगत होतो दसऱ्याचा दिवस असला तरी एवढं श्रीखंड खाऊ नका म्हणून!!
उधोजीसाहेब : (गोरेमोरे होत) बरं, बरं! जा आता!!
विक्रमादित्य : (कुतुहलानं) बॅब्स..तुम्ही खरंच अयोध्येला जाताय?
उधोजीसाहेब : (फुशारकीने) जाणार म्हंजे काय...जाणारच!! मी तारीखसुद्धा जाहीर केली की!! २५ नोव्हेंबरला चलो अयोध्या!!
विक्रमादित्य :(कमरेवर हात ठेवून) इतक्‍या उशिरा तारीख का जाहीर केलीत?
उधोजीसाहेब : (खुलासा करत) उशिरा कुठे? तिकीट कन्फर्म झाल्यावर लग्गेच जाहीर केली! वेटिंग लिस्टवरच्या तिकिटाचं नं काही खरं नसतं!!
विक्रमादित्य : (जाब विचारल्यागत) तिकडे जाऊन तुम्ही काय करणार?
उधोजीसाहेब : (छाती फुगवून) तिकडेही त्या मोदीजींना शंभर प्रश्‍न विचारणार! काय हो, बांधताय राममंदिर की मी बांधू, आँ? जमत नसेल तर तसं सांगा!! आमच्याकडे चिक्‍कार गवंडी, कंत्राटदार आहेत म्हणावं! सहा महिन्यांत उभं करीन!!...(भानावर येत) म्हंजे असं मी तिकडे जाऊन सांगणार आहे!!
विक्रमादित्य : (हट्ट करत) मी पण तुमच्यासोबत येणार!
उधोजीसाहेब : (गडबडून) छे, छे! ती युद्धभूमी आहे, तुला नेणं योग्य होणार नाही!!
विक्रमादित्य : (पुन्हा बोट नाचवत) तुम्हाला मंदिर बांधायचं आहे ना तिथं? मग माझी गरज आहेच तिथं!!
उधोजीसाहेब : छे, काहीतरीच... शिवाय तुझं तिकीटही काढलेलं नाही!
विक्रमादित्य : (हाताची घडी घालत) देवेनअंकलचा फोन आला होता!
उधोजीसाहेब : (कपाळाला हात लावत) आलाच का त्यांचा फोन शेवटी? वाटलंच होतं मला!!...
विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) ते म्हणाले की तूसुद्धा जा बॅब्सबरोबर अयोध्येला... काम अवघड आहे, त्यांना एकट्याला झेपणार नाही!!
उधोजीसाहेब : (खवळून) खामोश! आम्हाला काय झेपतं ते आता कळेलच म्हणावं! काय म्हणाले तुझे देवेनअंकल आणखी?
विक्रमादित्य : (आवाज खाली आणत) ते म्हणाले... ते म्हणाले, की तुझ्या आजोबांचं मुंबईतलं स्मारक नाही अजून जमलं बांधायला, राममंदिर बांधायला कुठे निघालाय?.. जरा सबुरीनं घ्या म्हणावं!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com