केळ्याने होत आहे रे..! ( ढिंग टांग!)

dhing tang
dhing tang

वकील : (आवेशाने) न्यायमूर्तीमहाराज, अत्यंत दु:खद अंत:करणाने मी फिर्याद घेऊन न्यायाच्या अपेक्षेने आपल्या मेहेरबान कोर्टाकडे आलो आहे. कुंपणच शेत खाऊ लागले तर कसे चालेल? देशाची सुरक्षा ज्या संस्थेच्या हाती आहे, तिथेच राजरोस चोऱ्या आणि दरोडे पडू लागले तर सामान्य रयतेने कुणाकडे बघायचे? ज्या कोतवाली संस्थेच्या बगलेत साऱ्या स्मगलर, भ्रष्टाचारी, चोर, दरोडेखोर, खुनी ह्यांच्या फायली असतात, त्यांनीच दुसऱ्या बगलेत दुसरेच काहीतरी मारले तर काय करायचे? म्हणून-
न्यायमूर्तीमहाराज : (घाईघाईने) ऑर्डर ऑर्डर! इथे एकही क्‍यामेरा नाही! सरकारी वकिलासारखं बोलू नका! मुद्द्यावर या! आधी केस नीट सांगा!
वकील : (सावरून) देशाच्या सर्वोच्च तपास संस्थेतला हा झगडा आहे, न्यायमूर्तीमहाराज! फिर्यादी क्र. एक श्रीयुत शर्मासाहेबांच्या ड्रावरातील केळी आरोपी क्रमांक एक वर्मासाहेबांनी चोरली असा गंभीर आरोप आहे! अर्थात वर्मासाहेबांनी चोरीच्या आरोपाचा सपशेल इन्कार केला असला, तरी प्रथमदर्शनी पुराव्यानिशी हे सिद्ध होते की वर्मासाहेबांनी सदर केळी चोरली असावीत, इतकेच नव्हे तर ती खाल्लीदेखील असावीत! कारण शर्मासाहेबांच्या केळ्यांची साले वर्मासाहेबांनी अस्सीसाहेबांच्या क्‍याबिनमध्ये नेऊन टाकली व त्यावरून बस्सीसाहेब घसरून पडले!! ह्याहून अधिक पुरावा काय हवा? तेव्हा मेहेरबान कोर्टानं भारतीय दंडसंविधानातील कलमानुसार वर्मासाहेबांना शिक्षा फर्मावावी!!
न्यायमूर्तीमहाराज : (शांतपणे) शर्मासाहेबांनी केळी विकत घेतली होती, हे कसं सिद्ध करणार? कारण उलट त्यांनीच आपल्या गाडीवरून केळ्यांचा घड उचलला, असा केळेवाल्याने आरोप केला आहे!!
वकील : (युक्‍तिवाद करत) ज्याअर्थी शर्मासाहेबांच्या ड्रावरात केळी होती त्याअर्थी ते त्या केळ्यांचे मालक असले पाहिजेत, हे उघड आहे!
न्यायमूर्तीमहाराज : (अनवधानाने) कशी पडली हो? हल्ली महागच झाली आहेत...
वकील : (खाकरत)...ओपन अँड शट केस आहे, महाराज! वर्मासाहेबांमुळे अस्सीसाहेबांच्या इभ्रतीला धोका पोहोचला असून केळीच्या सालावरून घसरल्यामुळे बस्सीसाहेबांच्या कमरेचे हाड दुखावले आहे!!
न्यायमूर्तीमहाराज : (कागदावर खरडत) शर्मासाहेब, वर्मासाहेब, अस्सीसाहेब, बस्सीसाहेब! इथं कोण कुणाचे साहेब आहेत हे फिर्यादी पक्षाने स्पष्ट करावं!
वकील : (हतबल होऊन) या संस्थेत सगळे साहेबच आहेत, महाराज! किंबहुना साहेब झाल्याशिवाय ह्या संस्थेत प्रवेशच नाही! बेसिक क्‍वालिफिकेशन आहे ते!!
न्यायमूर्तीमहाराज : (चिकाटीने) वर्मासाहेबांचे साहेब शर्मासाहेब आहेत की शर्मासाहेबांचे वर्मासाहेब?
वकील : (अवसान गळून) दोघेही एकमेकांचे साहेब आहेत, मायलॉर्ड! पण दोघंही आपला कुणीही साहेब नाही, असंच म्हणतात!
न्यायमूर्तीमहाराज : (न्याय्य दृष्टिकोनातून) मुद्देमाल कोर्टात जमा करा! आय मीन...केळी!!
वकील : (ओशाळून) ही घ्या महाराज! दोनच उरली आहेत!
न्यायमूर्तीमहाराज : (संतापून) पुरावा नष्ट करणाऱ्यांना कडक शिक्षा होते, हे माहीत आहे ना?
वकील : (कागदावरील हिशेब बघत) एकंदर एक डझन केळी होती, असा शर्मासाहेबांचा दावा आहे! वर्मासाहेबांच्या ड्रावरात सापडलेली केळी सहाच होती! त्यातलं एकेक केळं अस्सीसाहेब आणि बस्सीसाहेबांनी खाल्ल्याचा वहीम असून उरलेली दोन मी...मी...खाल्ली महाराज! ही दोन केळी थोडीशी काळी पडलेली होती, म्हणून उरलेली आहेत, महाराज!
न्यायमूर्तीमहाराज : (संतापाचा स्फोट होऊन) हा कोर्टाचा अपमान आहे! काळी पडलेली केळी देता? सगळ्यांवर कारवाई होईल! एखाद्या निवृत्त जज्जाला बसवून सगळी चौकशी करा! दहा दिवसांच्या आत कोर्टाला अहवाल द्या! पुढचं पुढे बघू!!
वकील : (चाचरत) ह्या उरलेल्या केळ्यांचं काय करायचं, न्यायमूर्तीसाहेब!
न्यायमूर्तीमहाराज : (अंतिम निवाडा) शिकरण करा, शिकरण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com